आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:बारा मैलांची वादळवाट

अग्रलेख2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक धक्कादायक, नाट्यमय घडामोडींच्या लाटांवर स्वार होत; काहीसे डळमळत, हेलकावे खात ‘पाण्या’त उतरलेले ठाकरे सरकारचे गलबत बारा सागरी मैलांचे अंतर कापून पुढे निघाले आहे. राजकारणातील प्रचलित धारणा, संकेत आणि समीकरणांना छेद देत अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या या सरकारसाठी गेले बारा महिने वादळी सागरातील बारा मैलांपेक्षा कमी आव्हानात्मक नव्हते. कारण मुळातच या गलबताने उलट्या दिशेने शीड फडकावले होते. विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल एकट्या भाजपचा नव्हता की शिवसेनेचा. पण, दोघांनीही दुराग्रह सोडला नाही. परिणामी नवी राजकीय समीकरणे आकाराला येऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन झाले. ते सत्तारुढ झाले त्या दिवसापासून त्याच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ही अनैसर्गिक ‘तिघाडी’ हीच एक बिघाडी असल्याच्या हाळ्या उठू लागल्या, तेव्हा खरेच हे सरकार टिकते का नाही, असे सामान्यांनाही वाटू लागले. त्यातच सरकारमधील तिन्ही पक्षात ताळमेळ नसल्याचे दिसू लागले.

सुरूवातीचे दोन-तीन महिने नेत्यांमधील असमन्वय, कार्यकर्त्यांतील अस्वस्थता आणि त्यातून सरकारमध्ये आलेल्या अस्ताव्यस्त स्थितीतच गेले. तेवढ्यात कोरोनाची साथ आली. सुस्त पडलेल्या प्रशासनाला हलवून कामाला लावण्यासाठी सरकार सक्रिय झाले. आघाडीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी प्रत्यक्षात अधिकारांचे कुठलेही शस्त्र हाती न घेता युक्तीच्या चार गोष्टी सांगत उद्धवांचा रथ गतिमान केला. त्यामुळे सरकारचे अस्तित्व जाणवू लागले. उद्धव यांच्या आश्वासक उक्ती आणि कृतीमुळे लोकांना कोरोनाशी लढण्याचे बळ मिळू लागले. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या आडकाठ्यांना त्यांचा संयमीपणा पुरून उरला. परिणामी महामारीच्या काळातही राजकीय, आर्थिक, सामाजिक मुद्द्यांवरुन घेरण्याचे अनेक प्रयत्न होऊनही सरकारच्या स्थिरतेवर परिणाम झाला नाही. उलट ते अधिक मजबूत झाले. सरकार कोरोनासह अनेक आघाड्यांवर लढते आहे, हे मास्क लावलेली जनता बोलू शकत नसली, तरी हे डोळसपणे पाहते, अनुभवते आहे. सरकारला वेळ दिला पाहिजे, हे कळण्याइतकी ती सुज्ञ आहे. ‘बुडणार.. नक्की बुडणार..’ असा गलबला किनाऱ्यावर रोज होत असतानाही हे गलबत स्थिर गतीने पुढे जात असल्याने पुढे कितीही वादळे आली तरी संयमाच्या जोरावर ते ‘साठावा मैल’ गाठेल, असे दिसते आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser