आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यात मरकाकसा गाव मैत्रीच्या नात्यासाठी प्रसिद्ध आहे. आपण नामकरण, लग्नासह १६ संस्कार विधीप्रमाणे पार पाडतो. तसेच येथे मैत्री या संस्काराप्रमाणे जोपासली जाते. यासाठी विशेष पर्व किंवा औचित्याची निवड केली जाते. म्हणजे जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील हा यामागील हेतू असतो. गावाच्या सरपंच ईश्वरी ठाकूर सांगतात, १९० घरे असलेल्या गावात मित्राला मितान म्हटले जाते. अनेक पिढ्यांपासून मैत्री जोपासली जाते. आजूबाजूच्या गावातही ही परंपरा आहे. अनेकांचे मित्र महाराष्ट्रातील गावातही आहेत. विशेष म्हणजे, तुम्ही एखाद्याशी मैत्री केल्यावर त्याला नावानिशी हाक मारू शकत नाही. असे केल्यास पंचायतीमध्ये नारळ व पैशांचा दंड भरावा लागतो. गरज भासल्यास मित्राचे नाव लिहून सांगितले जाते. मित्राला महाप्रसाद, गंगाजल, तुलसीजल किंवा फूल-फुलवारी संबोधले जाते. ९० वर्षीय भूषण सांगतात, महाराष्ट्रातील चिल्हाटी गावात माझे महाप्रसाद (अगनू) आहेत. ७ वर्षांचा असताना कबड्डी खेळण्यासाठी गावोगावी जायचो. तेव्हाच त्यांची भेट झाली. सुखदु:खात पाठीशी उभे राहतो. ते सांगतात, महिला व पुरुष दोघांनाही मैत्री करता येते. मात्र, पुुरुषांना पुरुषासोबत व महिलांना महिलांशीच मैत्री करता येते. हे नाते कौटुंबिक असते. राजकुमार सांगतात, ते व कौडीकसा गावातील शत्रुघ्न रोजगाराच्या शोधात आंध्रात गेले होते. शत्रुघ्न सावलीप्रमाणे त्यांच्यासोबत राहिले. प्रत्येक संंकटाचा सामना सोबत केला. यापैकीच एक राधेलालही. त्यांचे मित्र महाराष्ट्रातील आहेत. दोघांनाही बैलगाडी शर्यतीची आवड. एकमेकांचे प्रतिस्पर्धी. मात्र, दोघांचे नाते मैत्रीत बदलले. ते ४० वर्षांपासून मित्र आहेत.
गौरी व गणपतीसमोर मैत्रीचा सोहळा, अॅरेंज फ्रेंडशिपचीही पद्धत
> मैत्रीचे नाते पिढ्यान्पिढ्या टिकवण्यासाठी ज्येष्ठ त्यांच्या मुलांचे मित्र ठरवतात. त्याला अॅरेंज फ्रेंडशिपही म्हणता येईल. गावातील रांजी सांगते, १३ वर्षे वय असताना घरच्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील मोहगावात तिने मैत्रीण बनवली होती.
> नातेवाईक एकमेकांचे फूल- फुलवार होऊ शकत नाहीत. बहुतांशी लोक जात, धर्म आणि गावाबाहेर फूल- फुलवारी बनवतात.
> काही जण गावातील बैगा (धार्मिक विधी करणारा) किंवा न्हाव्याला सोहळा पूर्ण करण्यासाठी बोलावतात. देवी गौरी व तिचे पुत्र गणेश यांच्यासमोर पाच मिनिटांचा सोहळा होतो.
> मित्र समोरासमोर लाकडाच्या पाटावर बसतात. कुंकू, नारळ, पैसे, धान्याची देवाण-घेवाण होते. एकमेकांच्या कपाळावर कुंकू लावतात. पान खाऊ घालतात. मित्राच्या वडिलांना फूल बाबू, आईला फूल दाई म्हटले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.