आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवतंत्रज्ञान:5G च्या वेगानं पुढं जाऊ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माहितीचे संकलन, संपादन आणि वितरण या तीन संकल्पनांवर इंटरनेटचं सारं जग उभं आहे. रोज नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाशी या तीन गोष्टींची सांगड घालून यशस्वी होण्याचा प्रयत्न होतो आहे. या वर्षातही नवतंत्रज्ञानामुळे आपल्या जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांत कमालीचे बदल होतील. हे स्थित्यंतर अनुभवताना, त्याच्या वेगावर स्वार होताना

‘भ विष्यात तुम्ही तुमच्या खिशात फोन घेऊन फिरू शकता’ अशा आशयाची बातमी १९६८ मध्ये वर्तमानपत्रात झळकली होती. आज २०२३ मध्ये मोबाइलच्या रूपात आपण अवघे जग खिशात घेऊन फिरत आहोत! आता त्यापुढे जात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अद्‌भुत प्रयोगांना ‘फाइव्ह-जी’च्या अफाट वेगामुळे अधिक बळ मिळणार आहे. परिणामकारक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अत्युच्च दर्जाची मशीन लर्निंग (एमएल), भक्कम सुरक्षित असलेली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि ‘यूपीआय’नंतर यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या ‘ओएनडीसी ’(ओपन नेटवर्क डिजिटल कॉमर्स) प्रकल्पामुळे २०२३ मध्ये आपण तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीच्या उंच लाटांवर ‘फाइव्ह-जी’च्या वेगासह स्वार होणार आहोत. मात्र, ही क्रांती ‘याचि डोळा’ अनुभवताना अधिकाधिक सजग-सतर्क राहणंही अत्यावश्यक ठरणार आहे.

ज्ञान-माहिती-रंजनाचा नवा ‘अवतार’!
तब्बल २० जीबीपीएस एवढ्या अत्युच्च वेगाची क्षमता असलेल्या ‘फाइव्ह-जी’चा आरंभ या वर्षात होण्याची शक्यता आहे. ‘फाइव्ह-जी’च्या कृपेने तुम्ही एक संपूर्ण चित्रपट अवघ्या ३० सेकंदांपेक्षा कमी वेळेत डाऊनलोड करू शकाल. व्हॉट्सॲप, टेलिग्राम किंवा अन्य सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा, त्या माध्यमातून होणाऱ्या व्हिडिओ-व्हॉइस कॉलचा दर्जा आणि वेगही वाढणार आहे. यूपीआयद्वारे पैसे पाठवताना ते अडथळ्याविना, वेगवान पद्धतीने अपेक्षित ठिकाणी पोहोचतील. ऑनलाइन शिक्षण-प्रशिक्षण घेणाऱ्या मंडळींना तर ‘फाइव्ह-जी’मुळे मोठा फायदा होणार आहे.

‘एआय’, ‘एमएल’चा परिणामकारक वापर
बँकिंग सेवेसोबतच शासकीय सेवा (विशेषत: जन्म-मृत्यूसह विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्रे, देयकांची देवाणघेवाण), वैद्यकीय सेवा, ई-कॉमर्स, ऑटोमोबाइल, माध्यमे आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात ‘एआय’ आणि ‘एमएल’चा वापर सुरू होईल. त्यामुळे शासकीय कार्यालयात छोट्या-छोट्या कामांसाठी लागणारा वेळ वाचू शकेल. मनोरंजनासह माहिती मिळवताना (इन्फोटेन्मेंट) सर्वाधिक आवडणारा कंटेन्ट (क्युरेटेड) बघता येईल किंवा दाखवला जाईल. स्वस्त दरातील अँड्रॉइड टीव्हीची उपलब्धता आणि ‘फाइव्ह-जी’मुळे इंटरनेटवर चांगल्या कंटेन्टला मागणी वाढेल. विशेष म्हणजे, उच्च प्रतीचे छायाचित्रण करण्याची क्षमता असलेल्या स्मार्ट फोनमुळे ग्लोकल (ग्लोबल + लोकल) एंटरटेन्मेंट कंटेन्ट अधिक मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. सोशल मीडियाचा वापर वाढत असतानाच २०२२ प्रमाणेच शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ कंटेन्टकडेही वापरकर्ते अधिक आकर्षित होतील.

गुगल मॅपचा नवआविष्कार!
इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी देण्यात येणाऱ्या दिशादर्शनात गुगल मॅपच्या नव्या अपडेटमुळे अचूकता येईल. शिवाय, एखाद्या स्थळाची संपूर्ण माहिती म्हणजे तेथील वातावरण, लोकांच्या त्याबाबतच्या प्रतिक्रिया, गर्दीचे प्रमाण आदी माहितीसह तेथील एखादा रस्ता, इमारत, हॉटेल वगैरे भविष्यात कसे दिसेल, याचाही अंदाज या नव्या अपडेटमुळे येऊ शकेल. याच अपडेटमुळे इच्छितस्थळी लवकर पोहोचता येईल. शिवाय, फूड डिलिव्हरी अॅपच्या माध्यमातून खाद्यपदार्थ घरपोच येण्यासाठी लागणारा वेळही कमी होऊ शकेल.

