आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘हार्वर्ड हेल्थ’च्या मते, जगातील कोरोना लसीकरणाचा मुख्य दुष्परिणाम डोकेदुखी हा आहे. स्पेनमधील माद्रिद विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आले, की कोविड-१९ च्या साध्या लक्षणांमध्ये डोकेदुखी आहे. त्यातही मायग्रेनचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाच्या तणावामुळे जगभरात मायग्रेनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे अहवाल सांगतो. तथापि, काहीतरी गडबड आहे, हे या लक्षणांच्या माध्यमातूनच शरीर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. हे तीव्र बद्धकोष्ठता, झोपेची व पाण्याची कमतरता, जास्त वेळ मोबाइल किंवा कॉम्प्युटर पाहणे, पोटात त्रास किंवा पौष्टिक आहाराच्या अभावामुळे असू शकते. दीर्घकाळ औषधोपचार घेणे हा उपाय नाही.
मायग्रेनची अनेक कारणे आहेत. पहिले म्हणजे, आम्लपित्त. जेव्हा शरीरात आम्ल वाढते, तेव्हा मायग्रेनचा त्रास सुरू होऊ शकतो. अॅसिडिक पदार्थ, जसे चीज, मद्य आणि नायट्रेट्स, मोनोसोडियम ग्लुटामेट प्रिझर्वेटिव्हज्, कृत्रिम स्वीटनर, चॉकलेट, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी पदार्थाच्या खाण्यामुळे हा त्रास उद्भवतो. दुसरे कारण आहे, हार्मोन्समधील बदल. मासिक पाळीच्या नियमित बदलांसह हार्मोन्समधील सामान्य चढ-उतारांमुळे काही स्त्रियांना डोकेदुखी होते.
पोट साफ नसणे, हे मायग्रेनचे तिसरे कारण आहे. आपले पोट हार्मोन्सचे संतुलन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पोटाच्या समस्या असतील, तर डोकेदुखीची जास्त शक्यता असते. चौथे कारण म्हणजे, डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाण्याची कमतरता. डिहायड्रेशनमुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. यामुळे शरीराला आपल्या आतली स्वच्छता करणे कठीण होऊन बसते. बद्धकोष्ठता हे मायग्रेनचे एक महत्त्वाचे कारण आहे. पाचवे कारण म्हणजे ताणतणाव. जास्त ताण घेणे आणि आपली मानसिक स्थिती ठीक नसेल, तर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. ताणतणावाचा आरोग्यवरही वाईट परिणाम होतो. जसे झोप, श्वासोच्छवासाची पद्धत, पचन संतुलन हे सर्व मायग्रेनची कारणे असू शकतात.
मायग्रेनच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी काही घरगुती उपचार आपण करू शकतो. रात्री चार-पाच काळी मिरी पाण्यात भिजू घालायच्या. सकाळी उठल्या उठल्या रिकाम्यापोटी हे पाणी प्यायचे. रोज नियमितपणे कॅमोमिल फुलांचा एक-दोन कप चहा पिण्यामुळेही फायदा होतो. एक-दोन चिमूट लाल तिखट पाणी किंवा लिंबू पाण्यात मिळवून पिल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. आल्याचे तुकडे चावणे, आल्याचा चहा पिण्यामुळेही डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. याशिवाय, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केल्यासही मायग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो. आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यात केलेले काही बदल मायग्रेनची तीव्रता नक्कीच कमी करू शकतात.
हस्तपादासन, सेतुबंधासन, बालासन, विपरित कर्णी, मार्जरीआसन आणि शवासनासारखी योगासने केल्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो. प्राणायाम किंवा अनुलोम-विलोम सारख्या साध्या श्वसनाच्या व्यायामामुळे देखील मायग्रेनची तीव्रता कमी केली जाऊ शकते. मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी ध्यान हा एक प्रभावी मार्ग आहे. याशिवाय, तुमची झोपही नियमित ठेवा. ठरलेल्यावेळी झोपा आणि उठा. तुमच्या जेवणाच्या आणि झोपण्याच्या वेळा ठरलेल्या असल्या तरी मायग्रेनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
लूक कुटीनो,
हॉलिस्टिक लाइफस्टाइल कोच lukecoutinho.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.