आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Eknath Shinde Group Vs Aditya Thackeray | Disha Salian Death Case | Rahul Shewale | Devendra Fadnavis

दिव्य मराठी विशेषशिंदे गटाने खरेच आदित्य ठाकरेंची धास्ती घेतलीय का?:आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचे कारण काय? वाचा, खास रिपोर्ट...

विश्वास कोलते3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे आमदार तसेच राज्याचे माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना शिंदे गट आणि भाजपकडून सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सध्या दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांकडून आदित्य यांना लक्ष्य केले जात आहे. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. या प्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना उत्तर देताना, एका 32 वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरले अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंना शिंदे गट आणि भाजपकडून का लक्ष्य केले जात आहे? आदित्य ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे त्यांची खरोखरच धास्ती त्यांनी घेतली आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न दिव्य मराठीने केला आहे...

सर्वात आधी जाणून घेऊया शिंदे गट आणि भाजपच्या आरोपांविषयी...

सर्वप्रथम राहुल शेवाळेंचे आरोप

वर्तमान परिस्थितीत या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना सर्वात आधी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी लक्ष्य केले. त्यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा मुद्दा थेट लोकसभेत उपस्थित करताना रिया चक्रवर्तीला AU या नावाने 44 फोन आले होते. हे AU म्हणजे आदित्य ठाकरेच असल्याचा दावा त्यांनी लोकसभेत करत याच्या चौकशीची मागणी केली होती.(वाचा पूर्ण बातमी)

नितेश राणेंचे आरोप

यानंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनी राज्य विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत दिशाच्या मृत्यूच्या वेळी तेथे कोण मंत्री उपस्थित होते असा सवाल केला. कोणत्या राजकीय दबावापोटी ही केस बंद करण्यात आली? त्या पार्टीत कोण होते? त्या रात्री कुठला मंत्री होता? असा सवाल नितेश राणे यांनी सभागृहात विचारला. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा सभागृहात केली. (वाचा पूर्ण बातमी)

सभागृहाबाहेर घेतले आदित्य ठाकरेंचे नाव

याशिवाय सभागृहाबाहेर बोलताना नितेश राणे म्हणाले की, जेव्हा जेव्हा सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियानच्या मृत्यूचा मुद्दा येतो तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते. याचा अर्थ दाल में कुछ तो काला है. राज्यात इतके राजकारणी आहेत, त्यांचे नाव का घेतले जात नाही असेही नितेश राणे म्हणाले. याशिवाय एकेकाळी मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये असलेल्या राहुल शेवाळेंनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केल्याचेही राणेंनी अधोरेखित केले. विशेष म्हणजे, सभागृहाबाहेर बोलताना राणेंनी थेट आदित्य ठाकरेंचे नाव घेत त्यांना या मुद्द्यावरून लक्ष्य केले.

विशेष म्हणजे या प्रकरणावरून नितेश राणेंनी प्रथमच हे आरोप केले नसून याआधीही त्यांनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचाही दावा केला होता. (वाचा पूर्ण बातमी)

दुसरीकडे सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा मुद्दा भाजप नेत्यांनी सातत्याने उचलून धरल्याचेही बघायला मिळाले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही करण्यात आली होती.

विशेष म्हणजे या प्रकरणाच्या तपासात आदित्य ठाकरेंचे नाव कुठेही समोर आलेले नाही. या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नावासंदर्भात AU असा थेट उल्लेख राहुल शेवाळे यांनीच लोकसभेत केला आहे. प्रत्यक्षात दिशा सालियानचा मृत्यू अपघाती असल्याचा अहवाल तपास संस्थांनी दिला होता. तसेच याचा सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंध नसल्याचेही म्हटले होते.(वाचा पूर्ण बातमी)

आदित्य ठाकरे लक्ष्य का?

1. उद्धव ठाकरेंचे राजकीय वारसदार, शिवसेनेचे पुढचे नेतृत्व

आदित्य ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र तसेच दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. निधनापूर्वीच्या सभेत बोलताना बाळासाहेब ठाकरेंनी 'माझ्या आदित्यसा सांभाळून घ्या' असे जाहीर आवाहन केले होते. त्यामुळे आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरेंचे राजकीय वारसदार असणार यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आदित्य ठाकरेंना मंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे उद्धव यांचा राजकीय वारसा आदित्य ठाकरेच सांभाळतील हे हळूहळू ठळकपणे अधोरेखित व्हायला लागले.

