आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सांगतो ऐका...:गुंता

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रणयचा केसात जीव होता. लहानपणापासून त्याने त्याच्या केसांचं कौतुक ऐकलं होतं. खरं तर अभ्यासात तो सुमारच होता. तब्येत बेतास बात. खेळात काही विशेष नाही. मग येऊन जाऊन कौतुक करायचं तरी कशाचं? केस ही एकमेव गोष्ट होती ज्यामुळे त्याचं कौतुक व्हायचं. प्रणय मनोमन सुखावत जायचा. दिवसाला दोनशे वेळा आपल्या केसात हात फिरवायचा. बायकांना केसांची काळजी घ्यायच्या माहीत नसतील एवढ्या गोष्टी त्याला माहीत होत्या.

प्रणय आरशासमोर बसलाय. तो कौतुकाने आरशात बघून हसतोय. त्याला कारणही तसंच आहे. प्रणय कॉलेजमध्ये असताना त्याचे केस ऋतिक रोशनसारखे होते. त्याने मुद्दाम तशी हेअरस्टाइल केली होती. दिवसातून शेकडो वेळा केसातून हात फिरवायची सवय होती त्याला. येता-जाता कुठल्याही बाइकपाशी, कारपाशी आरसा बघत केस नीटनेटके करणे, हा त्याचा नेहमीचा उद्योग. हळूहळू इंजिनिअरिंग संपलं आणि एकेकाळी मेंदी लावल्यासारखे वाटणारे केस आता पांढरे होऊ लागले होते. सुरुवातीला एखाद-दुसराच दिसणारा पांढरा केस प्रणय अचूक हेरायचा आणि कापून टाकायचा. पण नंतर नंतर काळे केस थोडेफार दिसत होते. बाकी सगळे केस पांढरे होत गेले. प्रणयने लाखभर रुपये तरी वेगवेगळ्या औषधांवर खर्च केले; पण केस पांढरे होणं काही थांबलं नाही. एरवी प्रणयने कदाचित फार टेन्शन घेतलं नसतं. पण, लोकांना काय वाटेल? लोक काय म्हणतील, हा विचार त्याला सतत अस्वस्थ करायचा. खरं तर त्याच्या प्रेयसीला म्हणजे मोहिनीलाही काही वाटत नव्हतं. तिने एखाद - दुसऱ्या वेळी उल्लेख केला असेल त्याच्या पांढऱ्या केसांचा. बाकी तिची काही विशेष तक्रार नव्हती. उलट थोडे थोडे केस पांढरे होत होते तेव्हा ती म्हणाली होती, तुला सॉल्ट ॲन्ड पेपर लूक चांगला दिसतोय! पण, नंतर पेपर उरलंच नाही. फक्त सॉल्ट राहिलं. पांढरे केस. मग प्रणयने केसांना डाय लावायला सुरुवात केली. त्याला त्रास व्हायचा, पण कळायचं नाही. एकदा डाय लावल्यावर मात्र त्याचा अख्खा चेहरा सुजला. केस रंगवणारा पण घाबरून गेला. त्यानेच प्रणयला दवाखान्यात नेलं. दोन दिवस असं का झालं ते लक्षात आलं नाही. पण एक्स्पर्ट डॉक्टरने सांगितलं की प्रणयला डायची ॲलर्जी आहे.

