आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Flex Fuel Vehicles Explained; Nitin Gadkari | Why Is Narendra Modi Government Promoting FFVs Vehicles?

एक्सप्लेनर:वर्षभराच्या आत देशात फ्लेक्सी-फ्यूल इंजिन वाहने आणण्याचे प्रयत्न; तेलाच्या किंमती 40% पर्यंत कमी होऊ शकतात

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या याविषयी सविस्तर...

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोबाईल कंपन्यांच्या सीईओंना फ्लेक्सी-फ्यूल इंजिन अनिवार्य करण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये सरकारने इथेनॉलला स्वतंत्र इंधन म्हणून वापरण्याची परवानगी दिली. या निर्णयामुळे शेतक-यांना मदत होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

यासह, गडकरींनी सर्व कार उत्पादकांना कारमध्ये 6 एअरबॅग देण्याचे आवाहन केले आहे. सध्या, कार फक्त 2 एअरबॅगसह येतात. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही किंमतीच्या किंवा क्लासच्या सर्व कार मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग असाव्यात. रस्ते अपघातांमध्ये वाढते मृत्यूचे प्रमाण पाहता, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक आहे.

गडकरींनी म्हटल्यानुसार, पर्यायी इंधन इथेनॉलची किंमत प्रति लीटर 60-62 रुपये इतकी आहे तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरुन भारतीयांना प्रति लीटर 30 ते 35 रुपयांची बचत करता येईल.

चला समजून घेऊया, फ्लेक्सी- फ्यूल वाहने म्हणजे काय? आता वापरात असलेल्या वाहनांपेक्षा हे किती वेगळे आहेत? या बदलाचे फायदे आणि तोटे काय आहेत? आणि सरकार फ्लेक्सी-फ्यूल वाहनांना प्रोत्साहन का देत आहे?

सर्वप्रथम, फ्लेक्सी-फ्यूल इंजिन म्हणजे काय ते समजून घ्या?

सध्या, आपण वाहनांमध्ये वापरत असलेल्या पेट्रोलमध्ये 8.5% इथेनॉल असते. इथेनॉल म्हणजे जैव इंधन. परंतु फ्लेक्सी-फ्यूल इंजिनमध्ये आपल्याकडे पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही वेगवेगळ्या प्रमाणात वापरण्याचा पर्याय असेल. उदाहरणार्थ 50% पेट्रोल आणि 50% इथेनॉल.

वाहनातील इंजिन स्वतःहून फ्यूलमध्ये असलेल्या इंधनाची कंस्ट्रेशन शोधून इग्निसन अॅडजस्ट करेल.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, या वाहनांमध्ये तुम्ही दोन किंवा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनाचे मिश्रण इंधन म्हणून वापरू शकता.

पेट्रोल पंपावर काय बदलणार?
अधिक काही नाही. पेट्रोल पंपावर आणखी एक मशीन जोडले जाईल, जेणेकरून तुम्हाला इथेनॉल बेस्ड इंधनही मिळेल.

इथेनॉल म्हणजे काय?
इथॅनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळले जाते आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाते. इथेनॉल ऊसापासून तयार होते. हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल. इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते. इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, ज्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही.

आपण आता वापरत असलेल्या वाहनांपेक्षा ते किती वेगळे आहे?
सध्या आपण वापरत असलेल्या वाहनांमध्ये फक्त एक प्रकारचे इंधन टाकता येते. याशिवाय, एक मोठा फरक फ्यूल टँकचा देखील असतो. जर तुमचे वाहन एलपीजी आणि पेट्रोल दोन्हीवर चालते, तर दोन्हीसाठी स्वतंत्र फ्यूल टँक असते. परंतु फ्लेक्सी फ्यूल वाहनांमध्ये, आपण एकाच फ्यूल टँकमध्ये विविध प्रकारचे इंधन (पेट्रोल-इथेनॉल) टाकू शकता.

त्याचे फायदे काय आहेत?

