आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:ना-पाक अन् निर्लज्ज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सामाजिक- राजकीय अराजक, कमालीची खालावलेली आर्थिक स्थिती आणि जगभरात गमावलेली पत यांमुळे पाकिस्तानची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. त्यातच भारताबरोबरच्या शत्रुत्वाचे भांडवल करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने आजवर दडवून ठेवलेले ‘ओपन सीक्रेट’ स्वत:च्या तोंडाने जगाला सांगितले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीत पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेला आत्मघातकी हल्ला हे इम्रान सरकारचे आणि संपूर्ण देशाचे यश असल्याचे सांगत पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी आजवरच्या साऱ्या दहशतवादी कारस्थानांची एका अर्थाने कबुली दिली आहे. किंबहुना आजही जम्मू-काश्मिरात सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तान सरकारच असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचा उजवा हात मानले जाणाऱ्या चौधरी यांनी संसदेत केलेले हे विधान पाकिस्तानने जगासमोर पांघरलेला साळसूदपणाचा बुरखा टराटरा फाडणारे आहे. नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीगचे खासदार अयाझ सादिक यांनी परवा संसदेत पाकच्या नापाक कारनाम्यांची निम्मीअर्धी पोलखोल केली होती.

‘विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही, तर रात्री नऊला भारत हल्ला करेल, असे परराष्ट्रमंत्री कुरेशींनी आपल्याला सांगितले होते. तेव्हा तिथे असलेल्या लष्करप्रमुख बाजवांचे पाय लटपटत होते, त्यांना घामही फुटला होता,’ असे सादिक यांनी म्हटले होते. चौधरी यांनी या टीकेला प्रत्त्युत्तर देताना, ‘पुलवामामध्ये आम्ही घुसून मारले’, अशी शेखी मिरवत दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेऊन उरलीसुरली पोलखोल केली, हे एका अर्थाने बरेच झाले. या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए- महम्मद’ने स्वीकारली होती. मात्र, ‘जैश’, ‘लष्कर’ आणि ‘जमात- उद- दवा’ यांसारख्या दहशतवादी संघटना ‘आयएसआय’ आणि लष्कराच्या मदतीने भारतात जे हल्ले घडवतात, त्यामागे पाकिस्तान सरकारच असते, याचे पुरावे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांना भारताने देण्याची आता गरज उरलेली नाही. अमेरिका आणि चीनच्या आडून भारताची कोंडी करणाऱ्या पाकिस्तानने आपणच ‘दहशतवादाचे प्रायोजक’ असल्याची दिलेली कबुली ना-पाक तर आहेच; शिवाय निरपराधांचे जीव घेणाऱ्या निर्लज्ज, निर्ढावलेपणाचे ढळढळीत उदाहरणही आहे. शेजाऱ्याची ‘नियत’ उघड झाल्याने आता भारतानेही ‘कुवत’ दाखवण्याची तयारी ठेवली पाहिजे.