आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Farmers Became Smart During The Corona Crisis! Growing Trend Towards Using Online Agricultural Supply Chain

दिव्य मराठी विशेष:काेराेना संकट काळात शेतकरी झाले स्मार्ट! ऑनलाइन कृषी पुरवठा साखळी वापरण्याकडे वाढता कल

पुणे3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • गरज ओळखून कृषी उत्पादन केल्यास फायदेशीर

काेराेनाची महामारी व लाॅकडाऊनमुळे अनेक व्यवसाय डबघाईला आले असून उत्पादन, विक्री व ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता नवनवीन मार्ग अवलंबण्यात येऊ लागले आहेत. लाॅकडाऊनच्या परिस्थितीत नेमके उत्पादन शेतीतून काढण्यापासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया प्रभावित झाली हाेती आणि सुमारे २० ते २५ टक्के कृषी उत्पादनाचे नुकसान हाेऊन शेतकऱ्यांना आर्थिक ताेटा सहन करावा लागला. मात्र, या परिस्थितीतून बाहेर पडण्याकरिता शेतकरी स्वत:ची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पाेहोचविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाकडे माेठ्या प्रमाणात वळू लागलेे आहेत. लाॅकडाऊनच्या काळात सुमारे १२ हजार शेतकरी ऑनलाइन कृषी पुरवठा साखळीशी जाेडले गेल्याची माहिती ‘फार्मईआरपी’ या कृषी तंत्रज्ञान कंपनीचे संचालक संजय बाेरकर यांनी दिली.

‘फार्मईआरपी’च्या माध्यमातून देश-विदेशातील एक लाखापेक्षा अधिक शेतकरी ई-प्लॅटफाॅर्मवर आतापर्यंत जाेडले गेले असून सुमारे २५ देशांत याबाबत काम करण्यात येत आहे. वेगवेगळ्या कृषी उत्पादन संस्थांच्या माध्यमातून शेतकरी ते ग्राहक यादरम्यान ऑनलाइन पुरवठा साखळी निर्माण करून पारदर्शकपणे उत्पादन पाेहोचविण्याचे काम सुरु आहे. ग्राहकांची भविष्यातील मागणी लक्षात घेऊन त्यानुसार दर्जेदार उत्पादन निर्माण करण्याकरिता कृषी व्यवस्थापन करण्यात येत आहे. हवामान बदल, गारपीट, पाऊस, कडक उन्हाळा यामुळे कृषी पिकांचे नुकसान हाेत असते. मात्र, हवामानाचा अंदाज घेऊन संबंधित शेतीच्या भागात काेणती पीक लागवड याेग्य आहे, त्याकरिता आवश्यक खते, बियाणे, पाणी यांची मात्रा व राेगकीड प्रतिबंध याबाबत तज्ञांचा सल्ला देण्यात येत आहे. गटशेतीला प्राेत्साहित करून पिकांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष दिले जात असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादनाला चांगला भाव मिळण्यासाेबतच त्याला ऑनलाइन साखळी पुरवठ्याद्वारे थेट ग्राहकांपर्यंत पाेहोचण्याचा मार्ग सुकर हाेऊ लागला आहे. काेराेनाच्या परिस्थितीमुळे सुरक्षित अन्न व रसायने विरहित शाश्वत पद्धतीचे उत्पादन यांची मागणी वाढू लागली आहे.

कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या‘वर्क फ्राॅम हाेम’मुळे सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेत शेतकऱ्यांना त्यांची यंत्रणा २४/७ चालू ठेवत आहेत. त्यामुळे वेगवेगळे अपडेट मिळणे व शंकांचे निरसन करण्यास शेतकऱ्यांना मदत हाेत आहे. सॅटेलाइट इमेज सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ते लाेकांना पिकाशी निगडित विशिष्ट गाेष्टींसंदर्भात माहिती तत्काळ उपलब्ध करून देत आहेत.

गरज ओळखून कृषी उत्पादन केल्यास फायदेशीर

ग्राहकांची गरज आेळखून कृषी उत्पादन घेतले जात नसल्याने उत्पादनांना कमी भाव मिळणे, पिकांचे नुकसान हाेणे, अयाेग्य वाहतूक, बाजरपेठेची अनुपलब्धता अशा अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत असल्याचे सांगत संजय बाेरकर म्हणाले, ग्राहकांना काेणती कृषी उत्पादने आवश्यक आहेत, त्यानुसार शेतात उत्पादने घेतली गेल्यास शेतकऱ्यांना ताेटा कमी हाेऊन फायदा मिळू शकेल. कृषी उत्पादन पुरवठा साखळीचा वापर केल्यास पिकांची उत्पादन क्षमता १५ ते २० टक्के वाढण्यासाेबतच दर्जातही ३० ते ४० टक्क्यांचा फरक पडत आहे. महिंद्रा, बीव्हीजी लाइफ सायन्स, धर्मपाल-सत्यपाल, काेराेमंडल फर्टिलायझर, गाेदा फार्म अशा नामांकित कंपन्यांचा ई-प्लॅटफाॅर्मवरील ऑनलाइन पुरवठा साखळीचे कामकाज करत आहे.