आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देशभरात दसरा साजरा होत आहे. यानिमित्ताने एकाच पक्षाचे दोन मोठे मेळावे मुंबईत होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या गटाची शिवाजी पार्कमध्ये सभा होणार, त्यानंतर बीकेसी पार्कमध्ये शिंदे गट शक्तीप्रदर्शन करणार आहे. शिवसेनेच्या दोन गटांमधील दसरा मेळावा राजकारणाचे व्यासपीठ कसे बनले, हे दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घेणार आहोत. दसरा, शिवाजी पार्क आणि शिवसेनेचा काय संबंध आहे पाहूयात...
दोन शिवसेना, एक मैदान, ससरा मेळाव्यावरुन वाद
या वर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड करून उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून शिंदे आणि उद्धव यांच्यात स्वतःला खरी शिवसेना असल्याचे सिद्ध करण्यासाठी युद्ध सुरू झाले आहे.
पक्षाचे निवडणूक चिन्ह बाण आणि धनुष्य यासाठी दोन्ही गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. आता बीएमसीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, दोन्ही गट पक्षाच्या दसरा मेळाव्याद्वारे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. यावेळी दसरा मेळाव्याचे आयोजन दोन्ही गटांच्या नाकी नऊ आणत आहेत.
इंग्रजांच्या काळात उभारण्यात आले शिवाजी पार्क
शिवाजी पार्क हे मध्य मुंबईतील दादर परिसरात स्थित एक सार्वजनिक मैदान आहे, जे 1.13 लाख चौरस मीटर म्हणजे सुमारे 28 एकरमध्ये विस्तारलेले आहे आणि मुंबईतील सर्वात मोठे मैदान आहे. क्रिकेट नेटपासून ते टेनिस कोर्ट, फुटबॉल खेळपट्ट्या, मल्लखांब आदी खेळांसाठी येथे तयारी करण्यात आलेली आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मैदानाचा राजकीय आणि सामाजिक इतिहास खुप मोठा असल्याने मैदानाला महत्त्व आहे. समुद्राजवळील शिवाजी पार्कचा इतिहास इतका समृद्ध आहे की, लेखिका शांता गोखले यांनी 'शिवाजी पार्क: दादर 28: हिस्ट्री, प्लेसेज, पीपुल' हे पुस्तक लिहिले आहे.
ब्रिटीश राजवटीत 1925 मध्ये बीएमसीने या मैदानाची स्थापना केली होती, त्यानंतर ते माहीम पार्क म्हणून ओळखले जात होते.
1927 मध्ये बीएमसीच्या समुपदेशक आणि स्वातंत्र्यसैनिक अवंतिकाबाई गोखले यांच्या प्रयत्नांमुळे, मराठा साम्राज्याची स्थापना करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या नावावरून या मैदानाचे नामकरण करण्यात आले आणि येथे शिवाजी महाराजांचा पुतळाही बसवण्यात आला.
स्वातंत्र्यापूर्वी येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या सभा आयोजन करण्यात आल्या होत्या. शिवाजी पार्क महाराष्ट्रातील अनेक संस्मरणीय राजकीय चळवळींचे साक्षीदार आहे. 1960 मध्ये येथे झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते केशव सीताराम ठाकरे हेही बॉम्बे स्टेटपासून महाराष्ट्र वेगळे करून नवीन राज्य निर्माण करण्याची मागणी करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये होते.
याच मैदानाजवळ स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्व विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारकही आहे. सावरकर त्याच परिसरात एका बंगल्यात राहत होते.
बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि शिवाजी पार्क यांचे घट्ट नाते
शिवसेना आपल्या स्थापनेपासून म्हणजेच 19 जून 1966 पासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहे. वांद्रे येथील मातोश्री बंगल्यात स्थलांतरित होण्यापूर्वी ठाकरे कुटुंब या उद्यानाच्या परिसरात राहत होते. शिवसेनेचे मुख्यालय असलेले सेना भवन शिवाजी पार्कला लागून आहे. बाळ ठाकरे याला 'शिवतीर्थ' म्हणत असत यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते.
30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनेच्या स्थापनेच्या अवघ्या 4 महिन्यांनंतर, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पक्षाच्या पहिल्या दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी मराठी माणसांना त्यांची ओळख पुन्हा मिळवून देण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून दसरा मेळावा ही शिवसेनेची दरवर्षीची परंपरा बनली आहे.
