आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटची पंचविशी:बिछडे सभी बारी बारी...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सॅबी परेरा

इंटरनेट आणि कम्युनिकेशन या दोन क्षेत्रांनी जी डिजिटल क्रांती घडवून आणली त्यामुळे जगाचा चेहरामोहरा बदलून गेला असं (इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट करून पीएचडी झालेले लोक) म्हणत असले तरी ह्याच डिजिटल क्रांतीने सामान्य माणसांच्या आयुष्यातील छोटे मोठे किती आनंद हिरावून घेतले ह्याची गणतीच नाही.

पंचवीस वर्षांपूर्वी म्हणजे १५ ऑगस्ट १९९५ साली भारतात इंटरनेटचा आणि त्याचं अपत्य असलेल्या ईमेलचा शुभारंभ झाला. घर, गाव, गल्ली, पोस्ट, तालुका, जिल्हा आणि पिन कोड असा लांबलचक असणारा आपला पत्ता आक्रसून अवघ्या काही शब्दांत सामावला. सध्याच्या बाजाराधिष्टित व्यवस्थेत योग्य भाव मिळाल्यास प्रत्येकजण विकाऊ आहे हे दर्शविणारं @ (at the Rate) हे संकेतचिन्ह आपल्या नव्या पत्त्याचं अविभाज्य अंग बनलं. राजकारणी लोकांनी तर सर्वसामान्य जनतेसाठी TakenAsGranted.com ही कायमस्वरूपी वेबसाईटच तयार करवून घेतली असावी अशी मला शंका आहे.

इंटरनेट आणि कम्युनिकेशन या दोन क्षेत्रांनी जी डिजिटल क्रांती घडवून आणली त्यामुळे जगाचा चेहरामोहरा बदलून गेला असं (इंटरनेटवरून कॉपी-पेस्ट करून पीएचडी झालेले लोक) म्हणत असले तरी ह्याच डिजिटल क्रांतीने सामान्य माणसांच्या आयुष्यातील छोटे मोठे किती आनंद हिरावून घेतले ह्याची गणतीच नाही. लहानपणी ज्याच्याकडे इंग्लिश-मराठी डिक्शनरी असायची तो आमच्या लेखी हुशार असायचा आणि ज्याच्याकडे एन्सायक्लोपिडीया असायचा तो तर विद्वानच गणला जायचा. डिक्शनरी आणि एन्सायक्लोपिडीया या दोन गोष्टींवरच ज्यांना आपल्या विद्वत्तेचा डिंडिम वाजविता यायचा त्या गावोगावच्या मास्तर आणि तत्सम लोकांसाठी इंटरनेट हे एखाद्या त्सुनामीइतकेच प्रलयंकारी ठरले आहे.

एकेकाळी, गावातील एखाद-दुसरा पेपर वाचण्या इतपत शिकलेला इसम, नियमित तालुक्याच्या गावी जाणारा पाटील किंवा सरपंच गावच्या चावडीवर बसून लंब्याचौड्या बाता मारायचे तेव्हा त्यांचं म्हणणं खोडून काढण्याइतकी कुणाकडे खात्रीलायक माहितीही नसायची आणि हिम्मतही नसायची (सत्तेच्या तख्तावरून धडधडीत खोटंनाटं फेकणाऱ्याला तोंडावर सांगायची हिम्मत आपल्यात आजही नसली, तरी तो फेकतोय हे कळण्याइतकी माहिती इंटरनेटच्या कृपेने आपल्याकडे असते). अशा हजारो लोकांच्या विद्वत्तेचा तोरा आणि सत्तेचा माज मोडून त्यांना दुःखाच्या खाईत लोटण्यात इंटरनेटचाच हात आहे. एखादं पुस्तक हवं असेल तर त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं, प्रकाशकाचं नाव, ते मिळू शकेल अशा व्यक्ती, दुकान, लायब्ररीचा ठावठिकाणा या सुरुवातीच्या गोष्टी जितक्या वेळखाऊ आणि जिकिरीच्या तितकी त्या पुस्तकाच्या वाचनात खुमारी वाढायची. रिकामी कॅसेट नाक्यावरच्या दुकानदाराकडे देऊन त्याच्याकडून हवी असलेली गाणी भरून घेणे. ती गाणी भरून

मिळेपर्यंत रोज दुकानात चकरा मारणे आणि इतकं करूनही आपल्याला हवी ती सर्व गाणी मिळण्याची गॅरंटी नसणे यामुळे त्या गीतकारांना, गायकांना, संगीतकारांना आपल्या लेखी जो मानसन्मान होता तो अलेक्सा आणि सिरीच्या तालावर गाणाऱ्या, नाचणाऱ्या आजच्या कलाकारांना कसा मिळेल?

