आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘नोबेल’ अन्नदाता

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी ‘नोबेल’ची घोषणा सुरू झाली की सर्वाधिक उत्सुकता असते ती शांततेसाठीच्या पुरस्काराची. यंदाचा हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाला (डब्ल्यूएफपी) जाहीर झाला आहे. शांततेसाठी मोठं काम केलेल्या अनेक व्यक्ती आणि संस्थांची नावे आघाडीवर असताना एरवी दुर्लक्षित राहणाऱ्या एखाद्या संस्थात्मक उपक्रमाला नोबेल मिळणे, यातच त्याचे वेगळेपण दडले आहे. शांतता पुरस्कारासाठी यंदा ३१८ प्रस्ताव आले होते. त्यात २११ व्यक्ती, तर १०७ संस्था होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव त्यात असल्याची चर्चा होती. मात्र, नॉर्वेच्या नोबेल समितीने जागतिक अन्न कार्यक्रमाला हा पुरस्कार देऊन शांततेचे भुकेशी असलेले नाते अधोरेखित केले आहे. जगभरातील अनेक संघर्षांचे मूळ भुकेमध्ये असते. त्यामुळे भुकेल्यांच्या पोटातील आग शमवून तिचे सामाजिक वणव्यात रूपांतर होऊ न देणे, हे एका अर्थाने शांतता टिकवण्याचेच काम ठरते.

अस्थिर जागतिक अर्थव्यवस्था आणि कोरोना महामारीच्या काळात याचे महत्त्व काही पटींनी वाढले आहे. त्या दृष्टीने ‘डब्ल्यूएफपी’ला पुरस्कार देत ‘नोबेल’ने शांततेचे वेगळे परिमाण जगासमोर ठेवले आहे. १९६१ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे उद्दिष्ट जगभरातील भुकेल्यांना अन्न पोहोचवणे व अन्नसुरक्षा निर्माण करणे हे आहे. या माध्यमातून २०१९ मध्ये ८८ देशांतील सुमारे दहा कोटी लोकांना अन्न पुरवण्याचे केलेले काम पुरस्कारासाठी प्राधान्याने विचारात घेतले गेले. शिवाय, कोरोना काळात जगाच्या कानाकोपऱ्यातील भुकेने व्याकुळ झालेल्यांना ही संस्था अन्न पुरवते आहे. ‘नोबेल’वर या संस्थेने दिलेली प्रतिक्रियाही पुरेशी बोलकी आहे. ‘जगभरातील दहा कोटी भुकेली मुले, महिला आणि पुरुषांपर्यंत दररोज अन्न व इतर मदत पोहोचवण्याच्या आमच्या धडपडीला यामुळे ओळख मिळाली आहे’, असे संस्थेने म्हटले आहे. आणि हे खरेच आहे की पुरस्कारामुळे जगभरातील लोकांना या ‘नोबेल अन्नदात्या’ची ओळख झाली आहे. हा पुरस्कार म्हणजे शांततेचा मार्ग पोटातून जातो, हे मानणाऱ्या आणि त्यासाठी मानवता, उदारपणा ही मूल्ये जोपासत निरंतर झटणाऱ्या संस्थेला केलेला कृतज्ञतेचा नमस्कार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser