आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:सिनेजगत ते क्रिकेट विश्व, कॉपी-पेस्ट सितारे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिखरावरचे तारे कमीत कमी विरोध करण्याचा मार्ग स्वीकारत सरकारी विचाराला पाठिंबा का देतात?

अक्षय कुमारच्या खूप आधी किशोर कुमार होते. या गायक-अभिनेत्याची कला केवळ सुरेल आवाजापुरतीच नव्हती. आणीबाणीच्या घोषणेनंतर काही दिवसांनी, १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारची अशी इच्छा होती, की चित्रपट कलाकारांनी त्यांच्या वीस कलमी कार्यक्रमाचा प्रचार करावा. किशोर कुमार यांना युवक काँग्रेसच्या रॅलीमध्ये गाण्यासाठी सांगण्यात आले. त्यांनी नकार दिला. सुडाच्या भावनेने त्यावेळच्या माहिती व प्रसारण खात्याचे मंत्री व्हि. सी. शुक्ल यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर किशोर कुमारांना बंदी घातली. किशोर कुमार यांच्याशिवाय इतर चित्रपट सितारेही आणीबाणीच्या विरोधात उभे होते.

भारतीय क्रिकेटमधील आजच्या ताऱ्यांआधी बिशन सिंह बेदी होते. हे महान डावखुरे फिरकी गोलंदाज. अनेक वेळा अधिकाऱ्यांसोबत ते भांडायचे. त्यांनी १९७४ मध्ये टूरवर जाणाऱ्या खेळाडूंना किरकोळ भत्ता देण्याला विरोध केला. क्रिकेट मंडळाने त्यांच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली. इंग्लिश गोलंदाज जॉन लीव्हरने चेंडूला व्हॅसलिन लावल्याविरुद्ध आवाज उठवल्याने बेदींना इंग्लिश काऊंटीच्या कराराला मुकावे लागले. अलीकडेच त्यांनी भाजप नेता (कै.) अरुण जेटली यांचा पुतळा फिरोजशाह कोटला मैदानावर लावण्यास विरोध केला. बेदी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत विद्रोहीच राहिले.

मग आजच्या जमान्यात किशोर आणि बेदींसारखी माणसे कुठे आहेत? आजचे चित्रपट व क्रिकेटमधील तारे शासनाविरुद्ध का उभे राहत नाहीत, चमचेगिरी का करतात? कृषी कायद्यांविषयी सर्वांनी केलेले जवळपास समान ट्विट हे याचे ताजे उदाहरण. शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी एक शब्दही न बोलणारे आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी काळजी व्यक्त करीत आहेत. अमेरिकन गायिका रिहानाच्या ट्विटमुळे केंद्र सरकारच्या नियोजनबद्ध सोशल मीडिया प्रतिसादाचा भाग बनून या मंडळींनी स्वत:ला ‘काॅपी-पेस्ट’ प्रचारकांच्या स्तरावर आणून ठेवले. आपल्या श्रीमंतीच्या बुडबुड्यांमध्ये राहणारे प्रसिद्ध तारे प्रतिमेसाठी व्याकूळ असलेल्या सत्तेच्या काळातील विचारांच्या युद्धात केवळ मोहरे झाले.

