आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:अवलिया...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रचंड मेहनत, पराकोटीची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असली की यशाचे शिखर सहज गाठता येते. अठराविश्व दारिद्र्यात जन्म होऊनही अडथळ्यांना लीलया चुकवत स्वप्नांचा ‘गोल’ पूर्ण करणारा दिएगाे मॅरेडाेना हे त्याचे असामान्य उदाहरण. जेमतेम पाच फूट पाच इंच उंचीच्या, मध्यम शरीरयष्टीच्या या फुटबॉलपटूने यशाची उंची गाठताना अशा अनेक मर्यादा शब्दशः पायदळी तुडवल्या. त्याच्यामुळेच अर्जेंटिनाला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवता आला. अफलातून पदलालित्य आणि आक्रमक चालींमुळे मॅरेडोना केवळ अर्जेंटिनाच्याच नव्हे, तर जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. प्रतिकूल परिस्थितीत धडपडणाऱ्या कित्येक युवा खेळाडूंसाठी तो आयकाॅन बनला. वाऱ्याचा वेग, विजेची चपळता आणि वणव्यासारखी धग घेऊन मैदानावर उतरलेल्या या फुटबाॅलपटूने नव्वदचे दशक गाजवले. १९८६ मध्ये विश्वविजेतेपदाचा चषक उंचवणाऱ्या मॅरेडाेनाला हे शिखर गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. गरिबीचे चटके सहन करतानाच प्रत्येक आव्हान परतावून लावण्याची कला त्याने अवगत केली. त्यामुळेच वयाच्या तिसऱ्या वर्षी मारलेल्या किकमधून मिळालेल्या उर्जेतून त्याला फुटबॉल विश्वावर अधिराज्य गाजवता आले.

प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि समृद्धीचे शिखर गाठल्यावरही जमिनीवर घट्ट पाय राेवून उभे राहण्याची दुर्मिळ कला त्याने साधली होती. त्यामुळे कोणत्याही स्थितीत त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम कमी झाले नाही. आपल्या कौशल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सहज चकवणाऱ्या या फुटबाॅलपटूला अनेक व्याधींनी मात्र घेरले हाेते. १९९९ ते २००० दरम्यान त्याने दाेन वेळा हृदयविकाराच्या आव्हानालाही परतावून लावले हाेते. बिनधास्त विचारशैली आणि हटके स्वभावामुळे मॅरेडाेनाला अनेक वेळा टीकेलाही सामाेरे जावे लागले. मात्र त्याविरुद्ध त्याने कधीही बंड केले नाही. १९८६ मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिलेल्या या महान फुटबाॅलपटूला १९९४ दरम्यान अर्जेंटिनानेच संघाबाहेर केले हाेते. मात्र, फुटबॉलच्या ‘खेळा’ला ‘कले’चा साज देणाऱ्या या ‘अवलिया’ने तोही खिलाडूपणे स्वीकारला. म्हणूनच मॅरेडोना नावाच्या ‘हॅन्ड ऑफ गॉड’ला अखेरचा निरोप देताना अर्जेंटिनाच नव्हे, तर सारे जग गहिवरले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser