आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Fireworks Is More Expensive This Year Due To The Increase In Material; Recession Hit The Firecracker Market At Sivakasi Terkheda In Marathwada

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सुतळी वधारल्याने ‘बॉम्ब’चा आवाज यंदा महाग; मराठवाड्याची शिवकाशी तेरखेडा येथील फटाका बाजारावर मंदीचे सावट

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाचे सावट पाहता यंदा फटाके वापरूच नका - पर्यावरणतज्ज्ञ

काेराेनाचे संकट, अतिवृष्टी आणि कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे या वर्षीच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज महाग होणार आहे. फटाक्यांसाठी लागणाऱ्या सुतळीचे दर दीड पटीने, तर रद्दीचे दर दुपटीने वाढल्याने मराठवाड्याची शिवकाशी मानल्या जाणाऱ्या तेरखेड्यातील (ता. वाशी) फटाका बाजार मंदीच्या सावटाखाली सापडला आहे.

दरवर्षी दिवाळीच्या महिनाभर आधी सोलापूर-औरंगाबाद महामार्गावर तेरखेडा गावाच्या अवतीभवती फटाका स्टॉलची धांदल आणि खरेदीदारांची गर्दी पाहायला मिळते. या वर्षी मात्र हा परिसर अजून गजबजलेला दिसत नाही. फटाका उद्योजक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष फरिद पठाण म्हणाले, खरेतर या वर्षी दिवाळीला फटाक्यांची दुकाने सुरू होतील की नाही याबद्दल आम्ही सगळे उद्योजक साशंक होतो. काेराेना काळात बहुतांश फटाका फॅक्टरी बंदच होत्या. तेरखेड्यात सुतळी बाॅम्ब, लक्ष्मी तोटा, अनार आणि फुलबाजे, तेरखेडी तोटे तयार होतात. या फटाक्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर असून, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजारपेठेत तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक भागातही फटाक्यांची विक्री होते. तेरखेड्यात १८, परिसरातील वाशी, गोजवडा, इंदापूर, उस्मानाबादजवळील कसबेतडवळे येथे मिळून २५ फटाका कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये तसेच कच्चा माल तयार करणाऱ्या (पुठ्ठे, रद्दीचे रोल आदी) उद्योगांमध्ये सुमारे ३ हजारांवर मजूर आहेत. या उद्योगातून तेरखेड्यात केवळ दिवाळीला सुमारे ५ कोटींची उलाढाल होते.

यंदा फटाके वापरूच नका

कोरेानाचा प्रभाव कमी झाला असला तरी हा आजार संपलेला नाही. हा श्वसनासंबंधीचा आजार आहे. फटाक्यातून पसरणारा धूर श्वसनसंस्थेला धोकादायक आहे. कोरेाना काळात फटाके वापरू नये. -डॉ. ए. एम. देशमुख,पर्यावरणतज्ज्ञ.

कोराेनामुळे या वर्षी फटाके उत्पादकांना मजुरांची समस्या भेडसावत होती. काही महिने मजुरांना उचल देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा लागला. त्यानंतर पावसाची झड लागली. फटाक्यांच्या निर्मितीसाठी उन्हाची गरज असते. त्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले. त्यामुळे बाजारपेठेत मागणी वाढली तरी या वर्षी फटाके पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, असे व्यापारी सांगत आहेत. फरिद पठाण म्हणाले, गेल्या वर्षी सुतळी बॉम्बसाठी लागणारी सुतळी ७० रुपये तर रद्दी १२ ते १४ रुपये प्रतिकिलो दराने मिळत होती. या वर्षी सुतळी १०० रुपये तर रद्दी २६ रुपये किलोवर, म्हणून सुतळी बॉम्ब महाग झाला आहे.