आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:कृषी कायदे केवळ ‘मीम’ बनवण्याच्या योग्यतेचे नाहीत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याची नुसती चर्चा नको, त्यांना श्रीमंत करण्यासाठी कामही व्हावे. कृषी कायदे केवळ इंटरनेट मीम नाहीत. तो राष्ट्रीय परिवर्तनकारी दस्तावेज आहे. सरकारी अधिकारी, नोकरशहा, नेत्यांंनी परिश्रम घेऊन तो तयार केला आहे.

आज मी खूप नाराज आहे. पण माझी नाराजी व्यक्त करण्याआधी काही सकारात्मक बाबी. मी तुम्हाला काही साधारण कृषी उत्पादनांना जागतिक ब्रँड बनवण्याच्या शक्यतेबद्दल सांगतो. ही १० भारतीय कृषी उत्पादने आहेत, ज्यामध्ये अब्जावधी डॉलरचे ब्रँड बनण्याची क्षमता आहे.

१. आंबा : भारतीय आंबे स्वादिष्ट असतात. सध्या हापूस हाच लहान- मोठा ब्रँड बनला आहे, पण आंब्याच्या अन्य जातीमध्येही क्षमता आहे.

२. गाजर : भारतीय गाजर सुंदर लाल रंगाचे, लुसलुशीत असतात. विदेशी गाजर नारंगी आणि बेचव असते. त्यामुळे भारतीय गाजर राज्य करू शकतील.

३. मसाले : जीरे, लवंग, वेलदोडे अशी भारतीय मसाल्यांची यादी मोठी आहे. त्यांची उत्कृष्ट गुणवत्ता आहे, पण आपण त्यांचा चांगला वापर करून घेऊ शकलो नाही.

४. डेअरी : आपण जगातील सर्वश्रेष्ठ चीज, लोणी, दही, पनीर आणि तूप बनवू शकतो.

५. जांभूळ : जांभळासारख्या फळाला विदेशात फारसे ओळखले जात नाही. पण आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. जगाला भारतीय फळांची ओळख करून देता येईल.

६. राजगिरा आणि अतिप्रथिनयुक्त धान्ये : राजगिऱ्याबाबत जगात बराच उत्साह आहे. आपल्याकडे राजगिऱ्याचे अनेक पर्याय आहेत.

७. तांदूळ : भारतीय बासमती तांदूळ सुगंधी, चविष्ट आहे. जगात असा तांदूळ कुठेच नाही.

८. मिरची : भारताच्या ईशान्येकडे आगळ्या स्वादाची मिरची आहे. तिला आपण जागतिक पातळीवर दर्जा मिळवून देऊ शकतो. ९. सफरचंद : काश्मिरी सफरचंद आपल्याला माहीत आहेच, पण जगात अजूनही कोणी फारसे ओळखत नाही.

१०. संत्री : नागपुरी संत्र्यांची चव स्पॅनिश संत्र्यांपेक्षा उत्तम आहे. ते सोलणेही सोपे आहे.

ही यादी बरीच मोठी होऊ शकते. भारतीय शेतीत अब्जावधीचा व्यापार करण्याची क्षमता आहे. हे केले तर श्रीमंत नक्की कोण होईल? नक्कीच, व्यवसायाचे मालक आणि शेतकरी. पण हे व्यवसाय कसे उभे राहतील? ते खासगी क्षेत्राच्या भागीदारीशिवाय उभे राहू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला कृषी क्षेत्रात सुधारणांची गरज आहे.

अनेक शिकलेली, जागरूक मंडळी शेतकऱ्यांना पुढे जाऊ देत नाहीत, हे आता समोर येत आहे. माझ्या नाराजीचे हे कारण आहे. समाज माध्यमांवर कृषी कायद्यांविरोधात पसरवलेल्या अफवांमुळे मला दु:ख झाले. ज्यांना हे कायदे पूर्ण माहित नाहीत, असे लोक त्यावर बोलत आहेत. पॉपस्टार, सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्तीही कृषी कायद्यांविरोधात पोस्ट करत आहेत. या लोकांमध्ये एक गोष्ट समान असून, ते सोशल मीडिया ब्रँडचा त्यासाठी वापर करत आहेत. ही रणनीती चुकीची नाही. त्यामुळे फक्त त्यांचे मार्केटिंग होते. हे स्वत: खरी, सर्जनशील माहिती निर्माण करण्यापेक्षा सोपे आहे. या व्यक्तींना सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी सक्रिय राहावे लागते. त्यांच्यासाठी पोलिसांकडून मार खाणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याचा, थंडीत शेकणाऱ्या वृद्ध आजीबाईचा फोटो दमदार कंटेन्ट असतो. खरे तर, कृषी कायद्यांवर खरी माहिती, कागदपत्रे घेऊन सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा, विश्लेषण करू म्हटले तर त्यांना कंटाळा येतो. अशा पोस्ट करणे, वाचण्याचाही त्यांना कंटाळा येईल.

कायदे तयार करणे, लागू करणे हे मीमसारखे उत्साह वाढवणारे, भावुक करणारे नसते. कृषी कायदे फक्त मोदी सरकारने बनवले म्हणून विरोधात उभे ठाकणे, हे कुठल्याही व्हिडिओ, फोटोने भावुक होण्यासारखे नाही. कृषी कायदे संमत होणे म्हणजे वरती दिलेले मल्टी डॉलर भारतीय कृषी ब्रँड बनण्याची खात्रीही नाही. मात्र, मी ही खात्री देतो की, कृषी कायदे लागू झाले नाही, तर ते कधीही ब्रँड बनणार नाहीत. त्यामुळेच विरोध करताना सावध राहा. काय सुरू आहे, शेतकरी कसे श्रीमंत होतील, हे तुम्हाला माहीत आहे? बरोबर. खासगी क्षेत्रातील शोषण हा एक मुद्दा आहे. ज्याकडे लक्ष दिले जाईल. कालांतराने, शेतकरी खासगी कंपनी स्थापून नावलौकिक मिळवतील. परंतु, कृपा करुन केवळ भारतीय शेतकऱ्यांना श्रीमंत बनवण्याबद्दल बोलू नका. त्यांना श्रीमंत करण्यासाठी काम करा आणि त्यांचे ऐका, जे फक्त सोशल मीडियावर नव्हे, तर प्रत्यक्ष काम करत आहेत.

चेतन भगत,इंग्रजी कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...