आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रलेख:युक्तीचे प्रयोग

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण देशाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकडे लागले असताना राजकारणाच्या पटावर अनेक घडामोडी घडत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाने कोंडीत सापडलेला भाजप पश्चिम बंगालमध्ये बस्तान बसवण्यासाठी आक्रमकपणे पुढे सरसावला आहे. भाजपचा वारू रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सारी शक्ती पणाला लावली आहे. पण, प्रत्येक वेळी शक्तीच उपयोगी पडते असे नाही. काही वेळा युक्तीही वापरावी लागते. आणि त्यासाठी राजकारणातील सगळ्या युक्त्या अवगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सक्रिय झाले आहेत. परवा त्यांनी ममता बॅनर्जींना फोन केला आणि मोदीविरोधातील लढाईसाठी धीर दिला. पवारांनी विरोधकांची मोट जरुर बांधावी. तशी राष्ट्रीय राजकारणात संधीही आहे. पण, विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष आहे आणि तो पवारांना ती संधी द्यायला तयार नाही. पवारही राहुल गांधींचे नेतृत्व मानायला तयार आहेत, असे दिसत नाही.

काँग्रेसमधील नाराज गटाला ‘यूपीए’चे नेतृत्व गांधी कुटुंबाच्या बाहेर जावे असे वाटते. त्यासाठी पवार पात्रही आहेत. पण, त्यांची पसंती पवारांनाच असेल, असे नाही. तसे पाहता पवार भाजपविरोधात देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतात. ‘एनडीए’मध्ये जाॅर्ज फर्नांडिस यांनी संयोजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली, तशी भूमिका विरोधी आघाडीसाठी ते स्वीकारू शकतात. काँग्रेसही तशी संधी त्यांना देऊ शकते. पवार कदाचित ‘यूपीए’चे अध्यक्ष झालेही असते, पण त्यांनी गेल्या सात वर्षांत मोदींशी कधीच थेट पंगा घेतला नाही. भाजप विरोधक म्हणून कायम काठावरचे राजकारण केले. मोदी सरकारच्या धोरणांना त्यांनी कधी कडाडून विरोध केला नाही. अशा स्थितीत २०२४ मध्ये मोदी-शहा जोडगोळीला ते टक्कर देऊ शकतील का, याबाबत काँग्रेस साशंक असू शकते. त्यामुळे पवारांकडे ‘यूपीए’चे अध्यक्षपद येणे अवघड दिसते. फार तर ते या आघाडीचे संयोजक बनतील. चाणाक्ष पवार तूर्तास अशी संधी घेतीलही. महाराष्ट्र असो की बंगाल; शक्ती कमी पडते तिथे युक्ती कशी वापरावी, हे इतरांना सांगणारे पवार पुढे जाऊन राष्ट्रीय राजकारणात ती स्वत:साठी वापरणार नाहीत कशावरून?

बातम्या आणखी आहेत...