आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढवणारा जसा आहे, तसा भाजपला अति आत्मविश्वास नडल्याचे सिद्ध करणारा आहे. राज्यातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आलेल्या या निकालामुळे महाविकास आघाडीची सत्तेवरची मांड पक्की तर होईलच, पण रोज उठून सरकार पडणार असल्याची हाकाटी पिटणाऱ्यांना स्वत:च्या आत डोकावण्याची संधी देणारा आहे. संधी याचसाठी म्हणायचे की, अशा पराभवानंतरही स्वत: आत्मपरीक्षण करण्याऐवजी शिवसेनेला ते करण्याचा सल्ला भाजप देतो आहे. मुळात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांत एरवी भाजपचाच एकाधिकार असायचा. मतदारांच्या नोंदणीपासून ते मतदारसंघाच्या बांधणीपर्यंतचे किचकट काम हा पक्ष अनेक वर्षे चिवटपणे करत होता. त्यामुळे बहुतांश शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले बनले. तिथून निवडून आलेले भाजपचे अनेक नेते पुढे राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात पोहोचले.
भाजपला एकीकडे या निवडणुकीचा फायदा होत असताना त्या तुलनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र या मतदारसंघांमध्ये फारशी ताकद उभी करू शकले नव्हते. भाजपसोबत युतीत लढणाऱ्या शिवसेनेचेही स्वत:चे बळ वाढवण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी नागपूर विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक अशा मतदारसंघांत जिंकणे तर दूरच, पण भाजपपुढे आव्हान निर्माण करता येईल, एवढाही आत्मविश्वास विरोधकांमध्ये नव्हता. पण, राज्यातील सत्ताबदलानंतर निर्माण झालेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित ताकदीतून तो निर्माण झाला. आणि त्याचा प्रत्ययही या निकालांतून आला आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही पक्षांनी अलीकडे मतदार नोंदणीवर भर दिला होता. तरीही त्यांच्या एकत्रित ताकदीचा फटका बसेल, असे भाजपला वाटले नसावे. उमेदवार निवडीतही नेहमीप्रमाणे ‘सोय’ पाहण्यात आली. परिणामी एरवी प्रतिमा आणि प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होत, आपल्याच ‘हेकायंत्रा’ला प्रमाण मानून सत्तेचा किनारा गाठणाऱ्यांना बदललेल्या अंत:प्रवाहांचा अंदाज न आल्याने त्यांची नाव बुडाली. शिक्षक आणि पदवीधरांचे मतदान हा जाणतेपणाचा कौल मानला जातो. त्या निकषावर हा निकाल राज्याची सामाजिक, राजकीय भूमिका बदलत असल्याचे स्पष्ट करणारा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.