आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख:चीन, रशियाचा सापळा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकोणीस सदस्य देश असलेल्या शांघाय कॉर्पाेरेशन असोसिएशनच्या बैठकीसाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर चार दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यांच्याशी त्यांची भेट अपेेक्षित आहे. भारत-चीन संघर्षात रशियाची मध्यस्थी नसली तरी दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा घडवण्यामागे रशियाची खटपट आहे. त्यात त्यांचा काय हेतू आहे? हे अजून स्पष्ट नाही.

चीनशी रशियात बोलताना ताश्कंद कराराच्या कटू आठवणी भारताने विसरू नयेत. पाकिस्तानशी जिंकलेले युद्ध थांबवण्याचा करार रशियाच्या पुढाकारामुळेच भारताला करावा लागला. नंतर त्याच रात्री भारताने कर्तबगार पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना गमावले. संरक्षण मंत्र्यांमधील चर्चेच्या दोन फेऱ्या रशियातच झाल्या. ताबा रेषेवरचा संघर्ष वाढल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भेटत आहेत. चीन भारताशी चर्चा करत राहील, पण ताबा रेषेवरचे घुसखोरीचे प्रयत्न थांबवणार नाही, दोघांच्या दूरध्वनी संभाषणानंतरच चीनने माघारीचे नाटक करत घुसखोरी चालूच ठेवली. पण जशाच तसे उत्तर देताना प्रथमच आक्रमक संरक्षणाच्या पवित्र्यात भारत आहे. त्यामुळे पूर्व लडाख, पेंगाँग सरोवर, चुशूल परिसर वगळता उंचावरच्या मोक्याच्या साऱ्या ठिकाणांवर भारताचा ताबा आहे. चीनला हेच टोचते आहे. त्यातूनच ४५ वर्षांनंतर प्रथमच गोळीबार झाला. त्याला भारताच्या स्पेशल फोर्सने आक्रमक प्रत्युत्तर दिले.

हे पहिल्यांदाच झाले. अशा स्थितीत जयशंकर यांनी वाटाघाटीत चीन रशियाच्या सापळ्यात अडकू नये. १९६२ मधील चीन पराभरावाच्या तुलनेत आज खूप वेगळी व अनुकूल अशी स्थिती भारताच्या बाजूने आहे. आता सप्टेंबरनंतर पुढचे तीन महिने ताबा रेषेवर रक्त गोठवणारी थंडी असेल, अशा वातावरणात लढण्याचा अनुभव चिनी सैन्याला नाही. भारताच्या स्पेशल फोर्सकडे त्याचा तगडा अनुभव असल्याने चिनी सैन्य टिकाव धरू शकणार नाही. शिवाय कोविड महामारीच्या प्रादुर्भावाला चीन कारणीभूत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या देशांची फळी चीनविरोधात व भारताच्या समर्थनात तयार झाली आहे. ‘न भूतो...’ अशी स्थिती सध्या भारताच्या बाजूने आहे. अशा वेळी चीनच्या सापळ्यात अडकून भारताने बचावात्मक पवित्रा घेतला तर ती घोडचूक ठरेल. माघार तर नाहीच. उलट अक्साई चीन, गिलगिट, बाल्टिस्तानमधून चीनच्या माघारीकडे भारताने लक्ष केंद्रित करावे.