प्रणयपुढे मोठाच प्रश्न निर्माण झाला. हेअर डाय करायचा का नाही? केस रंगवले नाही तर मग तसेच पांढरे केस घेऊन फिरायचं? त्याच्या मनाची बिलकुल तयारी नव्हती. त्याचं सगळ्या गोष्टीतलं लक्ष उडून गेलं. आधीच वर्षभर बेकार राहून कसाबसा जॉब लागला होता. त्यात मन भलत्याच गोष्टीत. खूप शोधाशोध केल्यावर त्याला एक डॉक्टर भेटला. त्याने एक इंजेक्शन सुचवलं. केस रंगवायच्या आधी ते इंजेक्शन घेतलं की चेहरा सुजणार नाही, याची खात्री दिली. प्रणयने धाडस केलं. खरोखरच त्याला काहीच त्रास झाला नाही. प्रणय खुश झाला. मग दरवेळी प्रणय आधी ते इंजेक्शन घ्यायचा आणि मग हेअर डाय करायचा. आपले केस पांढरे झालेत हे लोकांना कळू नये, हे महत्त्वाचं होतंच; पण ते स्वीकारायला त्याचं स्वतःचं मनसुद्धा तयार नव्हतं. मोहिनी खूपदा या गोष्टीवरून त्याची चेष्टा करायची. ‘तू एवढा का विचार करतोस?’ म्हणायची. पण, प्रणयचा केसात जीव होता. लहानपणापासून त्याने त्याच्या केसांचं कौतुक ऐकलं होतं. खरं तर अभ्यासात तो सुमारच होता. तब्येत बेतास बात. खेळात काही विशेष नाही. मग येऊन जाऊन कौतुक करायचं तरी कशाचं? केस ही एकमेव गोष्ट होती ज्यामुळे त्याचं कौतुक व्हायचं. प्रणय मनोमन सुखावत जायचा. शंभर ऐवजी दिवसाला दोनशे वेळा आपल्या केसात हात फिरवायचा. बायकांना केसांची काळजी घ्यायच्या माहीत नसतील एवढ्या गोष्टी त्याला माहीत होत्या. लिंबू, लोणी, बिअर, चहा पावडर, अंडी असे काय काय उपाय प्रणय करत राहायचा. मोहिनी भेटली की विचारायचा, ‘आज केस सिल्की वाटताहेत ना?’ मोहिनी मनातून हसायची. प्रणय अशा वेळी तिला एखाद्या लहान बाळासारखा वाटायचा. खूपदा तिला वाटायचं, की प्रणयने आपल्या केसांवर बोलावं. आपल्या केसांचं कौतुक करावं. तसं कधी झालं नाही. प्रणय तिला केसांसाठी काय करायला पाहिजे, अशा सूचना द्यायचा फक्त. पण मोहिनीचं त्याच्यावर प्रेम होतं. मनापासून. म्हणून प्रणयने त्याला मुंबईत जॉब मिळाल्याचं सांगितलं तेव्हा ती मनोमन निराश झाली. आता नेहमी भेटता येणार नव्हतं. प्रणय मुंबईत गेला. नोकरी ठीकठाक होती. पण तिथून जरा मोठ्या कंपनीची लिंक लागणार होती. अनुभव कामी येणार होता.

