आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अग्रलेख:राजभवन ‘मार्गे’ विधानभवन?

एका वर्षापूर्वीलेखक: संपादकीय
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला बुधवारी सहा महिने पूर्ण होत आहेत. हा सहा महिन्यांचा काळ खडतर होता. तरी सर्व अडथळे पार करत ठाकरे सरकार १८० दिवस पूर्ण करते आहे. अर्धवार्षिकीच्या निमित्ताने विरोधकांनी हाकारे घालायला प्रारंभ केला आहे. त्याचाच भाग म्हणजे नारायण राणे यांची आजची राजभवनची वारी होय. भाजपमध्ये चाणक्यांना तोटा नाही. म्हणून तर त्यांनी राणेंसारखा मोहरा निवडला आहे. सरकारचे आधारस्तंभ असलेले खुद्द शरद पवारही आज राजभवनावर पानसुपारीला होते. ती भेट संपताच पवारांबरोबरच्या प्रफुल्ल पटेलांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयलांवर कौतुकाचा वर्षाव केला. गोयल अन् शिवसेनेत रात्रीच ट्विटर वाॅर रंगले होते. विमानसेवेला परवानगी नको, असे मुख्यमंत्री म्हणत होते, इतक्यात राष्ट्रवादीने मुंबईतून ५० विमानफेऱ्यांना संमती दिल्याचे जाहीर करून टाकले. 

या योगायोगांच्या घटनांनी ठाकरे सरकार डळमळीत झाल्याचा भास झाला. काहींना तर शरद पवार राष्ट्रपती होणार आणि महाराष्ट्र भाजपला देणार, असे दिसू लागले. राजभवनाच्या वाऱ्या हे भाजपचे उसने अवसान आहे. म्हणून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना आटोक्यात आणण्यात अपयशी झाल्याचे बिंबवण्याचा भाजप पुनःपुन्हा प्रयत्न करत आहे. पवार आणि ठाकरे यांच्यातील मतभेद उघड झाले असले तरी ते धोरणांच्या पातळीवरचे आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेत आलबेल आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या बैठकीला उद्धव यांनी हजेरी लावली. याचा अर्थ भाजपला येनकेन प्रकारे मुख्यमंत्री अपयशी झाल्याचे बिंबवायचे आहे. त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी राजभवनाकडे तक्रारी केल्या जातात. अगदी शिक्षणमंत्री काही बोलले तरी राजभवन त्यावर नाराजी प्रकट करते. लगेच त्यावर विरोधक ओरडत राहतात. गेले सहा महिने राज्यात हेच सुरू आहे. 

संकटाच्या काळात विरोधकांनी सहकार्य करायचे असते, हेच विरोधी भाजप विसरला आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची रोज मागणी होते. याचा अर्थ सरळ आहे. सरकारने कारभार सुधारावा, असे विरोधकांना वाटत नाही, तर त्याची जागा आपण घ्यावी, असे विराेधकांचे स्वप्न आहे. भाजप ज्या ज्या राज्यात पराभूत झाला, त्या त्या राज्यात त्यांचा विधानभवनाचा मार्ग व्हाया राजभवन गेलेला दिसतो. अशा विरोधकांच्या कचाट्यात ठाकरे सरकार किती काळ तग धरेल, ते सांगणे कठीण आहे. पण ‘पिक्चर अभी बाकी है’ इतके मात्र नक्की.

बातम्या आणखी आहेत...