आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एरवी साधारणपणे उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यांत रक्त टंचाईच्या बातम्यांना प्रसार माध्यमांमध्ये स्थान मिळते. परंतु, यंदा ऐन हिवाळ्यातच तशी स्थिती निर्माण झाली आहे आणि ही टंचाई दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये जेमतेम आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच साठा आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचाच हा ‘साईड इफेक्ट’ असल्याचे दिसून आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहाता रक्ताच्या पुरेशा उपलब्धतेसाठी ‘साथी हाथ बढाना’ म्हणत सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. डिसेंबर-जानेवारीचा काळ आरोग्यर्वधक मानला जातो. या कालावधीत वातावरण आल्हाददायक, प्रसन्न आणि उत्साहवर्धक असते. शिवाय, अशा वातावारणात भूकही एरवीपेक्षा जास्त लागत असल्याने शरीरातील ऊर्जा योग्य प्रकारे प्रदीप्त झालेली असते. तथापि, कोरोनाच्या काळछायेमुळे हा हिवाळा सुद्धा काळवंडून गेल्यासारखा भासतो आहे. लॉकडाऊन, सामाजिक अंतराचे नियम याचा फटका रक्तदानासारख्या अत्यंत गरजेच्या सामाजिक उपक्रमालाही बसला आहे. परिणामी बऱ्याच ठिकाणी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. अपघातातील जखमी किंवा अॅनिमियाग्रस्तांना रक्ताची नेहमीच तातडीची गरज असते. पण, सध्या राज्यभरातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये जेमतेम २० हजार युनिट एवढाच साठा आहे, जो एरवीच्या तुलनेत अत्यल्प आहे. कोरोनाच्या धास्तीने सर्वत्र मुळातच रक्तदात्यांची संख्या घटली आहे.
रक्तदानाच्या प्रक्रियेतून कोरोना संसर्गाची भीती अनेक नियमित रक्तदात्यांच्या मनात आहे, ती दूर करण्याची गरज आहे. गर्दी टाळण्याच्या निर्बंधामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कधी नव्हे इतकी कमी झाली असून, रक्तदान चळवळच थंडावल्यासारखी स्थिती दिसत आहे. एरवी या काळात विविध संस्था, संघटना तसेच कॉर्पोरेट कंपन्यांतर्फे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. तसेच आध्यात्मिक-धार्मिक उपक्रम, राजकीय नेत्यांचे वाढदिवस हे देखील रक्त संकलनाचे मोठे स्रोत आहेत. रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून विधायकता आणि सामाजिक जाणिवेचे हे चक्र गतिमान करण्याची गरज आहे. ‘दिव्य मराठी’ने आपल्या माध्यमातून आवाहन करत त्यास प्रारंभही केला आहे. कोरोना काळात दिसलेले माणुसकीचे नाते रक्तदानातून आणखी दृढ करण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.