 • नितीन गडकरी यांच्या मते, या इंधनाची किंमत 60-62 रुपये प्रति लीटर असेल, तर पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटरपेक्षा जास्त आहे. म्हणजेच तेलाच्या किमती 40%पर्यंत कमी होऊ शकतात.
 • भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. इथेनॉल बनवण्यासाठी ऊस, मका, कापसाचे देठ, गव्हाचा पेंढा, बगासे आणि बांबूचा वापर केला जातो. इथेनॉलचा वापर वाढल्यास त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.
 • इथेनॉलचा वापराने कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण देखील कमी होईल. म्हणजेच ते पर्यावरणासाठी फायदेशीर आहे.
 • सध्या भारत आपल्या गरजेच्या 80% पेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात करतो. इथेनॉलचा वाढता वापर भारताचे कच्च्या तेलावरील अवलंब कमी करेल आणि आयातही कमी करेल. देशाचा पैसा देशात राहील.

काय नुकसान आहे?

 • इंधन प्रणाली आणि वाहनाच्या इंजिनमध्ये बदल करावे लागतील. यामुळे वाहनांची किंमत वाढेल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामुळे चारचाकीच्या किंमतीत 17 ते 30 हजार रुपयांनी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर दुचाकी वाहनांच्या किंमती 5 ते 12 हजार रुपयांनी वाढू शकतात.
 • इथेनॉलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी इंधन कार्यक्षमता असते. जर तुम्ही तुमच्या वाहनात 70% इथेनॉल वापरत असाल तर वाहनाचे मायलेज कमी होईल. यामुळे रनिंग कॉस्ट वाढू शकतो.
 • इथेनॉलची उपलब्धता हा देखील एक मोठा प्रश्न आहे. सध्या 8.5% इथेनॉलवर मिश्रित पेट्रोल फक्त निवडक राज्यांमध्ये उपलब्ध आहे, त्याचे कारण वाहतूक समस्या आणि इथेनॉलची कमतरता हे आहे.

कोणते देश फ्लेक्सी-फ्यूल वापरत आहेत?
ब्राझीलमध्ये फ्लेक्सी-फ्यूल इंजिन वाहने सर्वाधिक वापरली जात आहेत. ब्राझील अनेक वर्षांपासून फ्लेक्सी-फ्यूल इंजिन असलेल्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. परिणामी, फ्लेक्सी-फ्यूल तिथल्या 70% पेक्षा जास्त कारमध्ये वापरले जात आहे.

याशिवाय कॅनडा, अमेरिका आणि चीन हे देखील फ्लेक्सी-फ्यूल उत्पादनात अव्वल देश आहेत. येथे हे इंधन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

फ्लेक्सी-फ्यूल वाहने युरोपमधील 18 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरली जातात. जगातील सर्व टॉप ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्सी-फ्यूल वाहनांचे उत्पादन करत आहेत.

फ्लेक्सी फ्यूल इंजिन वाहने भारतात उपलब्ध आहेत का?

नाही. भारतात कंपन्यांनी फ्लेक्सी-फ्यूल इंजिन असलेली वाहने केवळ चाचणीसाठी सादर केली होती, परंतु अशी वाहने सध्या सामान्य जनतेसाठी उपलब्ध नाहीत. 2019 मध्ये, TVS ने अपाचेचे फ्लेक्सी-फ्यूल आधारित मॉडेल सादर केले, परंतु ते शोरूममध्ये कधीच विकले गेले नाही.

सरकार फ्लेक्सी-फ्लूल वाहनांना प्रोत्साहन का देत आहे?
खरं तर, देशात मका, साखर आणि गहू उत्पादन सरप्लस आहे. हे सरप्लस उत्पादन गोदामांमध्ये साठवण्याची जागाही नाही. या कारणास्तव, सरकारने या अतिरिक्त उत्पादनाचा इथेनॉल तयार करण्यासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळेल, क्रूडची आयातही कमी होईल आणि ते पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे.

भारत सरकारने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण 20% आणि डिझेलमधील बायोडिझेलचे प्रमाण 5% पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने हे देखील एक मोठे पाऊल आहे.

(ऑटोमोबाईल तज्ज्ञ अमित खरे यांच्याशी झालेल्या संभाषणावर आधारित)

बातम्या आणखी आहेत...