आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:रडकथेचा पुढचा अध्याय...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याच्या भावाचा प्रश्न पूर्वी सहसा निसर्गाशी निगडित असायचा. अलीकडे मात्र तो राजकीय धोरणांशी अधिक निगडित असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. सध्या निर्माण झालेली स्थिती सुद्धा त्याचेच निदर्शक म्हणायला हवी. कांद्याचे बाजारभाव थोडेसे वाढू लागल्याचे दिसताच केंद्र सरकारने प्रथम एकाएकी निर्यातबंदी जाहीर करून टाकली आणि पाठोपाठ व्यापाऱ्यांना कांदा साठविण्यासाठी अवघ्या २५ टनांची मर्यादा घातली. परिणामी, बहुसंख्य व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली आणि ठोक बाजारातील कांद्याचे लिलावच बंद पडले. त्याचा व्हायचा तोच परिणाम होऊन किरकोळ बाजारात कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचला. यामागे मुख्य दोन कारणे आहेत. मध्यंतरी झालेल्या पावसाने कांदा मोठ्या प्रमाणावर भिजून खराब झाला. त्यामुळे बाजारात कांदा कमी येऊ लागला आणि भाव काहीसे वधारले. वास्तविक हे भाव काही गगनाला भिडले नव्हते. पण, बिहार निवडणुकीच्या तोंडावर केंद्राला भाववाढीची धास्ती वाटू लागली असावी. त्यातूनच १५ सप्टेंबरला अचानक सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लादली. पण, नेमक्या त्याच सुमारास ‘अनलॉक’ची प्रक्रिया गतिमान होऊन हॉटेल उघडू लागल्याने कांंद्याची मागणीही वाढू लागली.

निर्यातबंदीमुळे अपेक्षेनुसार भाव तर खाली आले नाहीतच, उलट कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने एकीकडे कांदा आयातीसाठी पावले उचलली, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांवर २५ टनांपेक्षा अधिक कांदा साठवण्यास निर्बंध लादले. हा निर्णय तर निव्वळ हास्यास्पद आहे. ‘ग्राऊंड रिअॅलिटी’ समजावून न घेता दिल्लीतील वातानुकूलित दालनांत बसून घेतलेल्या या निर्णयाचे कांदा व्यापारी आणि उत्पादकांतही तीव्र पडसाद उमटले. व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली आणि प्रश्न आणखी चिघळला. आता त्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवारांनी नाशिक दौरा करून या समस्येसाठी स्पष्टपणे केंद्राला जबाबदार धरले, तर तिकडे भाजप प्रदेशाध्यक्षांनीही २५ टनांची ही मर्यादा वाढविण्याची विनंती केंद्राला केली. सद्यस्थितीचा विचार करता राजकीय टोलवाटोलवी थांबवून सर्वांनी मिळून तातडीने तोडगा काढावा लागेल. अन्यथा, कांद्याच्या रडकथेचा हा अध्याय लवकर संपणार नाही.