आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:डॉक्टर नसलेल्यांनीही लाटली ‘आयुषडॉक्टर फॉर कोविड-१९’ची प्रमाणपत्रे

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • आता प्रमाणपत्रे रद्द करण्याची नामुष्की; ६० हजार डॉक्टर्सना प्रशिक्षित केल्याचा दावा

‘डॉ. सलमान खान, नोंदणी क्रमांक ७७८६७८६’ हे प्रमाणपत्र लटकवून एखाद्याने दवाखाना थाटला असल्यास किंवा उपचार सुरू केले असल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. मुळात बनावट डॉक्टर्सची बजबजपुरी रोखण्याचे कडवे आव्हान असताना आयुष मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या डॉक्टरांसाठीच्या ऑनलाइन प्रशिक्षणाचा गैरफायदा डॉक्टर्स नसलेल्या शेकडो लोकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे आपल्याच अधिकृत सही-शिक्क्याने वितरित करण्यात आलेली ही ‘प्रशिक्षित आयुष डॉक्टर फॉर कोविड - १९’ ची प्रमाणपत्रे अवैध ठरविण्याची नाचक्की आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन या संस्थेवर ओढावली आहे.

नोंदणीकृत आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर्सनाच हे प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळेल, असा नियम या होता. मात्र नोंदणी क्रमांकाच्या पडताळणीसंदर्भातील त्रुटीमुळे इतर लोकांनाही ही प्रमाणपत्र मिळाली होती.

आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर्सनाच प्रशिक्षण

‘प्रशिक्षित आयुष डॉक्टर फॉर कोविड - १९’ या ३ तासांच्या कोर्समध्ये ६० हजार डॉक्टर्सना प्रशिक्षित केल्याचा कौन्सिलचा दावा आहे. कौन्सिलकडे नोंदणी करण्यात आलेल्याच आयुर्वेद आणि युनानी डॉक्टर्सनाच हे प्रशिक्षण व प्रमाणपत्र मिळेल, असे स्पष्ट निर्देश त्यात देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी करीत असताना कौन्सिलकडे नोंदणी केलेला क्रमांकाशी पडताळणी न करण्याची तांत्रिक त्रुटी यात राहिली होती. परिणामी कोणत्याही नावाने व कोणत्याही बनावट क्रमांकाने केलेल्या नोंदणी केलेल्यांना ‘प्रशिक्षित आयुष डॉक्टर फॉर कोविड १९’ ही प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील अवैध बजबजपुरीस खतपाणी

कौन्सिलच्या या तांत्रिक तृटीचा गैरफायदा घेऊन अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या नावापुढे ‘डॉ.’ असलेली ही प्रमाणपत्रे मिळविली असून वैद्यकीय क्षेत्रातील अवैध बजबजपुरीस यामुळे खतपाणी मिळाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. आयुष मंत्रालय आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनच्या अधिकृत सही शिक्क्याने वितरित झालेल्या या प्रमाणपत्रांचा रजिस्ट्रार डॉ. दिलीप वानगे आणि अध्यक्ष डॉ. अाशुतोष गुप्ता यांच्या सह्या आहेत.

घाईने घेतलेल्या कार्यक्रमामुळे घोळ

कौन्सिलकडे नोंदणी झालेल्या, नूतनीकरण केलेल्या डॉक्टरांचा डाटा उपलब्ध होता. त्यांनाच या प्रशिक्षणात समाविष्ट करणे शक्य होते, मात्र कौन्सिलने घाईने घेतलेल्या कार्यक्रमामुळे हा घोळ झाला आहे. यावर कारवाई करण्याची मागणी मी शासनाकडे केली आहे. - डॉ. सुधाकर मोहिते, माजी अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र

गैरवापर करणाऱ्यांची प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आली आहेत

शासनाच्या निर्देशानुसार परिषदेने हा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविला होता. प्रशिक्षण नोंदणीकृत डॉक्टरांसाठीच असल्याच्या सुस्पष्ट सूचना वेबसाइटवर होत्या. काही लोकांनी याचा दुरुपयोग करून खोट्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. त्यांची प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली असून एसएमएसच्या माध्यमातून त्यांना कळवण्यात आले आहे. - डॉ. अाशुतोष गुप्ता, अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन

काय होता अभ्यासक्रम

कोविड-१९ च्या प्रसारानंतर त्याचा प्रतिबंध व उपचार यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण कोर्स डिझाइन करण्यात आला होता. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन आणि आयुष संचलनालयाच्या वतीने तो महाराष्ट्रात घेण्यात आला. आयुष मंत्रालयाने दिलेल्या ऑडिओ-व्हिज्युअल मटेरिअलच्या आधारे महाराष्ट्र इंडियन मेडीसीन कौन्सिलने हा अभ्यासक्रम तयार केला होता.

बातम्या आणखी आहेत...