आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृत्तवेध:आंदोलनाची नवी व्याख्या... थोडी अशा तऱ्हेने...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यांत काही सुंदर स्वप्ने, विचार असताना ती स्वप्ने, त्या विचारांच्या वाटेत जे काही चुकीचे घडते, त्याबद्दल मनात निर्माण होणारा संताप म्हणजे आंदोलन. फक्त त्यासाठी अट एकच आहे, स्वप्न जितके पवित्र असेल, आंदोलन तितकेच निर्मळ. चला तर मग, आंदोलनाला या दृष्टीने समजून घेऊ. आम्ही लहान होतो, तेव्हा सर्वात पहिले आंदोलन कोणते केले? जेव्हा आम्ही खेळण्यात मग्न असायचो आणि संध्याकाळी वडील किंवा आजोबा घरी बोलावून घ्यायचे. ‘चला, देवासमोर बसा. ध्यान करा,’ म्हणायचे. आम्ही मांडी घालून बसायचो, मात्र देवाचे नामस्मरण काही व्हायचे नाही. आमचे लक्ष दिनेश आता काय खेळत असेल? महेश उड्या मारत असेल? याकडे असायचे. आणि आम्हाला, घरात देवासमोर मांडी घालून बसावे लागते आहे. हे आमचे आंदोलनच होते. आम्ही डोळे बंद करून देवाचे नामस्मरण केले काय किंवा नाही केले काय, हे वडिलांना काय कळणार, असा विचार आमच्या मनात सुरू असायचा.

आम्ही वयाने थोडे मोठे झालो. किशोरावस्थेत आलो. तेव्हा कुठलाही भेदभाव आम्हाला वाईट वाटायचा. सगळ्यात पहिले आंदोलन आम्ही आजीच्या स्वयंपाकघराविरोधात केले. व्हायचे काय, की दुसऱ्या जातीतले कोणी घरी आले, की त्याला चहा पिण्यासाठी घराच्या पत्र्यावर ठेवलेला एक मळका कप दिला जायचा. या भेदभावाला कंटाळून आम्ही एखाद्या दिवशी तो कप फेकून यायचो. आजीच्या स्वयंपाकघराविरोधात केलेले हे आमचे आंदोलनच होते. ही गोष्ट वेगळी आहे की, त्याठिकाणी नवा कप ठेवला जायचा, पण आम्ही आमचे आंदोलन यशस्वी झाले म्हणत फुशारकी मारत फिरायचो.

आंदोलन करताना अनेक वेळा आम्ही पकडले जायचो. त्यामुळे आमची खरडपट्टी काढली जायची. रामायणातले दोहे, चौपाई आणि त्याच्या अर्थाची जोरजोरात पारायणे करायचो. त्यावेळी व्हायचे काय, की एखादी चौपाई म्हणताना गाळली जायची. दूर बसलेले आजोबा नेमकी ती चूक पकडायचे. ती चौपाई स्वत: अर्धी म्हणायचे, ‘याच्या पुढे का म्हणाला नाही?’ आमची पुन्हा खरडपट्टी निघायची.

शिक्षण सुरू होते त्यावेळची ही घटना. विषय निवडायची वेळ यायची. घरातले सगळे जण, नातलग सारे मिळून आम्हाला गळ घालायचे, ‘तुला सायन्स घ्यायचे आहे.’ आम्हाला विषय कोणता घ्यायचा याची काहीच माहिती नसाची, पण सगळे सायन्स घे म्हणून पिच्छा पुरवताहेत म्हणून आम्ही मुद्दाम सायन्स सोडून काहीही घ्यायला तयार असायचो. आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन-दोन दिवस कुणाशीही बोलायचो नाही. खाणंपिणं सोडून चक्क अंधाऱ्या, अडगळीच्या खोलीत जावून बसायचो. ते आमचे आंदोलन नव्हते का?

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात परंपरेच्या विरोधात उभे राहण्यासाठी अशा अनेक संधी आल्या असतील. आपले स्वातंत्र्य, आपल्या स्वप्नांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आंदोलन केले असेल. त्यानुसार या देशातील प्रत्येक व्यक्ती आंदोलक आहे. लहानपणापासून आंदोलन त्याच्या शरीरात भिनलेले असते. फक्त कोणी आंदोलन करते, कोणी आपल्या मनात दाबून ठेवते. पण, केव्हा ना केव्हा तरी, कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याचा उद्रेक जरूर होतो. असेही असू शकते, की त्यांची पद्धत वेगळी असेल, त्यांचे प्रसंग आणि संदर्भ वेगळे असतील...

नवनीत गुर्जर, नॅशनल एडिटर, दैनिक भास्कर

बातम्या आणखी आहेत...