आदित्य यांच्या वाढत्या प्रभावामुळेच बंड?

यानंतर पक्षाची धोरणे आणि निर्णयांतही आदित्य ठाकरेंचा प्रभाव वाढू लागल्याने शिवसेनेच्या पहिल्या फळीतील अनेक नेते दुखावले गेले आणि इथूनच बंडाला चालना मिळाल्याचे राजकीय जाणकारांना वाटते. आदित्य ठाकरेंच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रीय असलेल्या मातब्बर नेत्यांमध्ये साईडलाईन झाल्याची भावना वाढीस लागली आणि त्यातून बंडाची बीजे पेरली गेली असे राजकीय तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळेच आदित्य ठाकरे हे बंडखोर नेत्यांच्या निशाण्यावर येण्यामागे हेच मोठे कारण असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे.

2. स्वच्छ प्रतिमा, युवकांत लोकप्रियतेमुळे भविष्यात मोठे राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता

आदित्य ठाकरे हे विरोधकांच्या निशाण्यावर येण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे, त्यांची स्वच्छ प्रतिमा आणि युवकांमध्ये असलेली लोकप्रियता. आदित्य यांच्या क्लीन इमेजमुळे ते भविष्यात इतर पक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण करू शक्यता असे भाकीत अनेक राजकीय जाणकारांनी याआधीही व्यक्त केले आहे. आदित्य ठाकरेंची बोलण्याची शैली, लोकल ते ग्लोबल समस्यांसह विविध मुद्द्यांवरील अभ्यास यामुळे युवा वर्गात त्यांची नव्या पिढीचा नेता अशी प्रतिमा बघायला मिळते. हीच प्रतिमा ते विरोधकांच्या निशाण्यावर येण्याचे कारण असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.

आता एका ग्राफिक्सद्वारे नजर टाकूया आदित्य ठाकरेंच्या काही जमेच्या बाजूंवर

आदित्य यांची प्रतिमा अद्यापही शाबूत!

वर्तमान स्थितीत दिशा प्रकरणातून विरोधकांकडून केले जाणारे आरोप वगळता आदित्य ठाकरेंवर अजूनतरी व्यापक जनहिताच्या एखाद्या प्रकल्पाविषयी गैरकारभाराविषयीचे कसलेही आरोप झालेले नाही. या प्रकरणाच्या आधीच्या तपासात किंवा चौकशीतही आदित्य ठाकरेंचे नाव अधिकृतरित्या कुठेही समोर आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणातून केल्या जाणाऱ्या आरोपांचे स्वरुप हे सध्या तरी राजकीय आहे. त्यामुळे याने त्यांच्या प्रतिमेला तेवढा धक्का जाण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

आदित्य ठाकरेंची धास्ती घेतलीय का?

मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणतात त्यानुसार शिंदे गटाने किंवा विद्यमान सरकारने त्यांची धास्ती घेतली आहे या दाव्याला समर्थन करण्यासारखे चित्रही दिसत नाही. वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांनुसार आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे उदयोन्मुख लोकप्रिय नेते सध्या दिसत असले तरी त्यांच्या लोकप्रियतेला राजकीय यशाची पोचपावती अजून मिळायची आहे. ही पोचपावती राज्य पातळीवरील मोठ्या निवडणुकीतील विजयातून मिळू शकते. तसे कोणतेही राजकीय यश अद्याप आदित्य ठाकरेंना किंवा त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला मिळालेले नाही. आदित्य ठाकरेंनी अलिकडे केलेल्या राज्याच्या दौऱ्यात त्यांना चांगले जनसमर्थन मिळाल्याचे चित्र दिसले. मात्र त्याचे राजकीय परिणाम समोर आलेले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाची खरी लिटमस टेस्ट मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत होईल. ही निवडणूक जर शिवसेनेने आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात लढवून यश संपादन केले तरंच त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विरोधकांनी त्यांची धास्ती घेतल्याच्या दाव्याला बळ मिळेल. मात्र सध्या तरी असे म्हणणेही अतिशयोक्तीचे ठरेल.

बातम्या आणखी आहेत...