आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जायकवाडी धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेतचारपट अधिक पाऊस; जलसंचय 26% कमी

संतोष देशमुख । औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोदावरी पात्राच्या बाहेर पाणी जाणार नाही याचे आतापासूनच नियोजन हवे, नाथसागर ते नांदेडदरम्यान 178 गावांना धोका

गतवर्षी १७ ऑगस्टपर्यंत जायकवाडी परिसरात केवळ १५० मिमी पाऊस पडला होता. मात्र, धरणावरील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने नाथसागरात ९१ टक्के जलसंचय झाला होता. यंदा त्या तुलनेत चारपट म्हणजेच ६१० मिमी पाऊस पडला आहे. धरणाच्या वरील भागात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे ६५ टक्केच आवक होऊ शकली. असे असले तरी आगामी काळातही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. धरण भरून पाण्याचा विसर्ग होईल. नदीकाठच्या हजारो हेक्टर शेतातील हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात जायला नको, म्हणून गोदावरीचे पाणी पात्राचा बाहेर जायला नको म्हणून पूर्वनियोजन करावे. यासाठी जलतज्ज्ञ, बोट पथक, जलतरणपटू, यांत्रिकींची कायमस्वरूपी नियुक्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हवामान बदलामुळे यंदा असमान पर्जन्यमान होत आहे. नाथसागराच्या वरच्या भागातील नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग खूप कमी झाला. तर दुसरीकडे नाथसागर परिसर, जिल्ह्यात विक्रमी १७५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे प्रकल्पात संथगतीने १ जूनपासून ७४१.०३ दलघमी आवक होऊन उपयुक्त जलसाठा १४०८.५९ दलघमी म्हणजे ६५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. गत आठ दिवसांपासून औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक फरकाने पाऊस पडतो आहे. पुढे तर परिपक्व झालेल्या मान्सूनचे मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. यामुळे धरण भरण्यास वेळ लागणार नाही. ऐन वेळी पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ येऊ शकते. जास्त पाऊस पडला तर गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी सोडण्यात येईल. यामुळे नाथसागर ते नांदेडपर्यंत गोदाकाठची १७८ गावांतील हजारो हेक्टर शेतातील बहरलेली पिके पुरात एका क्षणात उद्ध्वस्त हाेण्याची शेतकऱ्यांना भीती अाहे. त्यामुळे पाणी सोडण्याचे पूर्व नियोजन करावे. यासाठी जल तज्ज्ञांची कायमस्वरूपी नियुक्त करणे. आपत्तीत संरक्षणासाठी कायमस्वरूपी बोट पथक सज्ज करणे, यांत्रिकी नेमणे अनिवार्य झाले आहे.

नियोजन करून पाणी सोडावे :

तात्कालीन महसूल आयुक्त कृष्णा भोगे, जलतज्ज्ञ माधवराव चितळे, प्रदीप पुरंदरे व अॅड. प्रदीप देशमुख यांची अथवा शासन प्रशासनास जे योग्य वाटतील त्या जलतज्ज्ञाची कायमस्वरूपी नियुक्ती करावी. नाथसागरातून पाणी सोडण्याची वेळ आली तर मराठवाड्यातील गोदाकाठाच्या दोनशे गावांना इजा पोहोचू नये तसेच शेतजमिनींचे नुकसान होऊ नये, अशा पद्धतीने नियोजन करून गोदावरी पाञात पाणी सोडावे. जलविद्युत केंद्र, नाथषष्ठी व संत ज्ञानेश्वर उद्यानासाठी पाणी राखीव ठेवण्याचीही दक्षता घेण्यात यावी, जल तज्ञांच्या वेळोवेळी बैठका घ्याव्यात,अशी मागणी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, पैठण आणि शेतकऱ्यांच्या वतीने विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा प्रशासनाकडे करण्यात आली.

येलदरी, सिद्धेश्वर १०० टक्के भरले

गतवर्षी ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात दुष्काळजन्य स्थिती होती. येलदरी धरण परिसरात ४१३ मिमी पाऊस पडला होता. जलसाठा १.८५ दलघमीने मृत साठ्यात असल्याची नोंद झाली होती. याहीपेक्षा वाईट स्थिती सिद्धेश्वर धरणाची होती. या प्रकल्प परिसरात ४३२ मिमी पाऊस पडला होता. ५९.९१ टक्क्यांनी मृतसाठा होता. यंदा मान्सूनने मेहरबानी केली आहे. येलदरी व सिद्धेश्वर धरण आणि खडका बंधारा १०० टक्के भरले असून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तसेच जायकवाडी ६५ टक्के, विष्णुपुरी ९१ टक्के, मानार ७३, पेनगंगा ५९ टक्के जलसंचय झाला आहे.

११ मंडळांत अतिवृष्टी

गत सोमवारी सुरू झालेली पावसाची झड आठव्या दिवशीही सुरूच होती. विशेष म्हणजे रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील मंठा ६७ मिमी, मातूळ ६५, बोधाडी ६५.५०, इस्लापूर ६५.५०, जलधारा ६५.५०, शिवानी ७२, मांडवा, देहेली, वाई, सिंदखेडा ६५.५० मिमी असे एकूण १० मंडळांत आणि आणि हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मंडळात ७९.५० मिमी अशी एकूण ११ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर उर्वरित ४३० मंडळात कमी-अधिक फरकाने पाऊस पडला.

बातम्या आणखी आहेत...