आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:सोयीचा मामला

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची स्थळनिश्चिती अखेर झाली आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या नाशिक नगरीत यंदा सारस्वतांचा कुंभमेळा भरत आहे. साहित्यापेक्षा साहित्येतर कारणांनी गाजण्याची परंपरा आपल्या संमेलनास आहे. स्थळ असो अध्यक्षपद असो की अन्य काही; संमेलन आणि वाद, चर्चा हे समीकरण ठरलेले. त्यानुसार यंदाही संमेलन स्थळावरून चर्चेचे फड रंगले. यावेळी थेट देशाच्या राजधानीशी नाशिकची स्पर्धा होती. खरे तर गेल्या वर्षीपासूनच दिल्लीकरांचे संमेलनाच्या आयोजनासाठी प्रयत्न सुरू होते. यंदा तर त्यांनी चांगलीच उचल खाल्ली. त्याचवेळी नाशिककर देखील सरसावले. त्यामुळे संमेलन दिल्लीला मिळणार की नाशिकला, याविषयीची उत्सुकता ताणली गेली. हे महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने संमेलन राजधानी दिल्लीत व्हावे, असा मुद्दा पुढे आला. त्यावर असेच असल्यास ज्यांच्या नावे मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या ज्ञानपीठप्राप्त कवी कुसुमाग्रजांच्या गावीच ते होणे अधिक श्रेयस्कर आहे, असा युक्तिवाद केला गेला. याशिवाय, इतरही अनेक बाबी संमेलन नाशिकला मिळण्यासाठी कारणीभूत आहेत.

साहित्य महामंडळाने दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त एक विशेष अधिवेशन देऊ केले होते. परंतु दिल्लीला मुख्य अधिवेशनाचाच मान हवा होता. त्यासाठी मग मराठीचा अभिजात दर्जा, राजधानीतील बंद पडत असलेल्या मराठी शाळा असे मुद्देही पुढे केले गेले. असे असूनही सोयीमुळे नाशिकची निवड झाली. एक तर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीपेक्षा नाशिक खूपच सुरक्षित आहे. शिवाय, प्रवास व येण्या-जाण्यासाठी तुलनेने सोपे आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीसारख्या सर्वार्थाने सक्षम संस्थेने संमेलनासाठी प्रांगण देण्याची तयारी दाखवल्याने अनेक गोष्टी सोप्या झाल्या. यंदा कोविडमुळे राज्य सरकार संमेलनास केवळ पाच लाखाचेच अनुदान देणार आहे. अशा स्थितीत ती उणीव भरून काढण्याचे बळ नाशिकमध्ये आहे. शिवाय, यानिमित्ताने शरद पवारांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचा मुहूर्त नाशकात साधला जाणार असल्याची चर्चाही जोरात आहे. त्यात किती तथ्य आहे, ते यथावकाश स्पष्ट होईलच. पण, एकुणात नाशिकला संमेलन आयोजनाचा मान मिळण्यात सोयीचा मामलाच अधिक आहे, हे निश्चित.

बातम्या आणखी आहेत...