आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:उलट्या बोंबा...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवरील भारताच्या दोन वर्षांच्या सदस्यत्वाची सुरुवात १ जानेवारीपासून होते आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताविरुद्धची ओरड पाकिस्तानने आत्ताच सुरू केली. भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये ‘जैश’च्या चार अतिरेक्यांना ट्रकसह उडवल्यानंतर दहशतवादी कारवाईचा पाकचा मोठा डाव उधळला गेला. पाकच्या या ताज्या हालचाली सुरक्षा परिषदेच्या सदस्यांपर्यंत पुराव्यासहित भारताने पोहोचवल्यानंतर पाकिस्तानला जाग आली. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांकडे भारताविरुद्ध तक्रार केली. तेथे भारताने वारंवार पाकला उघडे पाडले आहे. युनोकडे दिलेली कागदपत्रे म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचा दस्तावेज आहे. भारताविरुद्ध कितीही खोटे आरोप खोट्या पुराव्यासह केले तरी एक गोष्ट ते कधीच बदलू शकणार नाहीत. पाकिस्तान म्हणजे साऱ्या जगातील दहशतवादी कारवायांचा केंद्रबिंदू, ही त्यांची खरी ओळख. युरोप, अमेरिकेने पाकला पूर्ण ओळखले आहे. पाकिस्तानच्या शब्दावर चीन, तुर्कस्तान, मलेशिया असे मोजके देश सोडले तर कोणी विश्वास ठेवणार नाही.

संयुक्त राष्ट्रसंघाने ज्यांना अतिरेकी म्हणून घोषित केले, त्यातील बऱ्याच दहशतवाद्यांना पाकिस्तानने आसरा दिला आहे. हाफिज, मसूद, हक्कानी, दाऊद या कुख्यात दहशतवाद्यांच्या कारवाया पाकमधूनच जगभरात चालतात. ओसामा बिन लादेन पाकमध्ये असल्याचा इन्कार होत असतानाच अमेरिकेने पाकमध्ये घुसून त्याला गोळ्या घातल्या. जग हे कधीच विसरणार नाही. पाकची नापाक जमीन जागतिक दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे. हे जगाला माहिती असल्याने पाकच्या खोट्या पुराव्यांमुळे भारताचे काही बिघडणार नाही. चीन आमचा आर्थिक भागीदार असल्याचे भारताला सहन होत नाही, असा त्यांचा आरोप आहे. वास्तविक भारताला त्याची अडचण वाटण्याचे काही कारण नाही. भविष्यात चिनी ड्रॅगनने पाकला विळख्यात घेतल्यानंतर पश्चाताप करूनही उपयोग होणार नाही. चीन म्हणजे पूर्वीच्या काळची ईस्ट इंडिया कंपनी, असे वक्तव्य सत्तेची सूत्रे हाती घेताना इम्रान खान यांनी केले होते. पण पैशासाठी हात पसरण्याची वेळ आल्यानंतर त्यांना याचे विस्मरण झाले. पैशासाठी चीनचे पाय धरण्यापेक्षा एकेकाळी पाकचाच भाग असलेल्या बांगलादेशच्या प्रगतीकडे पाहून पाकने अतिरेकी वृत्तीत बदल करावा. पण ते कठीणच दिसते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser