आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Eliminate Disorder, Increase Love! Today Is Children's Day, Let's Give The Weapon Of Love In The Hands Of New Generation!

दिव्य मराठी आवाहन:विखार मिटवू, प्रेम वाढवू! आज बालदिनी, नव्या पिढीच्या हातात प्रेमाचे शस्त्र देऊ!

15 दिवसांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

“खरा तो एकचि धर्म’ हा वारसा महाराष्ट्राला आहे. अनेक धर्म, पंथ इथे आहेत, तरी खरी भाषा प्रेमाची आहे. या प्रेमाच्या भाषेची शिकवण आपल्याला सर्व संतांनी दिली आहे. अनेक संकटे आली, अनेक प्रसंग आले, पण महाराष्ट्र दिमाखात उभा राहिला यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हा वारसा, ही परंपरा. आज थोडा कठीण काळ असला तरी त्यावर आपण निश्चित मात करू अशी आम्हाला खात्री आहे. अशा प्रकारची आव्हाने आपण यापूर्वीही पाहिली आहेत. पण प्रत्येकवेेळी विजयी झाले ते प्रेम. द्वेषाचा आणि विखाराचा कधीच विजय होत नाही हे आपण अनेकदा अनुभवले आहे. आम्हाला खात्री आहे, या कठीण प्रसंगातून आपण निश्चितपणे बाहेर पडू आणि पुन्हा एकदा नव्या तेजाने महाराष्ट्राचा हा स्थायीभाव सिद्ध करू.

खरं म्हणजे, आपल्याला हे नव्या पिढीला सांगावे लागणार आहे, शिकवावे लागणार आहे की, आपला धर्म, पंथ कोणताही असला तरी तुम्ही प्रथमत: माणूस आहात. भारतीय आहात. हे एकदा मनात पक्के झाल्यावर धर्माच्या नावाने दुही माजवण्याचा, विखार निर्माण करण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी इथे त्याला जुमानणार नाही. या विखाराला महाराष्ट्राने कधीच थारा दिलेला नाही. ज्या प्रकारच्या गोष्टी आज घडत आहेत त्यांची चिंता मात्र निश्चित वाटत आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणे गैैर आहे. मुळात प्रत्येक धर्म प्रेमाची शिकवण देतो. प्रेमावर उभा आहे. भाेवतालच्या या प्रसंगांमधून आपण निश्चित मार्ग काढून पुढे जाऊ, याची आम्हाला खात्री आहे.

गाडगेबाबांनी सांगितल्यानुसार आजचा रोकडा धर्म समता आणि ममता आहे. भुकेलेल्याला अन्न देणं हा आहे. कोरोनाच्या काळात आपण हे अनुभवलं. कुणाचा जात-धर्म पाहण्यापेक्षा माणूस म्हणून आपण एकमेकांकडे बघितलं आणि म्हणूनच कोरोनावर आपण मात करू शकलो. कोरोनावर मात करण्याचं मुख्य कारण हेच होतं की जातीधर्माच्या पलीकडचं माणूसपण आपल्याला दिसलं. हाच माणूस आता पुन्हा दिसला पाहिजे. कोरोनाचा विषाणू मारता येेऊ शकतो, पण हा भेदाभेदाचा विषाणू मारण्याचं खरंं आव्हान आपल्या समोर आहे. या विषाणूला मारण्यासाठी आपल्याकडे एकच लस आहे, एकच प्रतिकारशक्ती आहे, ती म्हणजे प्रेम. भेदाभेद अमंगळ हीच आपली शिकवण आहे. म्हणून या भेदाभेदीच्या आहारी न जाता समतेच्या दिशेने, त्या मुक्कामाकडे आपल्याला जायचं आहे. आम्हाला असं वाटतं की हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध या सगळ्या धर्मांचे तत्त्वज्ञान हे प्रेमाची शिकवण देत असेल तर या धर्मांचे अनुयायी एकमेकांच्या विरोधात का उभे राहतात? उपासना पद्धती वेगळ्या असतील, रीतिरिवाजांमध्ये फरक असेल, पण प्रेमाबद्दल कोणत्याही धर्मात मतभेद नाही. प्रत्येक धर्म प्रेमच सांगतो. आजच्या या कठीण काळात आपल्याला प्रेमच तारणार आहे. आज अंधार खूप दिसत आहे, पण तरीसुद्धा अंधाराचे हे जाळं फिटायचं असेल तर प्रेमाची पणती प्रकाशमान करावी लागेल.

अंधार फार झाला, पणती जपून ठेवा.. ही प्रेमाची पणती जपून ठेवल्याशिवाय हा अंधार हटणार नाही. म्हणून “दिव्य मराठी’च्या वतीने सर्वांना आवाहन की, आजच्या या अंधारावर मात करण्यासाठी आपण एकवटलं पाहिजे, सज्ज झालं पाहिजे. कुठल्याही विखाराला थारा देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. कुठल्याही धर्मापेक्षा माणूस असणंं मोठंं आहे, हे आपण यानिमित्ताने पुन्हा सिद्ध केलं पाहिजे. नव्या पिढीपर्यंत आपण हा संस्कार पोहोचवू शकलो नाही तर उद्याचा काळ कठीण असणार आहे. दंगल हा आपला स्वभाव नाही, सद्भाव हा आपला स्वभाव आहे. सामंजस्य, सामोपचार हा आपला स्वभाव आहे. त्यानुसार महाराष्ट्राचे वर्तन असेल याबद्दल आम्हाला खात्री आहे. जे घडलं ते दु:स्वप्न होतं असं मानून पुढे जाऊया आणि नव्या दिशेने झेपावूया.

राज्य संपादक

बातम्या आणखी आहेत...