आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात कोरोना संसर्गाची सुरुवात होऊन सात महिने उलटले आहेत. या महामारीशी लढताना कालपर्यंत जिभेवर रुळलेला ‘लॉकडाऊन’ हा शब्द आता कालबाह्य वाटू लागला आहे आणि ‘अनलॉक’ या शब्दातून जगण्याची नवी उमेद मिळू लागली आहे. एरवी ऑक्टोबर सुरू होताना हिवाळा आणि त्याच वेळी सणांचीही चाहूल लागते. यंदा कोरोनाच्या विळख्याने या चाहुलीतील सुखद अनुभूती हिरावून घेतली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली अनेक व्यवहारांची कवाडे उघडण्यास सुरुवात झाली आहे. ‘अनलॉक-५’ च्या या टप्प्यात प्रवेश करताना आणखी काही सेवा-सुविधा खुल्या होत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, नाट्य-चित्रपटगृहांसह राज्यांतर्गत रेल्वेसेवा सुरू होणे, हे सामान्य जनजीवन पुन्हा रुळांवर येत असल्याचे सुचिन्ह आहे.
केंद्र व राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास मात्र अजूनही परवानगी दिलेली नाही. आता हॉटेल आणि नाट्य-चित्रपटगृहे पन्नास टक्के क्षमतेने सुरू होतील. त्याचवेळी उपस्थितांच्या संख्येच्या मर्यादेत सार्वजनिक कार्यक्रम होऊ शकतील. जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचे उत्पादन, ऑक्सिजनची वाहतूक, मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांची वारंवारता वाढवण्यासह काही सवलतीही दिलासादायक आहेत. हळूहळू व्यवहार सुरळीत करण्यासाठी शासन, प्रशासन निर्णय आणि अंमलबजावणीतून प्रयत्न करत आहेत. मात्र, संसर्ग आटोक्यात येताना दिसत नाही. अशा स्थितीत अनलॉकच्या सवलतींचा लाभ घेताना नागरिक म्हणून आपली जबाबदारी काही पटींनी वाढली आहे. मिळालेल्या विरंगुळ्याच्या, मोकळ्या क्षणांमध्ये दडून काही गाफील क्षणही येतील आणि अशा क्षणीच कोरोना घात करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अधिक खबरदारी घ्यावी लागेल. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, हात सॅनिटाइज करणे या सवयी मुभा मिळाली म्हणून सोडून चालणार नाहीत. विशेषतः गेले काही महिने आपले सुरक्षाकवच बनलेला मास्क सर्वांत महत्त्वाचा आहे. लस येईपर्यंत तोच आपल्यासाठी लसीचे काम करेल. त्यामुळे आता घराप्रमाणे व्यवहाराचे, कर्तव्याचे, सहजीवनाचे दरवाजे उघडतानाही चेहऱ्यावर मास्क हवाच. तो असला तर या गोष्टींतला आनंद ओठांवर कायम राहील. आणि आप्तस्वकीयांना तो मास्कआडूनही नक्की दिसेल!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.