आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अग्रलेख / :‘सेवाभाव’ की ‘बाजार’भाव?

एका महिन्यापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचा खटाटोप सध्या सर्व स्तरांतून केला जात आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याचा खटाटोप सध्या सर्व स्तरांतून केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी या प्रयत्नांना अप्रत्यक्षपणे छेद देत स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्याचे प्रकारही सुरू आहेत. कोरोना निदान चाचण्यांच्या दरांबाबत ‘दिव्य मराठी’ने केलेले स्टिंग ऑपरेशन त्यावर प्रकाश टाकणारे आहे. कोरोनाच्या निदानासाठी विशिष्ट प्रकारची चाचणी करावी लागते. सरकारी यंत्रणांकडे ही सुविधा असली तरी वाढती रुग्णसंख्या पाहता ती अपुरी आहे. परिणामी, काही खासगी लॅबलासुद्धा तशी परवानगी देण्यात आली आहे. रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता अशी परवानगी देणे क्रमप्राप्तच होते, पण ती देताना काही निकषही ठरवून देण्यात आले आहेत. त्यानुसार आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करणाऱ्या खासगी लॅबना प्रतिचाचणी कमाल साडेचार हजार रुपये आकारणीची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रथम संशयिताची स्क्रीनिंग टेस्ट करावी, त्यासाठी पंधराशे रुपये आकारावेत व नंतर गरज वाटल्यास कन्फर्म टेस्ट करून कमाल तीन हजार आकारावेत, असेही निर्देश आहेत. मात्र, असे असताना बहुतेक खासगी लॅब सरसकट साडेतीन ते साडेचार हजार रुपये आकारत असल्याचे चित्र आहे. शिवाय, एकाच प्रकारच्या चाचणीसाठी विविध खासगी लॅबमधील दर तफावत पाहता ही कमाल मर्यादा संबंधितांच्या पथ्यावर पडणारी आहे की काय, अशी शंका उत्पन्न होते. ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतही हेच आढळून आले. 

काही लॅब चाचणीसाठी साडेचार हजार, काही चार हजार, तर काही चक्क साडेतीन हजारांत राजी होत्या. एका लॅबने तर ‘इमारतीच्या पार्किंग लॉटमध्ये खुर्ची टाकून द्या, तिथे येऊन सगळ्यांचे स्वॅब घेऊ’ इतपत तयारी दाखवली. बाजारात ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचे दर विक्रेत्यानुसार बदलतात तसाच हा प्रकार झाला. चाचणीसाठी आवश्यक तांत्रिक आणि आनुषंगिक खर्चाच्याही वर थोडे पैसे खासगी लॅबने आकारायला आक्षेप नाही. इथे अगदी सेवाभाव नसला तरी बाजार‘भाव’ही नको, ही आमची भूमिका आहे. राज्याचे आरोग्यमंत्रीही याच मताचे आहेत. राज्य शासन याबाबत समान दर धोरण ठरवेल, असे स्पष्ट करून त्यांनीही नेमके तेच अधोरेखित केले आहे.

0