मात्र, दसऱ्याच्या दिवशी पहिल्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. त्या वेळी 23 ऑक्टोबरला दसरा होता, मात्र दसरा मेळावा 30 ऑक्टोबरला झाला. ठाकरे यांनी त्यांच्या मासिकात या कार्यक्रमाची घोषणा केली होती. मात्र, त्यांना सभेसाठी किती लोक येतील ते माहीत नव्हते.
कमी लोक येण्याची शक्यता असल्याने काहींनी हा कार्यक्रम सभागृहातच घ्यावा, अशी सूचना केली, मात्र ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच सभा घेण्याचा आग्रह धरला.
शिवसेनेच्या इतिहासाचे लेखन करणारे ज्येष्ठ मराठी पत्रकार प्रकाश अकोलकर यांच्या मते, खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनाही पहिल्या मेळाव्याच्या यशाबद्दल खात्री नव्हती, कारण तेव्हा ते केवळ व्यंगचित्रकार आणि एका मासिकाचे संपादक होते, पण त्यांच्या सभेला प्रचंड यश मिळाले.
शिवसेना पहिल्यांदा सत्तेवर आल्यावर मनोहर जोशी यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
महाराष्ट्राच्या राजकारणात बाळसाहेब ठाकरेंचा मान जसजसा वाढला, तसाच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही गर्दी वाढली आणि या मेळाव्याचे महत्त्वही वाढले. परिस्थिती अशी निर्माण झाली की, शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख तारीख ठरली आणि या मेळाव्यातील बाळसाहेब ठाकरे यांची भाषणे पक्षाच्या विचारसरणीचे द्योतक ठरली.
1995 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला पहिल्यांदा बहुमत मिळाले तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी यांनी राजभवनाऐवजी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
2010 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला शिवाजी पार्कला सायलेंट झोन करण्याचे आदेश दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये संपादकीय लिहून न्यायालयाच्या आदेशावर टीका केली. त्यानंतर न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिली.
2012 मध्ये आजारपणामुळे बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर त्यांचे शेवटचं भाषण व्हर्चुअली दिले होते. या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचा रेकॉर्ड केलेला संदेश मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आला होता. आपला मुलगा उद्धव आणि नातू आदित्य ठाकरे यांनाही असाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.
नोव्हेंबर 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाकरे यांच्या अखेरच्या भेटीला सुमारे 15 लाख लोक उपस्थित होते. शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे ‘स्मृतीस्थळ’ नावाचे स्मारक उभारण्यात आले आहे.
2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळे होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापन केली होती. तेव्हा मनसेचा पहिला मेळावाही शिवाजी पार्कवर झाला होता.
दसरा मेळाव्यात उद्धव-शिंदे गट ताकद सिद्ध करण्यात गुंतले
दसरा मेळाव्याआधीच श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि दुर्गापूजेवरून उद्धव आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत. शिवसेनेच्या वारशावर हक्क सांगण्यासाठी धार्मिक सण साजरे करणे हा दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा विषय झाला असल्याचे जाणकारांचे मत आहे.
यामुळेच यावेळी दोन्ही गट आपापल्या दसरा मेळाव्यात जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून त्यांना अधिक जनसमर्थन असल्याचे दाखवता येईल. शिवाजी पार्कमधील बाळसाहेब ठाकरेंच्या सभांचे जुने व्हिडीओ शेअर करून दोन्ही गट स्वत:ला बाळ ठाकरेंच्या वारशाचे योग्य वारसदार म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संख्याबळाच्या बाबतीत शिंदे गट पुढे आहे. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार आणि 18 पैकी 12 खासदार शिंदे यांच्या समर्थनार्थ आहेत. आता खरी मैदानी लढत स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जागा निर्माण करण्याची आहे.
याचे आणखी एक कारण म्हणजे येत्या काही महिन्यांत होणाऱ्या बीएमसीच्या निवडणुका होय.
शिवसेना आपल्या स्थापनेपासूनच लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा वापर करत आहे. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते हर्षल प्रधान म्हणतात- 'बाळासाहेब (ठाकरे) म्हणाले होते की, जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी 80 टक्के समाजकार्य आणि 20 टक्के राजकारण करावे लागेल.
राजकारणाव्यतिरिक्त, शिवाजी पार्कचा क्रिकेटशी देखील संबंध आहे, पुढील ग्राफिकमध्ये पाहा....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.