आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:जाति न पूछो खेल की...

(द्वारकानाथ संझगिरी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकयो ऑलिम्पिक मध्ये भारताने आतापर्यंतची सरस कामगिरी केली, मात्र फक्त याच कारणासाठी हे ऑलिम्पिक लक्षात ठेवले जाणार नाही तर ऑलिम्पिकच्या निमित्ताने खेळांमध्ये जो जातीयवादाचा विषाणू वाढतोय त्यानिमित्तानेदेखील यंदाचे ऑलिम्पिक कायम स्मरणात राहील. खेळाला जातपात, धर्मपंथ नसतो, असे लहाणपणापासून वाचत आलोय, ऐकत आलोय, पण आपल्या भारतात खेळाला जातही असते हे अलिकडच्या घटनांमुळे अधोरेखित होत चालले आहे.

परवा मी पुण्यातल्या पुना क्लबवर मित्रांसोबत जेवायला बसलो होतो. ब्रिटिशांच्या जमान्यातला तो क्लब. ब्रिटिश आर्किटेक्चर मिरवणारा असा तो क्लब. मी त्या क्लब हाऊसमध्ये बसून समोरच्या हिरव्यागार गवताकडे पाहत होतो. मोठ्या डौलाने ते गवत वाऱ्यावर नाचत होतं. ते पाहता पाहता माझं मन कधी १३० वर्ष मागे गेलं मला कळलंच नाही.

मला एक तरुण मुलगा त्या गवतातून पुढे येताना दिसला. त्या क्लबवर माळ्याचं काम करणारा तो मुलगा.. क्रिकेटची खेळपट्टी तयार करणं, नेट लावणं अशी काम त्याच्या वाट्याला येत. त्यासाठी त्याला महिना ४ रुपये मिळत. ते साल होतं १८९२. गोऱ्या क्रिकेटपटूंना गोलंदाजी टाकणे हे त्याचं आणखीन एक काम. तिथे फक्त गोऱ्या क्रिकेटपटूंनाच फलंदाजी मिळत असे. इतर आले तर त्यांनी क्षेत्ररक्षण करायचं, गोलंदाजी टाकायची. फलंदाजी नाही. तिथे हा मुलगा तिथल्या गोऱ्या फलंदाजांना डावखुरी फिरकी गोलंदाजी टाकत असे. बघता बघता तो एक महान डावखुरा फिरकी गोलंदाज झाला. त्याचं नाव होतं बाळू पालवणकर. तिथून तो मुंबईला गेला. हिंदू जिमखान्यासाठी खेळला. नंतर १९११ च्या इंग्लडच्या दौऱ्यावर गेला. आणि बाळू पालवणकर हे नाव तिथे प्रचंड गाजलं. त्याने दौऱ्यावर १८.८४ च्या सरासरीने ११४ बळी घेतले. वलयाचा जर विचार केला तर तो त्या काळातला विराट कोहली होता. तो दलित होता. आणि त्याकाळामध्ये अस्पृश्यता तर भारतीय समाजात होतीच होती. पराक्रम गाजवूनही त्याला मॅचच्या वेळेला जेवण वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या ताटात दिलं जायचं. चहा देताना मातीचे पेले वापरले जायचे. आणि त्याचा चहा पिऊन झाला की ते तोडून टाकले जात. त्याला साधं पाणी द्यायला सुद्धा एक दलित माणूस ठेवला होता. कुठलाही सवर्ण माणूस त्याला पाणी देत नसे. मैदानावर सवर्ण खेळाडू त्याचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करत. आणि इतकं सगळं करून देखील या दलिताने हिंदूंच्या संघाला वारंवार विजय मिळवून दिले. त्यावेळी धर्मावर आधारित अशी एक स्पर्धा होती, ज्याला चौरंगी अशी स्पर्धा म्हणत. त्या स्पर्धेत हिंदूंचं वर्चस्व हे या बाळू पालवणकरने टिकवलं. आणि ते टिकवून सुद्धा तो दलित असल्यामुळे त्याला हिंदू संघाचं कर्णधारपद कधी मिळालंच नाही. त्यावेळेला हिंदू संघाचे कर्णधार होते पै. ते या पी. बाळू किंवा बाळू पालवणकरची कुवत जाणून होते. ज्यावेळेला पै ना कर्णधार केलं तेव्हा पै नी उघडपणे सांगितलं सुद्धा की, 'अहो मला कसलं कर्णधार करता. तुम्ही या बाळूला कर्णधार करा. तो माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला खेळाडू आहे आणि तो चांगला कर्णधार होऊ शकतो.' पण बाळू दलित असल्यामुळे त्याला कुणी कर्णधार केलंही नाही. पुढे तीच आपत्ती त्याचे जे दोन भाऊ होते पी. विठ्ठल आणि पी. शिवराम यांच्यावर आली. पी. विठ्ठल तर विजय मर्चंट सारख्या महान फलंदाजाचा फलंदाजीतला आदर्श होता. पण त्या दोघांना सुद्धा नेतृत्व करायला मिळाल नाही. तो काळच तसा होता. लोकमान्य टिळकांनी या पी. बाळूचं प्रचंड कौतुक केलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसाठी तर तो सुरवातीच्या काळात आयडॉल होता. पी. बाळू हे गांधीजींच्या विचाराने भारावलेले होते. त्यामुळे पुढे त्यांच्यात आणि बाबासाहेब यांच्यात मतभेद झाले. ते काँग्रेस बरोबर राहिले. त्या काळामध्ये अस्पृश्यता घालवण्यासाठी आणि जाती मधल्या उच्च नीचतेच्या व्यवस्थेवर हल्ला करण्याचा लोकहितवादी, आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे अशी अनेक मंडळी प्रयत्न करत होती. त्यांच्या प्रयत्नामुळे पुढे स्वतंत्र भारतामध्ये ती अस्पृश्यता कायद्याने गाडली गेली. पी. बाळूनी स्वतःच्या डोळ्यांनी हा बदलेला काळ पहिला. महिना ४ रुपयांवर नोकरी करणाऱ्या पी. बाळूनी स्वतःचा एक छान, सुंदर बंगला खारमध्ये बांधला. त्यांनी स्वतःची सुद्धा क्रिकेट बरोबर प्रगती केली. एक दलित माणूस, प्रतिकूल वातावरणात जर त्याच्यात कुवत असेल तर मोठा होऊ शकतो, याचं ते एक मूर्तिमंत उदाहरण होतं.

