आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Companies Like Amul And Parle Were Horrified By The Decision To Ban The Use Of Plastics Once; What Will Brands Like Frutti, Appe Do?

दिव्य मराठी एक्सप्लेनर:सिंगल युज प्लास्टिक बंदीमुळे अमूल, पार्लेसारख्या कंपन्या घाबरल्या; फ्रूटी, अ‍ॅपीसारखे ब्रँड काय करणार?

नीरज सिंग/अनुराग आनंद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

1 जुलै 2022 पासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी आणि अ‍ॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय कंपन्यांवर संकट कोसळले आहे. यामुळेच कोका कोला, पेप्सिको, पार्ले, अमूल आणि डाबरसारख्या बेव्हरेज कंपन्या हा निर्णय बदलण्यासाठी भारत सरकारवर दबाव आणत आहेत.

या पार्श्वभूमीवर आजच्या एक्सप्लेनरमध्ये आम्ही तुम्हाला सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय आणि ते कसे धोकादायक आहे? सरकारला बंदी का घालायची आहे? कोका कोला, पेप्सिको, पार्ले, अमूल या कंपन्या बंदीला विरोध का करत आहेत? याची माहिती देत आहोत.

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय?

नावाप्रमाणेच सिंगल-यूज प्लॅस्टिक हे असे उत्पादन आहे, जे एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावे लागते. त्याची सहजासहजी विल्हेवाट लावता येत नाही. तसेच त्याचा पुनर्वापर करता येत नाही. यामुळेच प्रदूषण वाढवण्यात एकेरी किंवा एकदा वापराचे प्लास्टिक महत्त्वाची भूमिका बजावते.

१ जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिकच्या या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅनरचा समावेश आहे. मिठाईच्या बॉक्समध्ये वापरण्यात येणारे फुगे, झेंडे, कँडी, इअर बड स्टिक्स आणि क्लिंग रॅप यांचाही समावेश आहे. एवढेच नाही तर 31 डिसेंबर 2022 पासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवरही बंदी घालण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालणे महत्त्वाचे का?

देशात प्रदूषण पसरवणारा प्लास्टिक कचरा हा सर्वात मोठा घटक आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, 2018-19 मध्ये देशात 30.59 लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला आणि 2019-20 मध्ये 34 लाख टनांपेक्षा जास्त. प्लास्टिक विघटित होत नाही किंवा ते जाळले जाऊ शकत नाही, कारण ते विषारी धूर आणि हानिकारक वायू सोडते. अशा परिस्थितीत, पुनर्वापर करण्याशिवाय स्टोरेज हा एकमेव मार्ग आहे.

प्लास्टिक वेगवेगळ्या मार्गाने नदी आणि समुद्रापर्यंत पोहोचते. एवढेच नाही तर प्लास्टिक सूक्ष्म कणांमध्ये मोडते आणि पाण्यात मिसळते, ज्याला आपण मायक्रोप्लास्टिक म्हणतो. अशा परिस्थितीत नदी आणि समुद्राचे पाणीही प्रदूषित होते. यामुळेच प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घातल्याने भारत प्लास्टिक कचरा निर्मितीचे आकडे कमी करू शकेल.

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) नुसार, जगातील निम्म्याहून अधिक प्लास्टिक फक्त एकदाच वापरता येईल असे आहे. यामुळेच जगात दरवर्षी सुमारे 300 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. 1950 च्या दशकात प्लास्टिकचा वापर सुरू झाल्यापासून 8.3 अब्ज मेट्रिक टन प्लास्टिकचे उत्पादन झाले आहे.

अमूल आणि पार्लेसारख्या कंपन्यांचा बंदीला विरोध का?

अमूल आणि पार्लेसारख्या बड्या कंपन्या 1 जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिक बंदीला विरोध करत आहेत. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमूल कंपनीच्या फ्रूटी आणि अ‍ॅपीसह 10 उत्पादनांसाठी दररोज 15 ते 20 लाख प्लास्टिक स्ट्रॉ लागतात. त्याचप्रमाणे पार्ले अ‍ॅग्रो आणि डाबरसारख्या कंपन्यांनाही दररोज लाखो स्ट्रॉची गरज भासते. अशा परिस्थितीत या कंपन्या या 3 कारणांमुळे सिंगल यूज प्लास्टिक बंदीला विरोध करत आहेत…

1. पेपर स्ट्रॉ सहज उपलब्ध नसणे.

2. कागदाच्या स्ट्रॉची किंमत प्लास्टिकच्या स्ट्रॉपेक्षा 5 ते 7 पट जास्त आहे.

3. पेपर स्ट्रॉ बनवण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी काही कालावधीची लागणार आहे.

पार्ले, डाबर आणि अमूल सारख्या मोठ्या शीतपेय कंपन्यांची संघटना असलेल्या अ‍ॅक्शन अलायन्स फॉर रिसायकलिंग बेव्हरेज कार्टन (AARC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण अग्रवाल म्हणाले की, ‘ज्या कालावधीत सर्वाधिक मागणी असते अशा काळातच ही बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे मला ग्राहकांची अडचण होणार असल्याबाबत काळजी वाटतेय. कंपन्या 5 ते 7 पट जास्त किंमत देऊन प्लास्टिक स्ट्रॉ खरेदी करण्यास तयार आहेत, परंतु ते बाजारात उपलब्ध नाहीत.’

सिंगल यूज प्लास्टिकला पर्याय काय?

जेव्हा सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली जाते तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे पर्याय असू शकतात. उदाहरणार्थ, प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ ऐवजी, कागदाचे स्ट्रॉ. त्याचप्रमाणे बांबूपासून बनवलेले स्टीक, बांबूपासून बनवलेल्या आईस्क्रीमच्या काड्या, कागद आणि कापडापासून बनवलेले ध्वज, पारंपरिक मातीची भांडी इत्यादींचा वापर सिंगल-यूज प्लास्टिकच्या जागी करता येईल.

सिंगल यूज प्लास्टिक बंदी तेव्हाच यशस्वी होईल, जेव्हा सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होईल आणि सिंगल यूज प्लास्टिकचे अन्य पर्याय लोकांसमोर सहज उपलब्ध होतील, असे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. यासोबतच ज्या प्लास्टिकचा सहज पनर्वापर शक्य आहे, असे प्लास्टिक कोणत्याही वस्तूमध्ये वापरता येईल.

जगातील इतर कोणत्या देशात यावर बंदीे?

जगभरातील अनेक सरकारे सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कठोर निर्णय घेत आहेत. तैवानने 2019 पासून प्लास्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ, भांडी आणि कपवर बंदी घातलेली आहे.

दक्षिण कोरियाने मोठ्या सुपरमार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी घातली आहे. यासोबतच या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सुमारे दोन लाखांचा दंड वसूल करण्यात येतो.

भारताचा शेजारी देश बांगलादेशनेही 2002 मध्ये सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली होती. केनिया, यूके, तैवान, न्यूझीलंड, कॅनडा, फ्रान्स आणि यूएस या देशांमध्येही काही अटींसह एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...