आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकाल:गुंत्यातून शोध अखंड दोऱ्याचा...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमानात उभे असताना आपल्याला एकाच वेळी प्रगत भविष्याची आस अन् रम्य गतकाळाची ओढ लागली आहे. काल, आज नि उद्याच्या काठावर असे हेलकावणारे आपण नेमके कोण आहोत? भूतकाळात रमण्याचा आजार तर आपल्याला जडलेला नाही ना? या मानसिक द्विधावस्थेतून निर्माण झालेला स्थिती, गती अन् मतीचा पेच सोडवायचा तरी कसा? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत ‘समकाला’ची मांडणी करणारे हे सदर आजपासून दर पंधरा दिवसांनी आपल्या भेटीला येईल...

‘स मकाल’ ही संकल्पना फार गुंतागुतीची आहे. ती एकाच वेळी वर्तमानात असताना भूतकाळही आपल्या पोटात घेत असते. सध्याचा काळ अधिक भ्रम आणि भय निर्माण करणारा आहे. आज देशात फाइव्ह - जी तंत्रज्ञान आले आहे. महाराष्ट्र शासनाने ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’ची घोषणा केली आहे. सोशल मीडिया धुमाकूळ घालतो आहे. अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. बारामतीसारख्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI- Artificial Intelligence) केंद्र उभारले जात आहे. आधुनिक शेतीबरोबर सेंद्रिय शेतीचा आग्रह सुरू आहे. ऑनलाइन शिक्षण वेग घेत असताना पारंपरिक व्यवसाय कौशल्यांवर भर देणारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ देशभरात लागू झाले आहे.

दुसरीकडे मात्र आपण अधिकच भूतकाळात रमू लागलो आहोत. शेकडो किलोमीटरचे एक्स्प्रेस हायवे उभारले जात असताना त्यांच्या बाजूला पाटीलवाडा, सातबारा, चुलांगण, चूलघर, अंगण, महाराजा, ओसरी अशा नावांची भव्य हॉटेल उभारली जात आहेत. चुलीवरच्या ज्वारी-बाजरीच्या भाकरी अन् चुलीवरचं मटण, भरीत, भाजी, पिठलं, ठेचा, गुळाचा चहा, कोरा चहा, सरपंच - उपसरपंच चहा, लाकडी घाण्याचं तेल नि लाकडी गुऱ्हाळाची रसवंती दुकानं असे पारंपरिक खाद्यपदार्थांचे व्यवसाय वेगाने वाढत चालले आहेत. पुण्याजवळच्या भोरच्या पुढे ‘चिमण्या’ नावाचे एक हॉटेल आहे. त्यावर बैलाचं चित्र काढलं आहे. हॉटेलपुढं गाय-बैलांची शिल्पं उभी आहेत. अनेक ठिकाणी अशी कृत्रिम खेडी उभारून पर्यटन, पिकनिकचे इव्हेंट केले जात आहेत. जुनी जीप ‘थार’च्या रूपाने आली. रस्त्यावर पुन्हा बुलेट आणि स्कूटी (पूर्वीची स्कूटर) अधिक दिसू लागल्या आहेत. घरांचे स्ट्रक्चर जुन्या वाड्यांकडे निघाले आहे. घरोघरी जुन्या गोष्टी सुरू आहेत. परवा मी शेतात बनवलेल्या बाजेचा फोटो फेसबुकवर टाकला, तर तो प्रचंड व्हायरल झाला!

वर्तमानात उभे असताना एकाच वेळी प्रगत भविष्याची आस अन् रम्य गतकाळाची ओढ आपल्याला लागली आहे. मग काल, आज आणि उद्याच्या काठावर असे हेलकावणारे आपण नेमके कोण आहोत? आपल्याला भूतकाळात रमण्याचा आजार जडला आहे काय? या द्विधावस्थेतून निर्माण झालेला स्थिती, गती अन् मतीचा पेच कसा सोडवायचा? आणि या बदलांच्या संदर्भात ‘समकाला’ची मांडणी कशी करायची? हे तज्ज्ञांपुढचे मोठे आव्हान आहे. मार्शल दुशां हे प्रख्यात फ्रेंच-अमेरिकी चित्रकार, शिल्पकार, बुद्धिबळपटू. ते म्हणतात, ‘परंपरेतून बाहेर पडताना जेव्हा एखादा कलाकार स्वत:चे असे काही शोधत असतो, तेव्हा त्याला आपण जे जे काही शिकलो आहोत, त्याचे विस्मरण करणे गरजेचे असते. या विस्मरणाच्या वाटांतून मग तुम्हाला स्वत:चे असे काही सापडत जाते. तुम्ही प्रयत्न करत राहता, पण यामध्ये तुम्ही यशस्वी व्हालच असे नाही. बरेचदा तुम्हाला असे वाटते, की तुम्ही संपूर्णतः स्वत:चेच असे काहीतरी करत आहात. पण नंतर तुम्हाला याची मुळे कुठे होती किंवा आहेत, याचा शोध लागतो. त्याबद्दल तुम्ही पूर्णत: अनभिज्ञ असता, तरीही या गोष्टी होतात. या संदर्भात काही मानसशास्त्रीय विश्लेषण वगैरे आहे, असे मला अजिबात वाटत नाही.’ लिहिणारा आणि वाचणारा माणूस म्हणून मीही भूतकाळ नाकारून वर्तमानावर पकड मिळवू पाहत आहे, पण मलाही हे जगणं फार गुंतागुंतीचं वाटत चाललं आहे.

मागे कधी तरी एकदा वडिलांनी आणलेल्या चिवड्याच्या पुड्याच्या दोऱ्याचा गुंता सोडवत मी दारात बसलो होतो. तेव्हा शेजारी म्हणाला होता, ‘काय सर, हे काय करताय? आणायचा नवा दोरा तर बसलात गुंता सोडवत? चिलटाची कढी करून कुठं पोट भरत असतं का?’ त्या वेळी त्यांच्याकडं मी फक्त एक हास्य फेकलं होतं आणि कामात गुंतून गेलो होतो. कारण ज्या कागदाच्या पुड्यात वडील चिवडा घेऊन आले होते, त्या अख्ख्या पुड्यात माझं बालपण गुंडाळलेलं होतं. जत्रेच्या काळात त्या पुड्याची वाट बघत कित्येक रात्री उपाशी झोपलो आहे, त्या मला विसरता येत नाहीत. त्याच पुड्याच्या दोऱ्याचा गुंता एकही गाठ बसू न देता आणि तो तुटूही न देता सोडवून अखंड दोरा नव्याने मिळवण्यात काय आनंद आहे, हे मी शेजाऱ्याला कसे सांगणार होतो?

हे सदर म्हणजे वर्तमान आणि भूतकाळाचा असाच होत असलेला गुंता सोडवत सभोवती घडणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, राजकीय गुंत्यांची काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आहे. निश्चित उत्तरे नाही सापडली तरी प्रश्न उभे करणे आणि त्यातून त्या पुड्याच्या दोऱ्यासारखा अखंड दोरा हाती लागतोय का, ते पाहण्याची ही धडपड असेल.

महेंद्र कदम mahendrakadam27@gmail.com संपर्क : 9011207014

बातम्या आणखी आहेत...