‘ओएनडीसी’चा प्रभाव
भविष्यात एखाद्या वस्तूच्या खरेदीसाठी संबंधित वेबसाइट किंवा ॲपवरही जाण्याची गरज पडणार नाही. व्हाॅट्सअॅपवरूनही ती खरेदी करता येऊ शकेल. ‘जिओ मार्ट’कडून सध्या सुरू असलेली अशी सुविधा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी इतर ई-कॉमर्स कंपन्याही पुढे येतील. एखादी वस्तू खरेदी केल्यावर ती दुसरीकडे कमी किमतीत मिळत असल्याचा पश्चात्ताप करण्याची वेळ या नव्या वर्षात येण्याची शक्यता फार धूसर आहे. कारण केंद्र सरकार त्यासाठी ‘ओएनडीसी’ संकल्पना राबवणार आहे. याद्वारे एकाच वस्तूची वेगवेगळ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील किंमत आणि दर्जा तपासून थेट खरेदी करता येणे शक्य होईल. शिवाय, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही नियंत्रित पद्धतीने त्यांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध करून देता येतील. ‘ओएनडीसी’चा हा उपक्रम इलॉन मस्क यांनी अलीकडेच वापरलेल्या ‘एव्हरीथिंग अॅप’च्या जवळ जाणारा आहे.

नव्या तंत्रज्ञानाचे अनोखे प्रयोग
नव्या वर्षात तंत्रज्ञानाचे अनोखे प्रयोग बघायला मिळतील. त्यामध्ये; ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीद्वारे शासकीय प्रमाणपत्रांचे वितरण, ‘आरबीआय’ने अलीकडेच जारी केलेल्या ‘डिजिटल रुपया’चा व्यावहारिक वापर, माहितीच्या वितरणासाठी इंटरनेट, ब्ल्यूटूथच्या पलीकडे जाऊन Li Fi तंत्रज्ञानाचाही (प्रकाशाचा वापर करून माहितीची देवाणघेवाण - डेटा ट्रान्सफर) अनोखा प्रयोग या वर्षात सर्वसामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ‘ओएनडीसी’ प्रकल्पाला डिजिटल रुपी जोडण्यात येण्याची दाट शक्यता आहे. मेटाव्हर्ससारख्या संकल्पनांमुळे आभासी जग अधिकाधिक वास्तववादी दाखवण्याचा प्रयत्न होईल. डिजिटल मार्केटिंग, डिजिटल ट्रस्ट, डिजिटल ब्रँडिंग आदींचा २०२३ मध्ये अधिक वापर होणे अपेक्षित आहे.

धोक्याचा इशारा!
माहितीच्या अमर्याद वापरामुळे आणि तंत्रज्ञानाच्या आविष्कारांमुळे त्यांच्या गैरवापरांचे प्रमाणही वाढेल. ऑनलाइन स्कॅम (फसवणूक), आयडेंटिडी थेफ्ट (आधार, पॅन, बँक डिटेल्स यांसारखी ओळखीची किंवा माहितीची चोरी), फिशिंग (जाळ्यात ओढून माहितीची मागणी व चोरी), इंटरनेट बँकिंग फ्रॉड (इंटरनेट बँकिंगद्वारे आर्थिक गैरव्यवहार) अशा अनेक प्रकारच्या धोक्यांपासून सर्वांना सावध राहावे लागणार आहे. याशिवाय, घरातील बालकांना नको त्या माहितीपासून (अॅडल्ट कंटेन्ट, गेम्स, व्हर्च्युअल रिॲलिटी गेम्स, ऑगमेंटेड रिॲलिटी गेम्स इ.) दूर ठेवणे तसेच स्वत:कडून आणि मुलांकडूनही गॅजेटचा (स्मार्टफोन, अँड्राॅइड टीव्ही, टॅब, लॅपटॉप) कमीत कमी वापर होईल, याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागेल.

माहितीचे संकलन, संपादन आणि वितरण या तीन संकल्पनांवरच आजचं इंटरनेट जग उभं राहिलं आहे. उपलब्ध तंत्रज्ञानाशी या तीन गोष्टींची सांगड घालून यशस्वी होण्याचा प्रयत्न होतो आहे. आपलीच संकलित केलेली वैयक्तिक माहिती वापरून आपल्यालाच विशिष्ट (जाहिरातवजा) माहिती दाखवण्याचे प्रमाण २०२३ मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे सजग, सावध राहून नव्या बदलांचा आनंद घेऊ!

व्यंकटेश कल्याणकर संपर्क : 7798703952 venkatesh.kalyankar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...