आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:माजी मंत्री जानकर 3 महिन्यांपासून दऱ्याखोऱ्यांत; चार मुख्य उद्देश ठेवून मी असा रानावनात भटकतोय : जानकर

नामदेव खेडकर | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाकाळाचा सदुपयोग... जगणं अनुभवतोय : जानकर

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री, आमदार महादेव जानकर तीन महिन्यांपासून वाड्या, वस्त्या आणि दऱ्या-खोऱ्यांत फिरत आहेत. सामान्य माणसाचं जगणं अनुभवणं, स्वतःला काही काळ निसर्गाच्या कुशीत राहण्याचा आनंद मिळावा, रामायण आणि महाभारताचा अभ्यास व्हावा, अराजकीय तरुणांना राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न हे चार मुख्य उद्देश ठेवून मी असा रानावनात भटकतोय, असे जानकर यांनी दिव्य मराठीला सांगितले.

जानकर यांनी लॉकडाऊनच्या काळात लवाजमा सोडून अतिदुर्गम भागात राहणे पसंत केले. ते पैठण तालुक्यातील गुंतेगाव येथे एका शेतवस्तीवर राहायला आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा जानकर म्हणाले, “राजकारणात असल्याने मला कार्यकर्ते भेटायला येणे साहजिकच आहे. कितीही प्रयत्न केला तरी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे कठीण होते. एक प्रकारे ही कृती म्हणजे प्रशासनाला असहकार्यच आहे. त्यामुळे मी माझा सर्व लवाजमा, सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून एखाद्या वनवासी व्यक्तीसारखं रानावनात भटकण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला संगमनेर येथील सुभाष गिते यांच्या शेतातील घरी सव्वा महिना राहिलो. त्यानंतर रासप युवक आघाडीचे नगर जिल्हाध्यक्ष राहुरी येथे नानासाहेब झुंजारे यांच्या शेतात व पुढे श्रीरामपूर तालुक्यात प्रवरा आणि मुळा नदीच्या संगमावर एक मठ आहे, या मठात सर्वाधिक काळ म्हणजे दीड महिना राहिलो. तिथे तपश्चर्या करायचो. पुन्हा बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शृंगारऋषी गडावर सुरेशानंद महाराज यांच्यासोबत एक महिना दोन दिवस राहिलो. आता गुंतेगावला आलो आहे, अशी माहिती जानकर यांनी दिली.

...स्वत: स्वयंपाक केला

संन्यासी जसे लुंगीवर राहतात तसाच मीदेखील लुंगीवरच राहिलो. या काळात बहुतांश वेळा हाताने स्वयंपाक केला. जंगली फळेही मनसोक्त खाल्ली. नदी, विहिरीत पोहलो. ज्या ठिकाणी थांबलोय, तेथील शेतकऱ्याला थोडीफार शेतीच्या कामात मदतही केली. कुठे जायचे झाल्यास बैलगाडी अथवा दुचाकीवर जायचो.

आता आईची भेट

१ ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे दूध आंदोलनात सहभागी होणार आहे. त्यानंतर म्हसवड येथे आई व बहिणीला भेटून बारामती येथे जाणार आहे. ३० वर्षात कधी विश्रांती घेतली नाही. आता मागील ४ महिन्यांपासून मनसोक्त जगतोय, असे जानकर म्हणाले.