आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहल्ली ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी 'रिव्ह्यू' पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, त्यातही खोट्या रिव्ह्यूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे फसवणूक होण्याचीही शक्यता वाढली आहे. त्यामुळे 'ऑनलाइन रिव्ह्यू'च्या प्रेमात पडलेल्यांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. एका सर्वेक्षणानुसार 70% भारतीय डोळे बंद करुन रिव्ह्यूवर विश्वास ठेवतात. यामुळे त्यांची फसवणूक होते. कारण ई-कॉमर्स साइटवरील सुमारे 40% रिव्ह्यू हे खोटे असतात.
भारतात ई-कॉमर्स मार्केट सुमारे 4 लाख कोटी रुपयांचे आहे, पुढील पाच वर्षांत हे मार्केट 15 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2024 पर्यंत एकूण किरकोळ व्यवसायातील ऑनलाइन वाटा 10% पेक्षा अधिक असेल. त्यामुळे फेक रिव्ह्यू ही एक मोठी अडचण ठरु लागली आहे.
फेक रिव्ह्यूचे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी आम्ही अलीकडेच प्रकाशित झालेले रिसर्च आणि आणि अहवाल वाचले. याशिवाय टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपवर चालणार्या फेक रिव्ह्यूंची चौकशीदेखील केली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऑनलाइन बाजारात फेक रिव्ह्यूचा धंदा कसा चालतो? एखादे उत्पादन खरेदी करताना ग्राहक फेक रिव्ह्यू कसे ओळखू शकतात? फेक रिव्ह्यूंमुळे कंपन्यांचे काय नुकसान होते आणि अमेझॉन-फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या त्यास सामोरे जाण्यासाठी काय करत आहेत?
सोशल मीडियावर डझनभर ग्रुप, पैशांच्या मोबदल्यात रेटिंगचा गेम
फेक रिव्ह्यू कसे केले जातात, हे जाणून घेण्यासाठी 'दैनिक भास्कर'ने तपास केला. आम्ही टेलिग्रामवर शोध घेतला - 'अमेझॉन प्रॉडक्ट रिव्ह्यू'. यात डझनभर ग्रुप समोर आले. आम्ही Best Products Review नावाचा एक ग्रुप जॉईन केलाय त्यात 1477 सदस्य होते. येथे फेक रिव्ह्यू देण्यासाठी अनेक ऑफर्स होत्या.
आम्ही ग्रुपच्या अॅडमिनला मेसेज केला की, आम्हालाही फेक रिव्ह्यूद्वारे पैसे कमवायचे आहेत. 'Raw' हे युजरनेम असलेल्या अॅडमिनने आम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जाण्यासाठी एक लिंक पाठवली. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फेक रिव्ह्यू लिहिण्यासाठी काही अटी सांगितल्या गेल्या.
ग्रुप जॉईन करताच तिथे एक पोस्ट आली. पोस्टमध्ये हँगरच्या फोटोसह लिहिले होते - 'उत्पादनाची किंमत 499 रुपये. पूर्ण पैसे परत केले जातील.याशिवाय दुसरी कोणतीही लिंक नव्हती. आम्ही पुन्हा एकदा अॅडमिनला मेसेज केला की, आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. आम्हाला संपूर्ण प्रक्रिया सांगा. अॅडमिनने एक व्हॉईस नोट पाठविली की काळजी करू नका आम्ही तुम्हाला यात तज्ज्ञ बनवू.
यावरुन आमच्या लक्षात आले की, फेक रिव्ह्यू ग्रुपमध्ये दररोज असे डझनभर सौदे होतात. यामध्ये बहुधा तीन प्रकारच्या ऑफर असतात. पहिली म्हणजे, तुम्ही प्रॉडक्ट खरेदी करून त्याला फाइव्ह स्टार रेटिंग देता आणि तुम्हाला तुमचे पैसे परत केले जातात. दुसरे म्हणजे, तुमच्याकडून एखादे प्रॉडक्ट ऑर्डर केले जाते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला एखादी छत्री किंवा इतर दुसरी वस्तू पाठविली जाते. परंतु तुम्हाला रेटिंग ऑर्डर केलेल्या वस्तूसाठीच द्यावी लागते. तिसरे म्हणजे तुम्हाला खरेदी करायच्या असलेल्या एखाद्या वस्तूवर एक्स्ट्रा डिस्काउंट दिले जाते आणि त्या बदल्यात तुमच्याकडे चांगल्या रेटिंगची अट ठेवली जाते.
फेसबुकवरही खोटे रिव्ह्यू करणारे अनेक ग्रुप्स
जानेवारी 2021 मध्ये 'द मार्केट फॉर फेक रिव्ह्यूज' नावाचा अभ्यास पुढे ाला होता. यात फेसबुकवर फेक रिव्ह्यूसाठी बनविलेले ग्रुप शोधले गेले. 4 महिन्यांपर्यंत चाललेल्या अभ्यासानुसार असे दररोज 23 ग्रुप्स समोर आले. यामध्ये सरासरी 16 हजार सदस्यांचा सहभाग होता आणि 568 खोट्या रिव्ह्यूची रिक्वेस्ट पोस्ट केली जात असे.
काही व्यावसायिक फेक रिव्ह्यूजद्वारे उत्पादनांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाल्याचा दावा देखील करतात. चौकशी दरम्यान, आम्ही Fiverr नावाच्या वेबसाइटवर पोहोचलो. येथे सर्च बॉक्समध्ये आम्ही 'Review' टाइप केले आणि बरेच प्रकारचे फ्रीलांसर पाहिले. यापैकी बरेच जण रेटिंग वाढवण्याचा दावा करतात.
