आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:राजकीय बळाचा सौदा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी गावोगावच्या पारांवर जाहीर सभांचे फड रंगतील. आचारसंहितेच्या संकेतानुसार मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा आमदार, खासदार व स्थानिक स्वराज्य संस्था करू शकत नाहीत. परंतु, ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लाखो रुपयांचा निधी देण्याच्या वल्गना करणारे पुढारी दिसले आणि त्याचसाठी कोटींची बोली लावणारे ग्रामस्थही दिसले. नांदेड जिल्ह्यातील उपसरपंचपदासाठी जाहीर लिलाव बाेलीचे लोण ग्रामपंचायतच बिनविरोध करा इथंपर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, निवडणूक आयोग, न्यायपालिका अथवा जिल्हा स्तरावरील निवडणूक यंत्रणेला राजसत्ता विकत घेण्याच्या हा नवा फंडा लोकशाही तत्त्वाच्या विरुद्ध आहे आणि तो रोखला पाहिजे, असे वाटत नाही. लोकशाहीचा प्राण असलेली निवडणूक पध्दतच मोडीत काढण्याच्या प्रकाराला न्यायालयात आव्हान द्यावे, असे एखाद्या सामाजिक संस्थेलाही वाटले नाही. लाेकशाही विकेंद्रीकरणासाठी त्रिस्तरीय राज्यपद्धती अस्तित्वात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासाचे प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार, सत्तेत महिलांसह दुर्बलांचा सहभाग ७३ व्या राज्यघटनेने मिळाला.

या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र आमीष दाखवून राजकीय ताकद विकत घेण्याचा नवा प्रकार समोर आला. मत ही वस्तू नाही, पैशाच्या व विकासाच्या नावाने सत्ता विकत घेण्याचा व सामान्यांच्या मताचा अधिकार गोठवण्याचा प्रकार लोकशाहीला घातक आहे. निकोप जातीय-धार्मिक सलोखा असलेल्या, ग्रामविकासात लोकसहभाग ठेवणाऱ्या गावांना प्राधान्याने निधी देऊ म्हणणे आणि पैशाच्या जोरावर सत्तेला कळसूत्री बाहुली बनवणे या गोष्टी भिन्न आहेत. अशा वल्गनांना गावस्तरावरून प्रतिसाद मिळाल्याचे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसावरून दिसते आहे. सरपंचपदासाठीचे आरक्षण जाहीर न केल्याने यंदा अनेक ठिकाणी स्थानिक इच्छुक नेते अडचणीत आले. कदाचित त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांची संख्याही वाढताना दिसते आहे. निवडणूक खर्च कोण करणार, नेत्यावर जबाबदारी येऊ नये म्हणून बिनविरोध ग्रामपंचायतींचा फंडा शोधला गेला असेल. पण, त्यामुळे ग्रामस्तरावर सामान्य माणसाला राजकीयदृष्ट्या सजग करण्याचा, विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहण्यासाठी त्याला सक्षम करण्याचा उद्देश हरवला जाऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...