त्यानंतर अगदी कालपर्यंत मी क्रिकेटमध्ये जातीवरून कुठल्याही खेळाडूवर अन्याय झालेला पाहिलेलं नाही. किंवा ऐकलेला नाही. जातीवरून कशाला अगदी धर्मावरून सुद्धा नाही. म्हणजे कुठल्याही क्रिकेटपटूकडे आम्ही तो अमुक जातीचा, तमुक धर्माचा असं कधी पाहिलंच नाही. आम्ही पहिला तो त्याचा पराक्रम. आम्ही पहिला तो त्याचा खेळ. सलीम दुराणी फलंदाजीला आल्यावर "We want sixer "म्हणणारे हे काही सर्व अल्लाचे बंदे नव्हते. बहुसंख्य हिंदूंच्या गळ्यातला तो ताईत होता. किंवा बेदीच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवर जीव ओवाळून टाकणारी मंडळी सुद्धा सर्व धर्मीय असत. चंदू बोर्डेच्या शतकानंतर एका सामन्यामध्ये त्यावेळी कुणीही नसलेल्या अमिताभ बच्चनने आणि नंतर "संगम'च्या काळातल्या राजकपूरने त्याला पॅव्हेलियनमधून नेलं होतं. मला वाटत नाही की, त्या दोघांनाही कल्पना असेल की ते ख्रिश्चन होते म्हणून. चंदू बोर्डे आणि हजारे हे ख्रिश्चन आहेत, हे क्रिकेट मधल्या मंडळींना सुद्धा माहित नाहीये. कारण क्रिकेटचा विचार करताना जात आणि पात याचा विचार कधी कुणी केलाच नाही.

क्रिकेटमध्ये प्रांतीय वाद होता. तो उत्तरेचा, पश्चिमेचा, तो बेंगलोरचा, तो मुंबईचा, दिल्लीचा असे भेद असत. पण तो अमक्या जातीचा, तो सारस्वत, तो ब्राम्हण, तो भंडारी, तो मराठा किंवा तो दलित असं कधी विभाजन झालेलं मला तरी आठवत नाही. किंवा कोणी तसा कुणाचा उल्लेख केलेला सुद्धा मला आठवत नाही. खरं सांगू का, आपल्याकडे नावामुळे धर्म ओळखणं तसं सोपं जातं. जात चटकन उमगत नाही. मराठी माणूस मराठी क्रिकेटपटूची जात बऱ्याचदा आरामात ओळखू शकतो. कारण विशिष्ट आडनावं ही विशिष्ट जातीत आहेत हे आपण लहानपणापासून पाहत असतो. पण म्हणून जडेजा कोण? विराट कोहली कुठला? धोनीची जात काय? रैना कोण? विश्वनाथ, श्रीनाथ वगैरे ही मंडळी कुठल्या जातीची होती? असा प्रश्न कधी कुणीही कुणाला केला नाही. आणि त्यांनीही कधी काही मिरवलं नाही. एक मस्त असं जातीविरहित क्रिकेट आम्ही अनुभवलं.

