आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना काळात सुप्रीम कोर्ट व्हर्च्युअल मोडमध्ये काम करत आहे. त्या पृष्ठभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) होत असलेल्या सुनावणीदरम्यान वकिलांचे अजब किस्से समोर येत आहेत. कधी एखादा वकील हुक्का पिताना दिसतो, तर कधी कोणी बनियनवरच दिसतो. सोमवारीही सुनावणीत झालेल्या दोन घटनांमुळे कुणालाच आपले हसू आवरता आले नाही.
झाले असे की, न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि हेमंत गुप्ता यांचे खंडपीठ सुनावणी करत होते, तेव्हा एक महिला वकील व्हीसीद्वारे जोडली गेली. ती फेशियल करून घेत होती आणि ब्यूटिशियनला म्हणत होती-‘लवकर आटोप, माझ्या खटल्याच्या सुनावणीचा नंबर येणार आहे.’ फेशियल करवून घेण्याआधीच आपण व्हीसीशी जोडलो गेलो आहोत याचा तिला पत्ताच नव्हता. न्यायमूर्ती आणि वकील सुमारे पाच मिनिटे हे दृश्य पाहून हसत राहिले. एक वकील म्हणाले,‘आता फेशियल पाहणेच बाकी राहिले होते.’ सर्वांना वाटले की, महिला वकिलाला फोनद्वारे कनेक्ट झाल्याच्या चुकीची जाणीव झालेली असावी. पण ती फेशियल करवून घेण्यातच गुंग होती. त्यानंतर निबंधक कार्यालयाने कनेक्शन डिसकनेक्ट केले आणि दुसरी सुनावणी सुरू झाली.
दुसऱ्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान स्क्रीनवर कोरोनाची भीती दिसली. सुनावणीनंतर न्यायमूर्ती चंद्रचूड आपला आदेश लॅपटॉपवर लिहीत होते, तेव्हा स्क्रीनवर न्यायमूर्ती जोसेफ दिसले. त्यांनी आपल्या एका बोटावर पल्स ऑक्सिमीटर लावले होते. ते पाहून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी स्मितहास्य केले. आदेश लिहिल्यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विचारले,‘तापमान किती आहे?’ तेव्हा न्यायमूर्ती जोसेफ उत्तरले,‘चिंता करू नका-सध्या फक्त ९६ आहे.’ त्यानंतर दोघेही हसू लागले. न्यायमूर्ती चंद्रचूड व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान सुनावणी करताना जो आदेश देतात, तो स्वत:च लॅपटॉपवर टाइपही करतात. कोर्ट मास्टरला आदेश देण्याऐवजी स्वत: लॅपटॉपवर आदेश लिहिणे जास्त सोपे असते, अशी टिप्पणी त्यांनी याआधीही केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.