इंटरनेटने आणि मोबाईलने म्हणे लोकांचं जीवन सुखकर केलं. असेल, अरे पण आज सगळ्यांच्याच हातात गुगल, युट्युब, न्यूज चॅनेल्स असलेले मोबाईल आल्यामुळे आमचं चारचौघात थापा मारण्याचं सुख हिरावलं गेलं त्याचं काय? टेलिफोन डिरेक्टऱ्या विकणाऱ्या टेलिफोन कंपन्यांचा धंदा बुडाला त्याचं काय? येलो-पेजेस नावाचे पुस्तकाचे धूड छापणाऱ्या कंपन्या बुडाल्या त्याचे काय? एम्लॉयमेंट एक्स्चेंजमधे नाव नोंदविण्यासाठी, कॉल काढण्यासाठी आणि नोकरीची सेटिंग लावण्यासाठी जो टेबलाखालून पैशाचा व्यवहार चालायचा त्या सर्व गरीब सरकारी नोकरांच्या कमाईवर जे गंडांतर आले त्याचे काय? स्क्रीनवरच खेळायचं व्यसन लावून पोरापारांचा मैदानात खेळायचा आनंद हिसकावला त्याचं काय? दहा दुकानात फिरून, पन्नास साड्या ट्राय करून काहीच खरेदी न करता केवळ विंडो शॉपिंग करण्याचं महिलांचं स्वातंत्र्य नष्ट झालं त्याचं काय? गुटखाबंदीमुळे धंद्यावर झालेल्या परिणामापेक्षा, सगळे लोक GPS वापरू लागल्याने रस्त्यावर पत्ता शोधणाऱ्या जनतेच्या सामाजिक जीवनातून आपण बाद झालो या गोष्टीचा पानटपरीवाल्यांच्या मानसिक आरोग्यावर जो परिणाम झालाय त्याचं काय? दिवस, वेळ, ठिकाण हे सारं आगावू ठरवून भेटण्याची शिस्त हरवली त्याचं काय? ठरल्या जागी, ठरल्या वेळी, ठरलेली व्यक्ती पोहोचली नाही तर अमर्याद काळपर्यंत वाट पाहण्याचा संयम राहिला नाही त्याचं काय? प्रियकराने आपल्या हाताने, निळ्या शाईने (तर कधी रक्तानेही) लिहिलेल्या पत्रासोबत जो एक धुंदावणारा गंध यायचा, नादावणारं संगीत यायचं, प्रेमाचा कवडसा यायचा, आशेची झुळूक यायची, पत्रासोबत जगण्याचं कारण यायचं. ईमेल नोटिफिकेशन्सच्या निर्जीव लाल ठिपक्याखाली या साऱ्या जिवंत भावना दबल्या गेल्या त्याचं काय?

पूर्वी वर्षोनुवर्षे दूरगावी असणाऱ्या आपल्या आप्ताला पाहणे, त्याच्याशी बोलणे सोडाच त्याची पत्रं मिळायलाही महिने-महिने लागायचे. आता इंटरनेटच्या काळात कुणाची आठवण आणून डोळ्यात पाणी यायचा काळ राहिला नाही. (आठवणीच्या जागी ग्लिसरीन आलंय) आता मनात आलं की हवं त्याला व्हिडीओ कॉल करता येतो, बोलता येतं, पाहता येतं. फक्त नेटवर्क पाहिजे... मोबाइलमधे अन दोन मनामध्ये! सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूर्वी ज्या कामाला आठवडे, महिने, वर्षे लागायची ती कामं आता इंटरनेट, ईमेल आणि मोबाईल मुळे चुटकीसरशी व्हायला लागली असं आपण म्हणतो खरे, पण मग हा इंटरनेटमुळे वाचलेला शेकडो-हजारो तासांचा वेळ नक्की आहे तरी कुणाकडे हे एकदा गुगल करून पाहायला हवं!

sebestian.pereira@ril.com
संपर्क- 9987872554

बातम्या आणखी आहेत...