पण परवा मला धक्का बसला. त्याची सुरवात सुरेश रैनाने केली. जेव्हा रैना चक्क कॉमेंट्रीवर बोलला की, 'मला चैन्नईच्या संस्कृतीमध्ये जुळवून घेता आलं, सोपं झालं कारण मी सुद्धा ब्राम्हण आहे.' म्हणजे एखाद्या क्रिकेटपटूने अभिमानाने आपली जात जाहीरपणे सांगितलेली मी पहिल्यांदा ऐकलं होतं. मग रवींद्र जडेजाला आपण क्षत्रीय आहोत हे अभिमानाने सांगायचा साक्षात्कार झाला. आता तर कहर झाला. महिला हॉकी संघातून गोलची हॅट्रिक करणाऱ्या वंदना कटारियाच्या बाबतीत!. महिला हॉकी संघ या ऑलॉम्पिकमध्ये शर्तीने लढला. पण ते अर्जेंटिना विरुद्ध हरले आणि या वंदना कटारियाच्या गावातल्या मंडळींनी तिच्या घरासमोर फटाके फोडले. शिवीगाळ केली. आणि ती सगळी जातीवाचक शिवीगाळ होती. दलितांना संघात घेतलं की असंच होतं वगैरे सुद्धा बोललं गेलं. एक दलित मुलगी देशाच्या संघात खेळते, प्रचंड वैयक्तिक यश मिळवते, जगात तिचं कौतुक होतं याची मळमळ त्या गावात अनेकांना वाटत असावी. ती मळमळ याच्यातून व्यक्त झाली. जातीय भावना संपलेली नाही, मनातली उच्च, नीचता संपलेली नाही. ती फक्त दबलेली होती. आणि ती अशी अधूनमधून उसळते. हे पुन्हा सिद्ध झालं. याआधी चैन्नईची एक बॉक्सर Thulasi Helen हिलाही अशाच प्रकारचा अनुभव आला. कारण ती दलित होती. आणि तिच्या स्त्रीत्वाचा सुद्धा अपमान केला गेला.

अशा गोष्टी घडल्यानंतर सुसंस्कृत, सुबुद्ध आणि सुधारलेल्या समाजाला तर लाज वाटायला हवीच पण त्याच बरोबर इतरांनी सुद्धा जो आवाज उठवायला पाहिजे होता, तो कुणी उठवलेला दिसत नाही. महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल तिने मात्र म्हटलं की, 'जे काही घडलं ते अतिशय वाईट आहे. आणि आम्ही जेव्हा खेळतो तेव्हा आमच्या समोर फक्त एकच गोष्ट असते तो म्हणजे आपला देश.' पण अशी भावना ना हॉकी फेडरेशनच्या कुणी व्यक्त केली, ना ऑलॉम्पिक असोसिएशनमधून व्यक्त झाली, ना इतर खेळाडूंनी तिला सपोर्ट दिला, ना या देशातल्या सरकारमधल्या कुठल्याही मंत्र्यांनी !. अशा गोष्टी लपून ठेवल्याने काही होत नाही. कुणीतरी त्या जखमेवर फुंकर घालायची खरं तर गरज असते. तुम्ही जर त्या जखमेवर फुंकर मारली नाही तर ती जास्त भळभळा वाहायला लागते. एक महत्त्वाची गोष्ट मला इथे लक्षात आली की, आपला देश आणि इतर यांच्यात काय फरक आहे? इंग्लडमध्ये २०२० च्या युरो कपमध्ये इंग्लड हरली. त्यानंतर इंग्लड टीममध्ये जे तीन काळे खेळाडू होते, त्या काळ्या खेळाडूंवर टीकेची झोड उठली. ते काळे असल्यामुळे त्यांना वर्ण श्रेष्ठत्वाला अनुसरून शिव्या दिल्या गेल्या. ते कसे कमी दर्जाचे आहेत हे सांगितलं गेलं. म्हणजे जे भारतामध्ये दलितांच्या बाबतीत सवर्णांकडून होत, ते तिथे गोऱ्यांनी काळ्यांच्या बाबतीत केलं. पण महत्त्वाचा फरक असा होता की ताबडतोब त्याची दखल ही त्यांच्या फुटबॉल फेडरेशनने घेतली. त्याचा निषेध केला. त्याविरोधात ते बोलले. इतकंच नाही तर त्यांच्या पंतप्रधानांनी सुद्धा म्हटलं, की, 'आम्ही आमच्या मायनॉरिटी खेळाडूंच्या बरोबर आहोत.' ही जी गोष्ट असते ही गोष्ट दुर्दैवाने आपल्या देशात झाली नाही. जी घडायला हवी होती.

