आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुलाबाची निर्यात ठप्प, फुलशेतीला शंभर कोटी रुपयांचा फटका

प्रिया सरीकर|काेल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत फुलशेती, गुलाबांपैकी 70 टक्के होते निर्यात

फुलांचा राजा गुलाबाला सर्वत्र मोठी मागणी असते. जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात गुलाबाच्या मोठ्या बागा आहेत. गेल्या काही वर्षांत गुलाबासोबत जर्बेराची परदेशात निर्यात केली जात आहे. परंतु कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांत लाॅकडाऊनचा मोठा फटका फुलशेतीला बसला आहे. परदेशातील निर्यात थांबली आहे. प्रार्थनास्थळे बंद आहेत. सण-उत्सव होत नाहीत. फुले काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी गुलाबाला कचऱ्याची किंमत मिळत आहे.

परदेशात होणारी फुलांची निर्यात थांबल्याने गुलाब, जर्बेरासारख्या सजावटीच्या फुलांना थेट कचराकुुंडीत जागा मिळू लागली आहे. गेल्या पाच महिन्यांत जवळपास शंभर कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे.फुलशेतीला पोषक वातावरण वातावरण लाभल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात अनेक गावांत मोठ्या संख्येने ग्रीनहाऊस आणि पॉलिहाऊसची उभारणी झाली. विशेषत: परदेशी फुलांची लागवड येथे होऊ लागली. जर्बेरा, कॉर्नेशन, ऑर्किड, जिप्सेेफिला ही फुलेही उत्पादित केली जातात. घोडावत ग्रुप आणि श्रीवर्धन बायोटेक हे दोन मोठे फुलशेती प्रकल्प वगळून वीसहून अधिक पॉलिहाऊस या भागात आहेत. शिरोळ, कोंडीगरे, चिपरी, नांदणी यासह कागल आणि वडगाव येथेही फुलशेती होते. उत्पादित फुलांपैकी ७० % गुलाब निर्यात होतो. यूके,जपानला दरमहा २० ते २५ लाख गुलाब जिल्ह्यातून रवाना होतात.

सलग दोन वर्षे नुकसान

२०१९ मध्ये शिरोळला महापुराचा फटका बसला होता. यामध्ये फुलशेतीचेही नुकसान झाले. नोव्हेंबर २०१९ पासून हा व्यवसाय परदेशी निर्यातीसाठी सज्ज झाला होता. पुढे पुन्हा कोरोनामुळे सगळे ठप्प झाले. पाच महिने निर्यात बंद असली तरी उत्पादन सुरू आहे. पण त्यातही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे श्रीवर्धन बायोटेकचे रमेश पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...