आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:रक्तलांछित सत्तांतर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या इतिहासात बुधवारचा दिवस काळ्या अक्षरांत लिहिला जाईल. सत्तेचा स्वार्थ एखाद्या नेत्याला, त्याच्या अंध नि धुंद पाठीराख्यांना कोणत्या थराला घेऊन जातो, हे या दिवशी साऱ्या जगाने पाहिले. राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे विशेष सत्र सुरू असताना मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसद भवनाच्या आत आणि बाहेर केलेल्या राड्यामुळे या प्रगत राष्ट्राची, त्याच्या प्रगल्भ लोकशाहीची मान खाली गेली. ‘यथा नेता तथा कार्यकर्ता’ हे बदलत्या राजकारणातील नवे वचन ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी शब्दश: सार्थ केले. आपल्या कारकीर्दीत, त्यानंतरच्या अध्यक्षीय निवडणुकीत, निकालाच्या वेळी आणि तेव्हापासून आतापर्यंत ट्रम्प यांनी जगाला ज्या बेमुर्वतखोर वृत्तीचे दर्शन घडवले, तिचेच प्रदर्शन त्यांच्या पाठीराख्यांनी कॅपिटॉल हिल्स या संसदेच्या ऐतिहासिक वास्तूवर मांडले. संसद बायडेन यांच्या विजयावर मोहोर उमटवणार, हे दिसताच बाहेर जमलेले शेकडो कार्यकर्ते भिंतींवर, खांबांवर चढून आत घुसले. तेथे त्यांनी तोडफोड करत प्रचंड धुडगूस घातला.

प्रतिनिधिगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या कार्यालयाच्या काचा फोडून एक बहाद्दर टेबलावर पाय टाकून त्यांच्या खुर्चीवर बसला. नॅशनल गार्ड््स व पोलिसांनी गोळीबार करून दंगेखोरांना हुसकावून लावेपर्यंत चार तास हा तमाशा सुरू होता. जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात, त्या कॅपिटॉल हिल्समध्ये झालेला हा हिंसाचार अभूतपूर्व असला तरी अनपेक्षित नव्हता. स्वत: ट्रम्प सोशल मीडियावरून समर्थकांना अप्रत्यक्षपणे हिंसाचारासाठी चिथावणी देत होते. त्यामुळेच ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने त्यांची अकाउंट्स तात्पुरती बंद केली. बाहेर हुल्लडबाजांकडून लोकशाहीचे वस्त्रहरण सुरू असताना सभागृहात मात्र तिची इभ्रत राखण्यासाठी डेमोक्रॅट्सच्या बरोबरीने रिपब्लिकन नेतेही पुढे सरसावले. मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासह अनेक रिपब्लिकन सिनेटर्सनी, ‘हिंसेने लोकशाही दडपता येत नाही,’ असे सांगत बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जनतेने दिलेला कौल मान्य न करता ट्रम्प यांनी मात्र अखेरपर्यंत आडमुठेपणा कायम ठेवला. त्यांनी द्वेषाचे, स्वार्थाचे राजकारण टाळले असते तर हे सत्तांतर रक्तलांछित झाले नसते, लोकशाहीवरही त्याचे डाग उडाले नसते.

बातम्या आणखी आहेत...