आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:‘ती’च्या हाती ‘शक्ती’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानवी हक्क दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाने महिला सुरक्षेसाठीच्या “शक्ती’ कायद्याला दिलेली मंजुरी, हा अन्याय-अत्याचारांविरोधात खुलेपणाने आणि खंबीरपणे आवाज उठवणाऱ्या “महिला शक्ती’चा विजय मानला पाहिजे. चारित्र्याच्या फाजील प्रतिष्ठेपायी महिलांवरील अत्याचारांना, गुन्ह्यांना चार भिंतीत दडपण्याच्या प्रवृत्तीविरोधात उभ्या राहिलेल्या सामूहिक “शक्ती’चेही हे यश आहे. “ती’च्या माणूस म्हणून जगण्याच्या, न्याय मागण्याच्या आणि स्वकर्तृत्वावर भरारी घेण्याच्या आशा- आकांक्षांना सुरक्षेचे पंख देणारा हा निर्णय आहे. बलात्कार, अॅसिड हल्ले यांसारख्या पाशवी कृत्यांच्या बळी ठरणाऱ्या पीडितांवर तपास आणि न्यायव्यवस्थेतील दिरंगाई व बेपर्वाई पुन्हा अत्याचारच करत असते. त्यामुळे असा एक मजबूत कायदा अत्यंत आवश्यक होता. अत्याचाराच्या गुन्ह्यांतील तपासाची मुदत, खटल्याचा कालावधी कमी करणे, वेळेत सरकारी वकिलांची नियुक्ती करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ३६ विशेष न्यायालये स्थापन करणे, हे नव्या कायद्यातील आश्वासक बदल आहेत.

मृत्युदंडाच्या शिक्षेमुळे संतापाच्या लाटेवर फुंकर घातली जाईल, मात्र पाशवी अत्याचारांना प्रतिबंध घालण्याची कामगिरी या कायद्यातील ‘मास्टर लिस्ट’ची तरतूद पार पाडेल. अनेक वर्षांपासून स्त्री चळवळीकडून होणारी ही मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. बदलत्या काळानुसार हिणकस मानसिकता बदलत नाही, तर ती बदलत्या माध्यमांमधून कार्यरत होते. याचे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावरुन होणारा आधुनिक अत्याचार. समाज माध्यमांतील धमक्या आणि बदनामीच्या रुपाने होणाऱ्या या नव्या हिंसेच्या विरोधातही या कायद्याने दिलेले संरक्षण, समाज माध्यम कंपन्यांनावर निश्चित केलेले उत्तरदायित्व, ही याची जमेची बाजू आहे. २०१९ मध्ये देशात झालेल्या बलात्काराच्या एकूण २७८ घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे ४७ घटना महाराष्ट्रात घडल्या. अन्य राज्यांप्रामाणे महाराष्ट्रात महिलांवरील हिंसाचाराच्या घटना लपवल्या जात नाहीत, याचा हा पुरावा. आता त्यापुढे जाऊन नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांचा वेगवान तपास व्हावा, तेवढ्याच गतीने आरोपीला शिक्षा व्हावी, पीडितेस न्याय मिळावा आणि भविष्यातील गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, यासाठी हा कायदा महत्त्वाचा ठरेल. एका अर्थाने सक्षम कायद्याअभावी वारंवार अत्याचाराला बळी पडणाऱ्या ‘ती’च्या हाती आता ही नवी ‘शक्ती’ आली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser