आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:विवेक दीप उजळी...

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भय आणि निराशेच्या सावटाने झाकोळलेल्या मनाला आनंद, उत्साहाच्या उजेडाने लख्ख करणारे दिवाळीचे प्रकाशपर्व जेमतेम आठवडाभरावर आले आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी बहुतांश सण- उत्सवांवर मर्यादा आल्या. सार्वजनिकच काय, पण कौटुंबिक स्तरावरही आपल्याला सणांचा आनंद घेता आला नाही. दीपावलीच्या रूपाने वर्षातील सर्वांत मोठा सण आला आहे आणि या काळात कोरोनाचा विळखाही काहीसा सैल झाला आहे. पण, तो सुटलेला नाही. हा विळखा पुन्हा आवळला जाऊ शकतो, कदाचित जास्त घट्ट होऊ शकतो. कारण अनेक देशांमध्ये लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली आहे. आपल्याकडेही जवळपास सगळे व्यवहार पूर्ववत झाले आहेत. रस्त्यांवर, बाजारांत गर्दी ओसंडून वाहते आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते आहे. अशा स्थितीत कोरोनाचा धोका काही पटींनी वाढू शकतो. फटाके हा तर दिवाळीचा अविभाज्य घटक. गेल्या काही वर्षांत ‘इको-फ्रेन्डली’ दिवाळी साजरी करण्याकडे आपला कल वाढला आहे. एका अर्थाने आपण विधायकतेच्या वाटेवर पहिले पाऊल टाकले आहे. आता ‘फटाकेमुक्त दिवाळी’ हे त्यापुढचे पाऊल असेल.

ही संकल्पना आपल्या आणि विशेषत: बच्चेकंपनीच्या आनंदावर विरजण टाकणारी असली, तरी एकंदरित परिस्थिती पाहता त्याशिवाय पर्याय नाही, हेही तितकेच खरे. आपल्या अवतीभवतीच्या वयस्कर, आजारी लोकांप्रमाणेच कोरोनातून बरे झालेल्यांची काळजी घेणे, हे निरोगी, सुदृढ समाज म्हणून आपले कर्तव्य आहे. कोरोना फुप्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे बाधितांना आणि बरे झालेल्यांनाही धुरामुळे फुप्फुसाचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. राजस्थान, ओडिशा, दिल्लीसारख्या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी न घालता राज्य सरकारने हा निर्णय आपल्या साऱ्यांच्या सद्सदविवेकावर सोडला आहे. त्यामुळे आपलीही जबाबदारी वाढली आहे. कोरोनामुळे जिथले दिवे विझले आहेत, जिथे जगण्याचा संघर्ष सुरू आहे तिथे दाटलेल्या अंधारातील, सन्नाट्यातील नि:श्वास फटाक्यांची आतषबाजी अन् आवाजात विरून जाणार नाहीत याचे भान ठेवायला हवे. संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे खऱ्या ‘दिवाळी’च्या निरंतर अनुभूतीसाठी अविवेकाची काजळी झटकून आपल्याला विवेकाचे दीप उजळावे लागतील.