इंग्लडमध्ये आता परवा घडलेली गोष्ट मला आठवतेय, ऑली रॉबिन्सन नावाचा त्यांचा एक गोलंदाज त्याने १० वर्षांपूर्वी कधीतरी sexist म्हणजे स्री विषयक आणि racist म्हणजे वर्ण श्रेष्ठत्वाच्या संबंधात कॉमेंट्स केल्या होत्या. त्या सोशल मीडियावर दहा वर्षानंतर आल्या. लहान असताना म्हणजे साधारण १२, १३ वर्षांचा असताना त्याने केलेल्या कॉमेंट्सवर त्याची चौकशी केली गेली. आणि मग त्याने पुन्हा अशा प्रकारची कुठली गोष्ट केली नाही हे लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा संघात घेतलं गेलं. ज्यावेळेला त्याच्यावर ही कारवाई केली गेली ,त्यावेळेला तो पहिला कसोटी सामना खेळला होता. अत्यंत यशस्वीपणे तो खेळला होता. इंग्लडला त्याच्या गोलंदाजीची न्यूझीलंड विरूध्द गरज होती, पण तरी देखील इंग्लडने त्याला वगळलं. त्याला वगळलं तेव्हा अनेकांना वाईट वाटलं, त्यात मी सुद्धा होतो. १० वर्षांपूर्वी तो काही बोलला. त्यावेळी त्याच्याकडे प्रगल्भता नव्हती. त्यावेळचं बोलणं तुम्ही आज का ग्राह्य मानता? त्याचा पश्चाताप त्याने व्यक्त केला होता. मग तरी त्याच्यावर कारवाई करता? चौकशी करता?. पण नाही इंग्लिशबोर्डाने ती चौकशी केली. आपल्या इथे याबाबतीत खेळाडू स्वतः व्यक्त होण्यासाठी बऱ्याचवेळेला घाबरत असतात. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इंग्लडमध्ये जातीयवाद नाही का? वर्ण श्रेष्ठत्वाची भावना तिथे अगदी आजही आहे. मला वैयक्तिक अनुभव तर इंग्लडमध्ये कितीतरी वेळेला आलेला आहे. आता नाही तरी सुरवातीच्या काळामध्ये मी बसने प्रवास करायचो तेव्हा मला असं जाणवायचं की, माझ्या बाजूची जागा ही शेवटी भरायची. म्हणजे गोऱ्या माणसाला इतर गोऱ्यांच्या बाजूला बसता येत नसेल तेव्हा तो नाईलाजाने माझ्या बाजूला येऊन बसायचा. लंडनच्या ट्यूबमध्ये रात्रीच्या वेळेला मी माझ्या रंगावरून म्हणजे काळ्या रंगावरून अनेकदा शिव्या ऐकलेल्या आहेत.आक्रमक अशा कॉमेंट्स सुद्धा ऐकलेल्या आहेत. मी त्याला कधीच प्रत्युत्तर दिलं नाही. कारण प्रत्युत्तर देण्यामध्ये काही अर्थ नव्हता. म्हणजे स्वतःवरच संकट ओढवण्याचा धोका होता. म्हणजे त्या समाजात आजही उच्च नीचता आहे. पण त्या समाजात काही मंडळी अशी आहेत त्यांना हा भेद आहे, याचं दुःख आहे . ते त्याबद्दल खुल्या दिलाने मत व्यक्त करतात. इंग्लिश समाजाने किंवा युरोपियन समाजाने काळ्यांची जाहीरपणे माफी मागितली आहे. त्यांना कमी लेखून त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबद्दल.! म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी ही अपराधीपणाची भावना आहे. मला प्रश्न पडायला लागलाय की तशी भावना खरंच आपल्याकडे मुठभरांकडे तरी आहे का? मी विचार केला की क्रिकेटमध्ये हा अनुभव मला का नाही आला? कदाचित त्याचं कारण असं की क्रिकेट हा खेळ शहरात जास्त फुलला. आणि शहरामध्ये क्रिकेट खेळणारे जे क्रिकेटपटू होते ते आर्थिक आणि जातीयवादाच्या शिडीचा विचार केला तर ते बहुसंख्येने मध्यम वर्गातले होते. ते मध्यम जातीमधले होते. तुम्हाला तळागाळातले खेळाडू त्यामध्ये कमी सापडतील. इतर खेळांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या तळाचे खेळाडू त्यात भाग घेताना दिसतात. त्यामुळे त्यांना हे अशाप्रकारचे अनुभव हे जास्त येतात आणि विशेषतः उत्तरेकडे. जिथे सामाजिक विषमता आहे ही अजूनही फार तळागाळामध्ये अस्तित्त्वात आहे. महिला हॉकीचा संघ घ्या. कर्णधार राणी रामफल हीचे वडील टांगा चालवतात. सलिमाची बहीण घरकाम करते. वंदना कटारिया, नेहा गोयल, अतिशय गरीब कुटुंबातून आलेल्या आहेत.दीप ग्रेस, दिब्रुगढ ओरीसाची आहे. तिच्या घरात पाणी वीज नाही. त्यामुळे ह्या खेळाडूंना, सामाजिक आणि आर्थिक विषमतेचे चटके भाजून काढतात. आज त्या उपांत्य फेरीत पोहचल्या नसत्या तर आपण त्यांच्या आयुष्यात डोकावून सुध्दा पहिलं नसतं. जात पात ही समाजातून पूर्णपणे जावू शकते हे फक्त दिवा स्वप्न आहे. जातीच्या भिंतींचे काही थर पडू शकतात. पण त्या भिंती उद्ध्वस्त होऊ शकत नाहीत. एका मर्यादेपर्यंत मी स्वजातीचं आकर्षण समजू शकतो. पण जेव्हा उच्चनीचता येते म्हणजे ज्यावेळेला मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ही भावना असते, हे करण्याचा अधिकार मला आहे, तुला नाही ही जेव्हा गोष्ट होते. गेल्या जन्मीच्या पाप पुण्याचा हिशोब मांडला जातो , तेव्हा जात विषारी ठरू शकते. लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, वगैरे ना बळे बळे जात चिकटवली जाते तेंव्हा तळपायाची आग मस्तकात जाते.

