आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:लस आली हो...

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देश ज्याची आतुरतेने वाट पाहात होता, त्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणास आजपासून सुरूवात होत आहे. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रही सज्ज झाला असून, राज्यात २८५ केंद्रांवर आवश्यक ती सिद्धता करण्यात आली आहे. राज्यासाठी नऊ लाख ८३ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ठिकठिकाणच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस प्राधान्याने दिली जाणार असली, तरी सर्वांचेच त्याकडे लक्ष लागून आहे. कारण, सद्यस्थितीत कोरोनापासून बचावासाठी लस हाच एकमेव आशेचा किरण आहे. अर्थात, असे असले तरी लसीच्या उपयुक्ततेबाबत वैद्यकीय क्षेत्रातच मतमतांतरे आहेत. तूर्त त्याच्या खोलात शिरण्यापेक्षा लस ही सामान्यांना दिलासा देणारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण कोरोनापेक्षाही अधिक वेगाने त्याबाबतची भीती समाजमनात पसरली.

आता लसीकरण सुरू होत असल्याने ही भीतीची भावना कमी व्हायला मदत होईल, हे महत्त्वाचे. लसीकरणाची ही प्रक्रिया सूत्रबद्ध पद्धतीने कशी पार पडेल, याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करणे अधिक गरजेचे आहे. सरकार आणि प्रशासनाकडून त्यादृष्टीने नियोजन झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, नुकत्याच झालेल्या लसीकरणाच्या रंगीत तालमीप्रसंगी काही त्रुटी प्रकर्षाने पुढे आल्या होत्या. विशेषत: या संपूर्ण प्रक्रियेत इंटरनेटची उपलब्धता हा कळीचा मुद्दा आहे. आपल्याकडे अद्यापही ग्रामीण आणि दुर्गम भागांत नेटवर्कची मोठी समस्या आहे. रंगीत तालमीप्रसंगी खुद्द आरोग्यमंत्र्यांच्या गावातच याचा प्रत्यय आला. अशा त्रुटी तातडीने दूर झाल्या, तरच लसीकरण अपेक्षेप्रमाणे वेग घेईल. एकीकडे लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज झाली असताना दुसरीकडे, आरोग्य सेवेतील अनेक जण लगेचच लस टोचून घेण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याची उदाहरणेही पुढे येत आहेत. पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार पडून सामान्यांपर्यंत लसीकरण मोहीम पोहचण्यास अजून जवळपास चार ते सहा महिन्यांचा अवधी लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. असे असले तरी लसीकरण मोहीमेचा प्रारंभ अनेकार्थाने महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने सहकार्य करणे आणि सदिच्छा ठेवायला हवी.

बातम्या आणखी आहेत...