मुंबईत प्रणय रमला होता. धावपळीत फार वेळ मिळत नव्हता. लोकलच्या दाराला लटकून उभं राहिलं की केसांची वाट लागते, हे एक त्याला आवडायचं नाही. म्हणून त्याने टोपी वापरायला सुरुवात केली. पण अवघ्या दोन - तीन महिन्यात भलतीच गोष्ट घडू लागली. पाण्यामुळे म्हणा का खाण्यापिण्याची आबाळ होतेय म्हणून म्हणा, पण त्याचे केस वेगात गळू लागले. तीन - चार महिन्यांत ठळक टक्कल दिसू लागलं. कपाळ मोठं दिसू लागलं. एक दिवस कटिंग करणाऱ्याने मागच्या बाजूने आरसा दाखवला आणि प्रणयला आश्चर्याचा धक्का बसला. मागच्या बाजूला पण भलं मोठं टक्कल पडलं होतं! प्रणयला खूप दिवस काहीच सुचत नव्हतं. कामातून लक्ष उडालं होतं. सुटी घेऊन तो दोन-तीन दिवस वेगवेगळ्या डॉक्टरकडे भटकत राहिला. वेगवेगळी औषधं, तेलं विकत घेतली. महिना-दोन महिने ते उपचार करत राहिला. गावी जायची इच्छाच उरली नव्हती. मोहिनी नेहमी विचारायची. पण, काम खूप आहे, असं म्हणून प्रणय टाळत राहिला. तिच्याशी बोलायचाही नाही पूर्वीसारखा. कायम केसांची चिंता. लवकरच त्याच्या लक्षात आलं, की हे उपचार काही कामाचे नाहीत. अशाने केस येणार नाहीत, याची खात्री झाली. त्याला एका चांगल्या डॉक्टरने सांगितलं की चमत्कार वगैरे झाला तरच टकलावर केस उगवतात. बाकी सगळ्या थापा आहेत. त्यापेक्षा हेअर ट्रान्सप्लांट करून घे. प्रणयने आधीही जाहिराती बघितल्या होत्या. आपल्यावर तशी वेळ येईल, असं त्याला वाटलं नव्हतं. पण आता पर्याय नव्हता. दोन-तीन ठिकाणी फोन करून चौकशी केली. भेटी घेतल्या. हेअर ट्रान्सप्लांट साधी गोष्ट नव्हती. महागडी आणि वेळखाऊ प्रोसेस. एवढे पैसे खर्च करून सगळं नीट होईल ना, हा मुद्दा होताच. एका ठिकाणी त्याला माणसं विश्वासाची वाटली. मित्राकडून पैसे उधार घेऊन त्याने हेअर ट्रान्सप्लांट सुरू केलं. कधी कधी वाटायचं की ही वेळखाऊ गोष्ट नको. कधी त्या वेदना त्रास द्यायच्या. त्याला वाटायचं पळून जावं आणि राहावं आहोत तसंच. पण, प्रणयचा आत्मविश्वास म्हणजे त्याचे केस होते. तो तसा राहूच शकत नव्हता. शेवटी खूप दिवस वेळ आणि पैसे खर्च करून त्याने पुन्हा डोक्यावर बळेच केस उगवले. आत्मविश्वासाने गावी गेला. मोहिनीला भेटला. खूप लोक म्हणाले केस वेगळेच दिसताहेत. पण, प्रणय काही बोलला नाही. त्याने मोहिनीला मात्र विचारलं, कशी वाटतेय माझी नवी हेअर स्टाइल? मोहिनी म्हणाली, केस काय आज आहेत, उद्या नाहीत. नाती महत्त्वाची असतात. ती टिकतात. कायम.

अचानक दोन दिवसांत पोटात कळ आली म्हणून प्रणयला दवाखान्यात नेलं घरच्यांनी. कॅन्सर आहे असं कळलं. प्रणयने एवढे पैसे खर्च करून लावलेले केस एका आठवड्यात काढावे लागले. केमोथेरपीमुळे. सुदैवाने प्रणय बरा झाला. मोहिनी सावलीसारखी सोबत होती. त्याची काळजी घेत होती. लवकरच दोघांचं लग्न झालं.प्रणय आरशासमोर बसलाय. त्याला अगदी ठळक टक्कल आहे. तो कौतुकाने आरशात बघून हसतोय. त्याला कारणही तसंच आहे. मोहिनी समोर जमिनीवर बसलीय. प्रणय खुर्चीत हातात तेलाची वाटी घेऊन बसलाय. मोहिनीच्या केसांना तेल लावून देतोय. त्याला मोहिनीचे शब्द आठवतात, ‘केस काय आज आहेत, उद्या नाहीत. नाती महत्त्वाची असतात. ती टिकतात. कायम.’ प्रणय आता स्वतःच्या केसातून हात फिरवू शकत नाही. पण, मोहिनीच्या केसातून हात फिरवताना त्याला जाणीव होते. मोहिनीचे केसही सुंदर आहेत. कधी लक्षच गेलं नाही. आता प्रणय ‘केस गेले’ म्हणत नाही. ‘गुंता सुटला’ म्हणतो...

अरविंद जगताप jarvindas30@gmail.com

बातम्या आणखी आहेत...