आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:लाल मातीतला हिरा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय पद्धतीच्या कुस्तीतील राष्ट्रीय स्तरावरचा सर्वोच्च हिंदकेसरी किताब महाराष्ट्राला सर्वप्रथम मिळवून देणारे कुस्तीगीर श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने कुस्ती आखाड्याच्या लाल मातीतला हिरा काळाच्या पडद्याआड गेला. कुस्तीमध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देणारे खंचनाळे हे दुसरे मल्ल. त्या अगोदर १९५२ मध्ये कराडच्या खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळवले. ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेले हे पहिले पदक. लाल मातीतल्या कुस्तीला कोल्हापूरमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिला. मल्लविद्येसाठी त्यांनी पायाभूत काम केले. फ्रान्समधील दौऱ्यात रोम येथे त्यांनी कुस्तीची मैदाने पाहिली होती. त्या तोडीच्या मैदानाची उभारणी महाराजांनी १९१२ मध्ये केली. तेव्हापासून कोल्हापूरमध्ये मल्ल तयार करण्याचे काम सुरू आहे. आजही शाहूपुरी येथील खासबाग तालमीत कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी राज्यातून, देशातून होतकरू मल्ल येतात. कोल्हापूरच्या लाल मातीतल्या कुस्तीला, महाराष्ट्राला देश स्तरावर लौकिक मिळवून दिला, तो खंचनाळे यांनी. भारतीय पद्धतीच्या कुस्तीतील राष्ट्रीय फेडरेशन स्थापन झाल्यानंतर १९५८ पासून हिंदकेसरी स्पर्धांची दंगल सुरू झाली.

भारतातल्या कुस्ती क्षेत्रातली ही सर्वात मोठी स्पर्धा. पहिली स्पर्धा मध्य प्रदेशच्या रामचंद्र केसरींनी जिंकली. महाराष्ट्राला मात्र खंचनाळे यांच्यामुळेच पहिल्यांदा िहंदकेसरी किताब मिळाला. तेव्हा दिल्लीत झालेल्या मैदानात त्यांनी रुस्तुम-ए-पंजाब बात्रा सिंगला चारीमुंड्या चित केले. महाराष्ट्रातील सात मल्लांनी हिंदकेसरीचा बहुमान मिळवला. खंचनाळे यांच्यासह त्यातील चार मल्ल कोल्हापूरच्या खासबाग तालमीचे आहेत. सर्वोच्च किताब मिळवल्यानंतर मल्ल नंतरच्या कुस्ती मैदानातील सहभागास तयार होण्याचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे. पण खंचनाळे यांनी तसे केले नाही. हिंदकेसरीचा बहुमान मिळवल्यानंतर कुस्तीची मैदाने ते गाजवत राहिले. पंडित नेहरू यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने त्यांचा गौरव केला होता. तरुण मल्लांना मार्गदर्शनाचे कामही त्यांनी अखंडपणे केले. कुस्ती स्पर्धांच्या बदलत्या स्वरूपाचे भानही त्यांना होते. त्यामुळेच तरुण मल्लांना मातीतल्या कुस्तीबरोबरच गादीवरच्या कुस्तीचेही धडे ते शिकवायचे. खंचनाळे यांनी वयाच्या सातव्या वर्षापासून सुरू केलेली कुस्तीची धडपड वयाच्या ८६ व्या वर्षी थांबली. भारतीय कुस्ती परंपरेतील त्यांचे स्थान सदैव स्मरणात राहील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser