आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:अनिश्चितता, तुझं नाव अमेरिका!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील दोन दिवसांच्या मतमोजणीनंतरही निकालाची अनिश्चितता अजून संपलेली नाही. डेमोक्रॅट उमेदवार जो बायडेन हे अध्यक्षपदावर विराजमान होण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताच्या २७० या जादुई आकड्याच्या जवळ आले आहेत. तुलनेने रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प मागे असले, तरी रस्सीखेच अजून संपलेली नाही. सहा राज्यांतील मतमोजणी सुरू आहे. एक गोष्ट नक्की, की ‘इलेक्टोरल’ मतांमधला फरक वाढल्यानंतर ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता धूसर होते आहे. पण त्याचबरोबर दुसरीही गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे निवडणूक निकालाबाबतच्या सर्व चाचण्या, अंदाज चुकीचे ठरले. भारतातही माेजके अपवाद सोडले, तर बहुतांश चाचण्यांचा अनुभव हाच असतो. सर्वच माध्यमांनी अमेरिकेत डेमोक्रॅट पक्षाची निळी लाट (ब्लू वेव्ह) असल्याची, बायडेन यांच्या सहज विजयाची भाकिते केली होती. ते सगळे तोंडावर पडले. निवडणूक कोणासाठीही सोपी नाही, ते सध्याच्या आकडेवारीवरूनही स्पष्ट दिसते. बायडेन विजयी झाले तरी त्यांचा जय सहज नसेल. ते जादुई आकड्याच्या जवळपास आहेत. तो गाठला तर ठीक. नाही तर निकालासाठी पोस्टल मतांची पेटी उघडावी लागेल.

खुर्ची दूर जात असल्याचेे दिसताच ट्रम्प अस्वस्थ झाले आहेत. मोठ्या विजयोत्सवाच्या तयारीची भाषा ते करीत होते. पण, दोन दिवसांपासून मतमोजणीतील कथित गैरप्रकाराच्या आक्षेपावरून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याबाबत ते बोलत आहेत. उर्वरित मतमोजणी थांबवण्याची व काही ठिकाणी फेरमतमोजणी घेण्याची त्यांची मागणी आहे. ट्रम्प समर्थक फेरमतमोजणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. ट्रम्प यांनी निकालाचं घोंगडं न्यायालयात अडकवलं, तर बायडेन यांचा अध्यक्षाच्या खुर्चीवर बसण्याचा मुहूर्त लांबेल. भारतीय मतांसाठी ट्रम्प यांच्या मोदींसमवेत दोन प्रचंड सभा न्यूयॉर्क व अहमदाबादेत झाल्या. ट्रम्प विजयी होतील, असे मोदींनाही तेव्हा वाटत असावे. बायडेन वा ट्रम्प कोणीही आले तरी भारतासाठी फरक किती पडेल? याचा आज अंदाज बांधणे कठीण आहे. पण कोणत्याही डेमोक्रॅट अध्यक्षाचा भारतासाठीचा अनुभव अनुकूल नाही. भारतासाठी ही सगळी स्थिती ‘थांबा आणि वाट पाहा’ अशी आहे.