आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:आणीबाणी

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शस्त्रक्रियेच्या भीतीने लोक घाबरून गेले होते. आरोग्य विभागाची किंवा कुठलीही सरकारी जीप आली, की ते सैरावैरा पळत सुटायचे. आज सुखदेववर वेळ आली. लग्नाच्या दोन दिवसांत. खरं तर तरुण लोकांना ऑपरेशनची सक्ती नव्हती. ज्यांना मूलबाळ नाही, त्यांच्या ऑपरेशनचा तर विषयच नव्हता. कुटुंब नियोजन ज्यांना तीन-चार लेकरं आहेत, त्यांच्यासाठी होतं. पण, सुखदेवच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती...

सु खदेव साधा-सरळ माणूस. दहा एकर जमीन होती. एकुलता एक वारस. अडचण एकच होती. सुखदेवला मूल नव्हतं. पहिल्या बायकोसोबत दहा वर्षे स्वप्न पाहिलं. देव-देव केले, बुवा-बाबा झाले; पण मूल होत नव्हतं. शेवटी पहिल्या बायकोने म्हणजे लतानेच आग्रह केला. तिच्याच मावस बहिणीशी सुखदेवचं लग्न झालं. तो तयार नव्हता. त्याचं लतावर मनापासून प्रेम होतं. पण, तिच्या आग्रहामुळं तो मुलगी बघायला तयार झाला. सकाळी नेहमीप्रमाणं भाजीपाला विकायला बाजारात गेला. तिथं काहीतरी गोंधळ चालू होता. एक माणूस सुखदेवच्या चुलत्याला मारहाण करत होता. सुखदेव मागचा-पुढचा विचार न करता मध्ये पडला. त्या माणसाला दोन-चार थोबाडीत ठेवून दिल्या. चुलत्याला घेऊन तिथून पसार झाला. घरी आला, आंघोळ केली आणि बायकोच्या मावस बहिणीच्या गावी गेला. बैलगाडीत. लताची मावस बहीण तिच्यासारखीच सुंदर होती. न आवडण्याचा विषय नव्हता. घरच्यांची काही अपेक्षा नव्हती. त्यांना फक्त वंशाला दिवा हवा होता. लग्न पक्कं झालं आणि अचानक मावस बहिणीचा मामा आला. सुखदेवच्या लक्षात आलं, की यालाच तर सकाळी बाजारात मारलं आपण. मामा आणि सुखदेव दोघं एकमेकांकडं बघत होते. सुखदेवला माहीतच नव्हतं, की मामा इन्स्पेक्टर आहे. मोठा घोळ झाला होता. मामानं ठरलेलं लग्न मोडलं. सुखदेवला नाही नाही ते बोलला. सुखदेवने दोन दिवस जाऊ दिले. त्यानं लताच्या मावस बहिणीला, गिरिजाला पळवून नेलं. लग्न केलं. घरात कुणाची काही तक्रार नव्हती. लग्न झालं. देव-देव झाले. सुखदेव बायकोसोबत घरी आला. आणि त्याच रात्री गावात गोंधळ सुरू झाला. सरकारी गाडी आली म्हणून लोक ओरडू लागले. आणीबाणी चालू आहे, हे लोकांना ऐकून माहीत होतं. पण, देश स्वतंत्र झाला, हेच अनेक गावांना उशिरा कळलं होतं. मग आणीबाणी तरी कशी कळणार? कळली तरी तिची झळ पोचली नव्हती. पण जिल्ह्याच्या ठिकाणी जाणाऱ्या दोन-चार लोकांना माहीत होतं.. सरकारी गाडी येते आणि लोकांना उचलून नेते. ऑपरेशनसाठी. त्यांनी तसं गावात काही लोकांना सांगितलं. पण, लोकांचा विश्वास बसला नाही. आपण स्वतःहून दवाखान्यात जातो, तरी लवकर डॉक्टर सापडत नाही, हे त्यांना माहीत होतं. आणि सरकार आपल्याला उचलून नेऊन स्वखर्चाने ऑपरेशन कसं करू शकतं? त्यांचा त्यावर विश्वास नव्हता.

आणीबाणीच्या काळातली ही गोष्ट. सरकारने कुटुंब नियोजन मनावर घेतलं होतं. लोकसंख्या नियंत्रणात आणायचीच, अशी शपथ घेतल्यासारख वागत होतं सरकार. मंत्र्यांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांचं टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश होते. मंत्री त्यासाठी अधिकारी लोकांवर दबाव आणायचे. आरोग्य अधिकारी, पोलिस सगळे एकाच कामाला लागल्यासारखे.. कुटुंब नियोजन! बरं, त्या काळात लोकांना अशा गोष्टींवर विश्वास कसा बसणार? देवीचा कोप झाला म्हणून देवी झाल्या, असा भोळा समज होता लोकांचा. शस्त्रक्रियेच्या भीतीने लोक घाबरून गेले होते. आरोग्य विभागाची किंवा कुठलीही सरकारी जीप आली की लोक सैरावैरा पळत सुटायचे. आज सुखदेववर वेळ आली. लग्नाच्या दोन दिवसांत. खरं तर तरुण लोकांना ऑपरेशनची सक्ती नव्हती. ज्यांना मूलबाळ नाही, त्यांच्या ऑपरेशनचा तर विषयच नव्हता. कुटुंब नियोजन ज्यांना तीन-चार लेकरं आहेत, त्यांच्यासाठी होतं. पण, सुखदेवच्या बाबतीत गोष्ट वेगळी होती. गिरिजाचा मामा इन्स्पेक्टर. त्याला न विचारता गिरिजाचं लग्न सुखदेवशी करून दिल्यामुळं तो संतापला होता. भरबाजारात सुखदेवनं त्याला मारलं होतं. खरं तर इन्स्पेक्टर साध्या वेशात होता. सुखदेवला अंदाजही आला नव्हता. पण, चूक झाली होती. आणि आता ती चूक एवढी महागात पडली होती, की इन्स्पेक्टर आता त्याच्या नसबंदीसाठी मागे लागला होता. काहीही झालं तरी सुखदेवची नसबंदी करून त्याला आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. त्यासाठी काहीही करायची तयारी होती त्याची.