तथापि, हे २०१४ नंतरच हे घडते आहे असे नाही. सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींना नियंत्रणात ठेवणे किंवा किमान त्यांना आपला सहकारी बनवण्यात सत्ताधारी राजकीय पक्षांचा हातखंडा राहिला आहे.नेहरुंच्या काँग्रेसचा हिंदी चित्रपट उद्योगावर दीर्घकाळ वैचारिक प्रभाव होता. नेहरू आणि इंदिरा गांधी या दोघांनीही राज कपूरपासून दिलीपकुमार आणि नर्गिस दत्तपर्यंत अनेक चित्रपट ताऱ्यांना सक्रियपणे संरक्षण दिले होते. बलराज साहनींपासून शबाना आझमी यांच्यासारख्यांपर्यंत अनेकांच्या माध्यमातून पुरोगामी विचारसरणीही अनेक दशके चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात प्रभाव राखून होती. पण आता समाजाचे जास्त ध्रुवीकरण झाले आहे. अशा काळात सिनेजगतात जास्त वैचारिक फूट दिसते आहे. प्रत्येक अनुपम खेरसाठी एक नसिरुद्दीन शाह, प्रत्येक कंगना रनौतसाठी एक तापसी पन्नू, प्रत्येक मधुर भांडारकरसाठी एक अनुराग कश्यप आहे. सत्ता स्वविचारांच्या समर्थकांना संरक्षण देते आणि टीकाकारांना निर्दयीपणे तुडवते, तेव्हा नेत्यांच्या मागे जाण्याचा लोभ वाढत जातो. पण, आज जे होत आहे, त्यामुळे स्वतंत्र विचार बाळगणाऱ्यांचे स्थान आक्रसले आहे.

सरकारी मतांचा प्रचार करण्याचे कारण सेलिब्रेटिंना वाटणारी शिक्षेची भीती हे आहे. ही भीती घटनात्मक बांधिलकी ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या मूल्यांतील पोकळपणा समोल आणते. आजच्या राजकारणात सत्तेचा दुरुपयोग करण्याची लालसा असणारे व्हि. सी. शुक्लांसारखे लोक खूप आहेत. इन्कमटॅक्सची फाइल उघडणे ते ईडीकडून चौकशीपर्यंत सरकारी संस्था श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या मर्यादा पुढे आणण्यासाठी सतत वापरल्या जात आहेत.

केवळ सत्ताधारीच अभिजात वर्गाला धमकावणे-घाबरवण्यासाठी दोषी नाहीत. स्वयंघोषित टोळ्या, प्रायोजित सोशल मीडियातील झुंडी आणि काही नागरिकही गुंड बनतात आणि सायबर हल्ले करतात. या शक्तींच्या मागे बहुसंख्याकवादी राष्ट्रवाद आहे. तो किरकोळ मतभेदासही देशद्रोहाची संज्ञा देतो. हॉलिवुडमध्ये मेरिल स्ट्रीपसारख्या तारकांचे सत्यकथनासाठी कौतुक होते, तर आपल्या देशात टीका होते.

काही वर्षांपूर्वी देशात असहिष्णुता वाढल्याचे सांगितल्यावरून शाहरूख खान व आमीर खान यांना विरोध झाला होता. रस्त्यावर झालेल्या निदर्शनांमध्ये खानांच्या देशभक्तीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यांचे सिनेमे बंद पाडण्याची धमकी देत, त्यांच्या जाहिराती हटवण्याची मागणी करत, मोठ्या आर्थिक क्षमतेचे ब्रॅण्ड असलेल्या कंपन्यांनाही लक्ष्य बनवले जात होते. बिग बजेट चित्रपट निर्मितीत सर्वस्व पणाला लागलेले असते, मग लोक जोखीम पत्करत नाहीत. एकीकडे चित्रपट सितारे कमीत कमी विरोधाचा मार्ग स्वीकारत असताना प्रसिद्धीच्या व्यवसायातील काठावरचे लोक जास्त हिंमत दाखवत आहेत. कारण, कदाचित त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. उदाहरण म्हणून लोकप्रिय स्टँडअप् कॉमेडियनच्या वर्गाकडे पाहता येईल. कुणाल कामराने सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान नोटिशीपुढे झुकण्यास नकार दिला. मुनव्वर फारुकीसारख्यांना न केलेल्या कार्यक्रमासाठी महिनाभर तुरुंगात ठेवले जाते. तेव्हा आपण स्वत:लाच प्रश्न विचारतो, यांच्यावर लगाम लावण्यास किती वेळ लागेल? किशोर कुमार यांनी गायले आहे, ये कहां आ गए हम!

राजदीप सरदेसाई

ज्येष्ठ पत्रकार rajdeepsardesai52@gmail.com

बातम्या आणखी आहेत...