आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेना काळात कुठे प्रशासनातील कडी म्हणून, कुठे दवाखान्यातील सेवा म्हणून, तर कुठे थेट सामाजिक बांधिलकीचा वसा जपत माणुसकीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या ‘मिळून साऱ्या जणीं’च्या यशोगाथांवर महिला - बालविकास विभाग आणि ‘दिव्य मराठी’चा प्रकाशझोत.
हिंगोली तालुक्यातील हिवराबेल गावात कोविडचा पहिला रुग्ण सापडला आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष हिवराबेलकडे लागले. खरं तर गाव क्वॉरंटाइन करणे एवढेच “शासकीय कर्तव्य’ अभिप्रेत होते. पण ग्रामसेविका सुनीता खंदारे फक्त गाव सील करून थांबल्या नाहीत तर त्यांनी त्या गावातच १४ दिवस तळ ठोकला आणि कोरोनाला शब्दश: हद्दपार केले. नऊशे लोकवस्तीच्या या गावात सुनीता खंदारे गेल्या तीन वर्षांपासून ग्रामसेविका म्हणून काम करीत आहेत. कोरोनाच्या सूचना आल्यावर त्यांनी गावात जनजागृती केली. तरीही २५ एप्रिलला जालना येथून आलेली एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती गावात सापडली आणि सुनीताताईंनी कंबर कसली. शासकीय नियमाप्रामाणे आणि वरिष्ठांच्या सूचनांनुसार त्यांनी गाव सील केले, शिवाय गावातच आपला तळही ठोकला. संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर केले. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून दारोदारी जाऊन सर्वेक्षण केले. त्यात संशयास्पद आढळलेल्या १२० जणांना पहिल्या दिवशीच विलगीकरण कक्षात पाठवून दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी गाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केल्यावर आरोग्य विभाग, पोलिस विभागाशी समन्वय साधून त्यांनी संपूर्ण गावच सील केले. गावात कोणालाही प्रवेश दिला नाही. सर्वेक्षणातील संशयास्पद आढलेल्यांना रुग्णवाहिकेने विलगीकरण कक्षात पाठवले आणि त्यातील दोघे पॉझिटिव्ह आले. सुनीताताईंनी घेतलेल्या दक्षतेमुळे कोरोनाचा फैलाव रोखला होता. २६ एप्रिलपासून त्यांनी पुन्हा सर्वेक्षण सुरू केले. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत घरोघरी जाऊन जनजागृती केली. मास्क, सॅनिटायझर वाटप केले. गावकऱ्यांसाठी आलेला रेशनचा तांदूळ दुकानदारासोबत लाभार्थींच्या घरोघरी नेऊन वाटला. त्यामुळे गावात जीवनावश्यक गोष्टींसाठीही गर्दी होऊ दिली नाही. गावकऱ्यांच्या घराघरापर्यंत त्यांना गरजेचे सर्व साहित्य पोहोचविले. ग्रामपंचायततर्फे दर दिवसाआड फवारणी केली. सलग चौदा दिवस जातीने सर्व कामे करवून घेतली. एक दिवस आड धूरफवारणी केली. त्यामुळेच लहान गावात कोविडचा फैलाव रोखण्यात यश आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.