नीरज चोप्राला भालाफेकीमध्ये सुवर्णपदक मिळेपर्यंत "कुठला तरी", उत्तरेचा होता. अचानक कुणाच्यातरी लक्षात आलं की तो" रोड मराठा" जमातीतला आहे. आणि मग मराठी अस्मिता अचानक जागी झाली. त्याचे पूर्वज कुणीतरी मराठी आहेत हे ऐकून मलाही क्षणभर बरं वाटलं . पण मग त्याच्या जातीबद्दल जास्त बोललं गेलं. त्याच सुवर्ण पदक बाजूला राहिलं. याची खरंच आपल्या समाजाला गरज आहे का? अचानक जातीबद्दल असं त्वेषाने बोलणं, दुसऱ्या जातीबद्दल कुत्सितपणे बोलणं या गोष्टी कुठून आल्या? या पूर्वी नव्हत्या का? या समाजात होत्या. पण सोशल मीडिया त्यावेळेला नव्हतं, त्यामुळे त्या ज्या कुठे व्यक्त व्हायच्या त्या छोट्या छोट्या गटामध्ये व्यक्त व्हायच्या. त्याला व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म नव्हता. सोशल मीडियाने तो प्लॅटफॉर्म मिळवून दिला. प्रत्येकाची स्वतःची भिंत झाली, प्रत्येकाचा स्वतःचा इन्स्टाग्राम झाला. आणि मग स्वजातीच प्रेम आणि दुसऱ्या जातीचा द्वेष दुथडी भरुन वहायला लागली. पी बाळूवर सिनेमा करायला एक दोन निर्माते उत्सुक होते, त्यांचा नातू माझा खास मित्र म्हणून मी त्याच्या वडलांकडे त्यांना घेऊन गेलो. त्यांनी थेट नाही सांगितलं. ते म्हणाले, " त्या जुन्या आठवणी नकोत आम्हाला. आमच्या नातवंडांना आम्हाला त्यापासून दूर ठेवायचे आहे." पटलं मला. त्या विषमतेची छायाही त्यांना नातवडावर पाडू द्यायची नव्हती" स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी ही स्थिती असेल, तर सामाजिक स्वातंत्र्य अजून किती दूर आहे ह्याची कल्पना येते.

dsanzgiri@hotmail.com

(लेखक क्रीडा समीक्षक आणि ललित लेखक आहेत.)

बातम्या आणखी आहेत...