आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Expose | State Government Stinginess In Spending On Corona; Only Rs 172 Crore Was Spent From The Disaster Fund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनावर खर्च करताना राज्य सरकारची कंजुषी; आपत्ती निधीतून खर्च केले फक्त 172 कोटी

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
  • 154 कोटींचा प्रस्ताव राज्य अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला, मंत्री म्हणतात - कोरोनासाठी स्वतंत्र निधी मिळाला नाही

कोरोनाच्या मदत निधी वरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, एवढ्या गंभीर आपत्तीच्या काळात राज्य सरकारने गेल्या दोन महिन्यात फक्त १७२ कोटी रुपये खर्च केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे येत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १६११ कोटींचा पहिला हप्ता पाठविला असतानाही, राज्य शासनाने त्यातील फक्त १७२ कोटींचा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून खर्च केला आहे. १५४ कोटींच्या निधीचे प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीच्या वाटेवर आहेत. तरतुदीनुसार कोरोनासाठी १४७० कोटींचा खर्च करण्याची मुभा असताना केवळ एकूण ३२६ कोटी रुपयेच कोरोनासाठी वापरल्याचे स्पष्ट होत आहे. 

केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यानुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत आहेत. महाराष्ट्रात मात्र, हे प्राधिकरणच स्थापन न केल्याने, राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. यंदा महाराष्ट्राने ४२०० कोटींचा वार्षिक आपत्ती व्यवस्थापन निधीचा आराखडा केंद्रीय प्राधिकारणाला पाठविला होता. त्यांनी तो मंजूर केला असून यातील ७५ टक्के निधी केंद्र सरकारने तर २५ टक्के निधी राज्य सरकारने खर्च करणे अपेक्षित आहे. यानुसार केंद्राच्या वाट्याला ३,१५० कोटी रुपये येतात तर राज्याच्या वाट्याला १, ०५० कोटी. यातही कोरोनासाठी फक्त ३५ टक्के निधी खर्च करण्याची अट राष्ट्रीय प्राधिकरणाने घातली आहे. त्यानुसार महाराष्ट्र सरकार १ हजार ४७० कोटी निधी वरून आपत्तीत खर्च करू शकते. केंद्र सरकारकडून त्यांच्या वाट्याच्या पहिल्या हप्त्याचे १६११ कोटी राज्याला मिळालेही आहेत, मात्र त्यापैकी गेल्या दोन महिन्यात फक्त १७२ कोटी राज्य सरकारने खर्च केला आहे. १५४ कोटींचे प्रस्ताव अर्थ खात्याकडे प्रलंबित असून येत्या दोन महिन्यात राज्य शासनाने एकूण ३२६ कोटी खर्च केला आहे. त्यामुळे एकूण १,४७० कोटी खर्चाची तरतूद असताना केंद्राकडून मिळालेल्या १६११ कोटींमधून हा निधी खर्च का केला नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विलगीकरण कक्षाची सोय, कर्मचाऱ्यांची सुरक्षा साधने यासारख्या या आपत्तीतील अत्यावश्यक साधनांची टंचाई भासत असताना राज्य सरकारची ही कंजुषी किंवा कारभारातील ढिलाई अनाकलनीय आहे.

३५ टक्के खर्चाच्या अटीमुळे अडचणी येत आहेत : विजय वडेट्टीवार

राष्ट्रीय प्राधिकरणाचा प्राप्त झालेला पहिला हप्ता हा आपत्ती व्यवस्थापनाच्या एकूण खर्चापैकी आहे. त्यातून वर्षभरातील आपत्तींचे नियोजन करायचे असते. प्राप्त झालेल्या निधीपैकी फक्त ३५ टक्के निधीच कोरोनावर खर्च करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अडचणी येत आहेत. कोरोनासाठी स्वतंत्रपणे केंद्र सरकारने एक रुपयाचाही स्वतंत्र निधी दिलेला नाही.

केंद्राने दिलेले १६०० कोटी खर्च का केले नाही ? : देवेंद्र फडणवीस 

राज्याचा हा ४२०० कोटींचा आराखडा मार्च २०२१ पर्यंतचा आहे. त्यापैकी १६०० कोटींचा निधी हा केंद्र सरकारने आगाऊ हप्ता दिला आहे. त्यामुळे त्यातून राज्य शासन अद्याप खर्च का करीत नाही याचे उत्तर त्यांनी देणे गरजेचे आहे. दिलेल्या निधीतून खर्च केला जात नाही आणि प्रलंबित निधीबद्दल विनाकारण ओरड करणे आजच्या परिस्थितीत संयुक्तिक नाही.

आपत्ती प्राधिकरणच स्थापन केले नाही...

केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तर इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत आहेत. महाराष्ट्रात मात्र हे प्राधिकरणच स्थापन न केल्याने राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती कार्यरत आहे.

आपत्ती व्यवस्थापन निधीचा ताळेबंद

> राज्यासाठी दरवर्षी मिळणारा एकूण निधी ४२०० कोटी रु. > यापैकी ७५% केंद्र तर राज्य सरकारचा वाटा २५ टक्के.

केंद्र सरकारने दिले १,६११ कोटी रु.

कोरोनावर राज्याचा प्रत्यक्ष खर्च

कोरोनासाठी खर्चाची अट एकूण निधी ४२०० कोटींच्या ३५ टक्के अर्थात १,४७० कोटी रु. मात्र राज्य सरकारने आतापर्यंत खर्च केले फक्त १७२ कोटी रुपये. १५४ कोटी खर्चाचे प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे. याचाच अर्थ आजतागायत कोरोना खर्च एकूण रक्कम ३२६ कोटी. आपत्ती निधी खर्च १४७० - ३२६ शिल्लक रक्कम १,१४४ कोटी रु.

बातम्या आणखी आहेत...