सुखदेव बिचारा भलत्याच संकटात अडकला होता. इन्स्पेक्टर सारखा घरी माणसं पाठवायचा. घरात बसणं अवघड झालं होतं. दुसरं असलं तरी नवीन लग्न होतं. लग्न झाल्या झाल्या त्याला घरातून बाहेर पडावं लागलं. लोकांच्या शेतात लपून बसायची वेळ आली. लता आणि गिरिजा मावस बहिणी होत्या म्हणून अडचण नव्हती. नाही तर गिरिजाचा अपशकुन झाला, असंच बोलले असते सगळे. गिरिजाला आपल्या मामामुळं नवऱ्याला एवढा ताप झालाय, याचं वाईट वाटत होतं. पण, मामा ऐकणार नव्हता. भरबाजारातला अपमान विसरणार नव्हता. गिरिजा त्याच्या हातपाया पडून विनंती करत होती, तर मामा म्हणाला, ‘अजूनही घरी चल, तुझं चांगल्या ठिकाणी लग्न लावतो. पण, सुखदेवला माफ करणार नाही.’ मामाचा राग निवळणार नव्हता. सुखदेवला घरी यायची संधी नव्हती. त्याच्या घरावर आणि शेतावर पोलिसांची नजर होती. आता सुखदेव नदी ओलांडून पलीकडच्या गावात जाऊन लपला होता. दिवसभर शेतात लपून राहण्याचा त्याला कंटाळा आला होता. असं किती दिवस लपून राहायचं? किती दिवस घाबरत पळायचं? सुखदेव लोकांना विचारायचा, ही आणीबाणी किती दिवस चालणार? लोक तरी काय सांगणार? कुणी म्हणायचं, आयुष्यभर. कुणी म्हणायचं, वर्षभर. सुखदेव अजूनच खचून जायचा. असंच लपत फिरलो, तर शेतीची पण वाट लागायची आणि घराची पण. हिंमत करून घरी जायला पाहिजे, असं त्यानं ठरवलं. आधी इन्स्पेक्टरला निरोप पाठवला. थोडंफार शेत नावावर करायची तयारी दाखवली. पण, इन्स्पेक्टरने दहापैकी नऊ एकर मागितले. सुखदेव त्यालाही तयार झाला. नऊ एकर नावावर करून दिली. तेवढ्यावर इन्स्पेक्टर झाला अपमान विसरायला तयार झाला. सुखदेव घरी पोचला.

लता सण असल्यासारखा स्वयंपाक करत होती. सुखदेव आंघोळ करून भांग पाडायला आरशासमोर उभा होता. शेणाने सारवलेल्या भिंतीत काच बसवली होती. तोच आरसा. बाजूला खुंटीवर टोपी. सुखदेव कपाळावर गंध लावत होता, तेवढ्यात दोन-तीन पोलिस आले आणि त्याला घेऊन गेले. थेट आरोग्य केंद्रात. बाकी पेशंटला बाजूला करून सुखदेवच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली. इन्स्पेक्टर वेळ घालवायला तयार नव्हता. डॉक्टर घाबरून तयार झाला. सरकारच्या योजनेचं खाली काय होतं, हे डॉक्टर बघत होता. पण, ऑपरेशन करताना सुखदेवने डॉक्टरचे हात धरले. आपल्या हातातल्या अंगठ्या डॉक्टरच्या हातात घातल्या. गळ्यातली सोन्याची साखळी डॉक्टरच्या गळ्यात घातली. होतं नव्हतं सोनं डॉक्टरला दिलं. बाहेर इन्स्पेक्टर वाट बघत होता. डॉक्टरने ‘ऑपरेशन झालं’ म्हणून सांगितलं. सुखदेव डोळ्यात पाणी आणून रडत होता. इन्स्पेक्टर बदला घेतल्याच्या आनंदात घरी गेला. सुखदेवचं ऑपरेशन झाल्याची बातमी गावभर पसरली. सुखदेव गावात येतोय, हे कळल्यावर लोक दारात उभे राहून वाट बघू लागले. मिरवणूक असल्यासारखी गर्दी झाली. सगळ्यांना वाईट वाटत होतं. सुखदेव मान खाली घालून येत होता. सुखदेवची आई, लता आणि गिरिजा घरात रडत होत्या. आईनं असतील नसतील तेवढ्या शिव्या देऊन झाल्या होत्या. त्यानंतर सुखदेव खूप दिवस कुणाला दिसलाच नाही. आणीबाणी संपली. एक दिवस अचानक सुखदेवच्या घरातून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.

सुखदेवला ते सगळं आज पुन्हा आठवत होतं. चाळिशी ओलांडली तरी मुलगा काही करत नव्हता. आज पुन्हा सुखदेवचा मुलगा त्याला म्हणाला होता, ‘शेत नाही, मोठं घर नाही. बाप म्हणून काय केलं तुम्ही माझ्यासाठी?’ सुखदेव अशा वेळी मनात म्हणतो, ‘अजून काय करायचं होतं?’

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...