आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आडगाव सरग येथील अल्पभूधारक शेतकरी रुस्तुम पठाडे २७ डिसेंबर रोजी शेतात बकऱ्या चारत असताना विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला चिकटून गंभीर जखमी झाले होते. ८ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांची झुंझ संपली. महावितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा बळी घेतला आहे. दुसरा बळी जावू नये व अपघातग्रस्त कुटुंबीयांना मदत मिळावी, यासाठी ९ जानेवारीला नातेवाईक व गावकऱ्यांनी सकाळी ७ वाजताच घाटीत दाखल झाले होते. पोस्टमार्टम झाल्यानंतर मृतदेहच महावितरण कार्यालयात घेऊन जाणार होते. याची माहिती प्रशासनास लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. महावितरण अधिकाऱ्यांनी लेखी सर्व मागण्या मान्य केल्यानंतरच गावकऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व तणावग्रस्त वातावरण निवळले.
रुस्तुम अत्यल्प भूधारक शेतकरी आहे. काबड कष्ट करून त्यांनी दोन मुलींचे विवाह केले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांचे दोन मुले व पत्नी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत करत असत. मोठा मुलगा आयटीआय झालेला असून दुसरा पाचव्या वर्गात शिकतोय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बकऱ्या पाळलेल्या आहेत. २७ डिसेंबर रोजी रुस्तुम गट क्रमांक ८९ मध्ये शेतात बकऱ्या चारत होते. शेतातून ११ केव्ही विजेची तार गेलेली आहे. त्या तारेच्या खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता. रुस्तुम यांचा हात त्या खांबाला लागताच ते खांबाला चिकटले. यावेळी मोठा आवाज झाला होता. यामुळे शेतातील इतर शेतकरी त्यांच्या मदतीला धावले. सुज्ञ शेतकऱ्यांनी वाळलेल्या लाकडाने त्यांना बाजूला करून गंभीर भाजलेल्या अवस्थेतच त्वरित बेंबडे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च पेलवत नव्हता व महावितरणने कोणतीच मदत करत नसल्याने नातेवाइकांनी त्यांना घाटीत दाखल केले होते. विजेचा जबर शॉकमध्ये डावा हात निकामी झाला होता व कंबरेपासून पाय काम करत नव्हते. अंग ५० टक्क्यावर भाजले होते. दररोज त्यांचा जीवनमरणाशी खेळ सुरु होता तो अखेर ८ जानेवारी रोजी संपला.
मदतीसाठी नातेवाईक व गावकऱ्यांचा चार तास ठिय्या
अपघातग्रस्त रुस्तुम यांच्या उपचारासाठी महावितरणने तातडीने मदत केली नाही. नातेवाइकांचे म्हणने डावलून लावले. त्यांच्या मृत्यूला महावितरणचा गलथान कारभार जबाबदार असून घराचा आधारवाड गेल्याने त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळावी म्हणून नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी एकत्रित येऊन पोस्टमार्टम नंतर मृतदेह महावितरणच्या कार्यालयात नेण्याची तयारी केली होती. मात्र, याची कुणकुण महावितरण व पोलिसांना लागली व त्यांनी काही वेळेतच घाटीत ढेरा दाखल केला. सहा पोलिस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलिस तैनात करून गावकऱ्यांवर डोळ्यात तेल घालून पहारा देत होते.
या वेळी एसीपी व पोलिस निरीक्षक संभाजी पवार व इतर अधिकाऱ्यांनी अर्जून पठाडे व गावकऱ्यांशी सुसंवाद साधला. तनावपूर्ण वातावरण निवळले. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे करून तुमच्या मागण्या त्यांना कळवतो. व्यवस्थापकीय संचालकांशी भेट घालून देतो, तुम्ही डेड बॉडी महावितरणमध्ये घेऊन जावू नये, अशा प्रकारची समन्वयाची भूमिका घेतली. त्यामुळे पुढील आक्रमक झालेले गावकरी शांत झाले. सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत गावकऱ्यांनी घाटीमध्ये ठिय्या दिला.
मृत्यूनंतर चार लाखांची मदत, नोकरीत सामावून घेणार
पोलिसांची समन्वयाची भूमिका आणि महाविरणचे कार्यकारी अभियंता जितेंद्र वाघमारे, उपकार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर, उपव्यवस्थापक तुषार भोसले व कर्मचारी विजय नवघरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांचे म्हणने पहिले एकुण घेतले. या वेळी अर्जून पठाडे, संतोष पठाडे, रामेश्वर पठाडे आणि गावकऱ्यांनी लाईमन एेकत नाही, अरेरावीची भाषा वापरतो. संबंधित अभियंता दखल घेत नाही आम्ही शेतकऱ्यांनी असेच मरायचे का? असा प्रश्न उपस्थित करून दोषींना निलंबित करण्याची मागणी केली असता ती कार्यकारी अभियंता वाघमारेंनी तातडीने मान्य केली. याच बरोबर उर्वरित मागण्यातील अपघातग्रस्त कुटुंबियांना अंत्यविधीसाठी नगदी २० हजार दिले. तसेच चार लाख रूपये आर्थिक नुकसान भरपाई व मुलाला नोकरीत सामवून घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाइक व गावकऱ्यांनी मृत्यूदेह ताब्यात घेतला. दरम्यान उपचारासाठी महावितरणने तातडीने मदत केली असती तर कदाचित रुस्तुम यांचे प्राण वाचले असते, मेल्यानंतर जी तत्परता दाखवली ते अगोदर दाखवणे गरजेचे असल्याचे अर्जून पठाडे म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.