यूके मधील ग्राहक हक्क संस्था Which? ने 2020 मध्ये एक तपास केला. यामध्ये अशा बर्याच कंपन्या उघडकीस आल्या आहेत, जे अमेझॉनवरील उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी फेक रिव्ह्यू देतात. त्यासाठी मोठे फी देखील आकारली जाते. हे अमेझॉनच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, ज्यात रिव्ह्यूसाठी थर्ड पार्टीला पैसे दिले जाऊ शकत नाहीत.
अशा प्रकारे तुम्ही खरे आणि खोटे रिव्ह्यू ओळखू शकता
तुम्ही स्वतः खोटे रिव्ह्यू ओळखू शकता. अशा रिव्ह्यूजमध्ये 'Too Good' किंवा 'I like It' सारख्या ओळी फाइव्ह स्टार रेटिंगसह दिसतात. याशिवाय एका प्रॉडक्टबद्दल एकाच वेळी अनेक रिव्ह्यू दिसतात. त्यामुळे ते रिव्ह्यू खोटे असण्याची दाट शक्यता असते. अशा रिव्ह्यूवर उत्पादनाबद्दल फारशी माहिती दिली जात नाही. तिथे व्याकरणात्मक चुका देखील आढळतात.
या व्यतिरिक्त काही वेबसाइट्स फेक रिव्ह्यू ओळखण्यात मदत करतात. रिव्ह्यूची भाषा, मागील रिव्ह्यू आणि खरेदीच्या हिस्ट्रीनुसार, त्यावरील रिव्ह्यू खरे आहेत की खोटे हे शोधून काढले जाऊ शकते. फेक रिव्ह्यू ओळखण्यासाठी मदत घेता येईल अशा काही वेबसाइट्सची माहिती खाली दिली आहे...
खोटे रिव्ह्यूजमुळे होणारा तोटा आणि याच्याशी कसा सामना करत आहेत कंपन्या
खोटे रिव्ह्यूज वाचून लोक खराब उत्पादने खरेदी करतात. याचा परिणाम उत्पादनाच्या रँकिंगवर होतो. उदाहरणार्थ, एखाद्या उत्पादनाचे रेटिंग जास्त असल्यास आणि रिव्ह्यू चांगले असल्यास ते सर्च इंजिनमध्ये वर फिचर होऊ लागते. याचा फटका चांगल्या उत्पादनांना आणि इतर कंपन्यांना सहन करावा लागत आहे. या व्यतिरिक्त, रिव्ह्यूजवरील ग्राहकांचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागतो.
हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यूच्या एका अहवालानुसार अमेझॉनने त्याच्या प्लॅटफॉर्मवर होणारी फसवणूक आणि फेक रिव्ह्यूजचा प्रकार दूर करण्यासाठी 2019 मध्ये तब्बल 3.7 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत आणि हे काम करण्यासाठी 8 हजारांहून अधिक लोकांना कामावर ठेवले. अभ्यासानुसार, अमेझॉन असे 40% खोटे रिव्ह्यू साइटवरुन हटवते, परंतु या संपूर्ण प्रक्रियेस 100 दिवस लागतात. एखाद्या उत्पादनाची विक्री वाढविण्यासाठी इतका वेळ पुरेसा आहे.
अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांकडे खोट्या रिव्ह्यूंबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अमेझॉन ग्राहकाना फेक रिव्ह्यूविरोधात रिपोर्ट करण्याचा पर्याय देखील देतो. जे रिव्ह्यू ग्राहकांना गोंधळात टाकतात, त्याबद्दल ते अमेझॉनकडे तक्रार नोंदवू शकता. 2015 मध्ये कंपनीने चुकीचे, दिशाभूल करणारे आणि अन व्हेरिफाइट रिव्ह्यू विरोधात कारवाई केली होती.
अलीकडे, अमेझॉनने फेक रिव्ह्यूविरोधात पावले उचलून सुमारे 20,000 रिव्ह्यू साइटवरुन हटवले आहेत. त्याचप्रमाणे फ्लिपकार्टनेही कारवाई केली आहे. एप्रिल 2020 मध्ये, यूकेच्या एका तपासणीनंतर, फेसबुकनेही खोट्या रिव्ह्यूशी संबंधित 16,000 ग्रुप्स काढून टाकले होते.
फेक रिव्ह्यूजच करणा-या कंपन्यांनी या गाइडलाइन्सना पर्याय शोधून काढला आहे. खोटे रिव्ह्यू खरे वाटावे आणि कंपन्यांच्या ते लक्षात येऊ नये, यासाठी विविध युक्ती वापरल्या जातात. कमीतकमी 1500 ची खरेदी, डिलिव्हरीनंतर 2-3 दिवसानंतर रिव्ह्यू यासारख्या अटी याचाच एक भाग आहेत.
फेक रिव्ह्यूच्या या व्यवसायाची भरभराट होत आहे. कारण केवळ 3% ते 4% खरे ग्राहक एखाद्या वस्तूबद्दल रिव्ह्यू देत असतात. आता तुम्हीच आठवून बघा की, एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्ही त्याचा रिव्ह्यू लिहिला आहे का? जर तुम्ही रिव्ह्यू दिला नसेल तर द्यायला सुरुवात करा, कारण ख-या रिव्ह्यूंची संख्या वाढेल, तेव्हाच या खोट्या रिव्ह्यूंचा प्रभाव कमी होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.