आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंडे पॉझिटिव्ह:चौदा वर्षांत तिसऱ्यांदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस, भूजल पातळीतही वाढ

संतोष देशमुख | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ भागात पिके बहरली असून शेतकरी कामात व्यग्र आहेत. (छाया : सदाशिव फुले) - Divya Marathi
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ भागात पिके बहरली असून शेतकरी कामात व्यग्र आहेत. (छाया : सदाशिव फुले)
  • जायकवाडीचा जलसाठा 53 टक्क्यांवर, 2 ऑगस्टपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली,

औरंगाबाद शहर व जिल्ह्यात २००७ ते २०२० या चौदा वर्षांच्या काळात ११ वेळा सरासरीपेक्षा कमी तर तीन वेळा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. विशेष: म्हणजे यंदाच्या मोसमात २ ऑगस्टपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली असून प्रथमच ८८७.२ मिमी विक्रमी पर्जन्यमान झाल्याची नोंद चिकलठाणा वेध शाळेने घेतली आहे. शहर जिल्ह्यात धो धो पाऊस पडतोय. यामुळे छोटे मोठे तलाव भरून ओसंडून वाहू लागले आहे. हर्सूल तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता असून जायकवाडीची पाणी पातळी ५३ टक्क्यांवर पोहोचली आहे. चांगल्या पर्जन्यमानाने खरीप पिके बहरली आहेत.

देश विदेशातील हवामान विभाग, हवामान संस्था, हवामान शास्त्रज्ञ दरवर्षी जागतिक पातळीवरील वातावरण, हिंद महासागर, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र परिसरातील वातावरणाचा अभ्यास करून मान्सूनचा अंदाज वर्तवतात. सरासरीएवढा व त्या पेक्षा ५ टक्क्यांनी जास्त पाऊस होईल असेच जवळपास भाकीत असते. २०१० आणि २०१३ हे वर्ष वगळता उर्वरित ११ वर्षे सरासरी पेक्षा पाऊस पडला. २०१२, २०१४, २०१५, २०१८ या वर्षांत भीषण दुष्काळ पडला होता. गतवर्षी जून व जुलैमध्ये पावसाअभावी वाळवंट होण्याची वेळ आली होती. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने रब्बीला संजीवनी दिली. यंदा सरासरी एवढा, समाधानकारक पाऊस होण्याचे भाकीत केलेले होते. त्या तुलनेत औरंगाबादेत जास्त पाऊस होतोय. त्यामुळे २ ऑगस्टलाच यंदा तिसऱ्यांदा पावसाने वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडून विक्रमी पाऊस पडण्याची नोंद हवामान विभाग, महसूल विभाग, कृषी विभागाने घेतली आहे.

औरंगाबाद शहरातील पावसामुळे यंदा चेरापुंजीची बरोबरी होण्याची शक्यता

शहरात गतवर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून काळात ५५० ते ६०० मिमी सरासरी पर्जन्यमान होते. यंदा दीड महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली होती. तर २०१९ मध्ये मान्सूनच्या चार महिन्यांत केवळ ५५०.७ मिमी, २०१८ मध्ये ५६७.५ मिमी तर २०१७ मध्ये ८२६.५ मिमी पर्जन्यमान होण्याची नोंद (जिल्ह्यात सरासरीच्या ८३ टक्केच पाऊस झाला होता.) चिकलठाणा वेध शाळेकडे आहे. २ ऑगस्ट पर्यंत ८८७.२ मिमी विक्रमी पाऊस झाला आहे. त्यामुळे २०१७ चा शहरातील विक्रम यंदा मोडीत निघाला असून ऑगस्ट व सप्टेंबर मधील जोरदार पाऊस जून बाकी असल्याने पावसाचा चेरीपुंजी सारखा १ हजार मिमी पाऊस पडण्याचा नवा विक्रम प्रस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पिके बहरी, नदी-नाले प्रवाहित

मान्सून पूर्व व मान्सूनचा चांगला पाऊस पडल्याने शहरातील खाम व सुखना नदी वाहू लागली आहे. हर्सूल तलावात पाणी संचय झाला असून तो ओव्हरफ्लो होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहर परिसरातील तलाव, विहिरी, शेत तळ्यात देखील पाण्याने तुडुंब भरले आहेत. भूजल पाणी पातळी वाढण्यास मोलाची मदत होत आहे. डोंगर हिरवे गार झाले आहेत. दऱ्यातून पाणी वाहू लागले आहे. जागोजागी पाणी संचय झाल्याने पाळीव प्राणी व पशू पक्ष्यांसाठी अतिशय उपयुक्त झाले असून त्यांचा किलबिलाट लक्ष वेधून घेत आहे. खरीप पीक, फळ पिके बहरली आहेत.

उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यात कमी पाऊस

स्थळनिहाय पडणाऱ्या पर्जन्यमानात मोठा फरक आहे. स्थानिक वातावरणातील तापमान, कमी हवेचा दाब, आर्द्रता, समुद्रावरून वाहत येणारे बाष्प, हवा यावर पावसाची दिशा ठरते. जेथे पोषक व अनुकूल वातावरण राहिले व राहात आहे, तेथेच जोरदार पाऊस पडतोय व पडत आहे. औरंगाबाद शहरात ८८७.२ मिमी, जिल्ह्यात १८९.९ टक्के, जालना १७५.१, बीड १५६.८, लातूर १०२.८, उस्मानाबाद ९३.६, नांदेड ८८.०, परभणी ११५.४, हिंगोली १२५.९ असे एकूण मराठवाड्यात २ ऑगस्टपर्यंत ३३२.७ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ४२४.८ मिमी म्हणजे १२७.७ मिमी पाऊस पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...