आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रात नऊ मार्च २०२० राेजी पहिला काेराेना रुग्ण पुणे शहरात आढळला. त्यानंतर लाॅकडाऊनचे नियम शिथिल हाेऊन स्थिती पूर्वपदावर येत असतानाच यंदा फेब्रुवारीपासून कोरोना पुन्हा वेगाने पसरू लागला. मार्चमध्ये राज्यात कोरोनाने कहर केला. यामागे नेमकी काय कारणे आहेत अन् कोरोनाची साथ रोखण्यासाठी नेमके काय केले पाहिजे हे सांगताहेत या क्षेत्रातील तज्ञ...
संस्थागत क्वाॅरंटाइनवर भर हवा
आराेग्य विभागाचे उपसंचालक डाॅ. संजय देशमुख म्हणाले, पहिल्या काेराेनाच्या लाटेवेळी नागरिकांच्या शरीरात अँटिबाॅडी तयार झाले हाेते आणि त्या काेराेना विषाणूचा प्रतिकार करत हाेते. परंतु अँटिबाॅडीचे प्रमाण आता कमी झाले आहे. नवीन स्ट्रेनचा प्रसार खूप वेगाने आहे. त्यामुळे घरात एखादी व्यक्ती पाॅझिटिव्ह आली तर घरातील सर्वांनाच लागण होत आहे. पूर्वी घरात एकच पाॅझिटिव्ह व्यक्ती मिळे, आता किमान पाच व्यक्ती मिळतात. त्यामुळे हाेम क्वॉरंटाइन कमी करून, संस्थागत क्वॉरंटाइन वाढवले पाहिजे.
लसीकरणानेच मिळेल नियंत्रण
इंग्लंड येथील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील मेडिकल सायन्स डिव्हिजनचे मेरी-क्युरी शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी सांगितले की, साथीच्या रोगात पहिल्या लाटेनंतर दुसरी, तिसरी लाट तीन ते चारपट मोठी असते. कोरोनाच्या पाहिल्या लाटेत अमेरिका, इंग्लंडमध्ये दिवसाला ५० हजार पर्यंत रुग्णसंख्या गेली होती, परंतु दुसऱ्या लाटेत हेच प्रमाण चार ते पाच पटीने वाढले होते. त्यामुळे तेथे पुन्हा लॉकडाऊन करावे लागले. भारत आणि महाराष्ट्रात कोरोना संपुष्टात आल्याच्या भावनेतून नोव्हेंबर ते जानेवारीदरम्यान आपण शिथिल झाल्याने कोरोना वाढत आहे. वेगाने लसीकरण केल्याशिवाय पर्याय नाही. युरोपात लसीकरणावर भर दिल्याने रुग्णालयावरील ९० टक्के ताण कमी झाला आहे. मृत्यू प्रमाणात घट झाली आहे.
रुग्णसंख्या कमी होण्यासाठीचे उपाय
आजार डोक्यावर असताना एकत्र येणे वा भेटण्याची आवश्यकता आहे का याचा विचार करावा. चहा पिताना एकाच टेबलवर चार जणांनी मास्क काढून चहा पिण्यापेक्षा एका वेळी एकाने चहा पिऊन इतरांनी मास्क घालून राहिले पाहिजे. घरात राहणे हे निरूपयोगी असण्याचे लक्षण नाही, तर आपण कोरोना रोखण्यास मदत करीत आहोत हे समजून घरी राहिले पाहिजे. अकारण गर्दी करणे टाळले पाहिजे. - डाॅ. रवी सरनाईक, सदस्य, काेरोना टास्क फोर्स, नागपूर.
काय म्हणतात तज्ज्ञ...
शिथिलता भाेवली
गेल्या काही महिन्यांत माेठ्या प्रमाणात शिथिलता आल्याने गर्दी वाढत गेली. लग्नसाेहळे- निवडणुका झाल्या, जे बाधित झाले हाेते व ज्यांना विविध आजार आहेत त्यांनीही तपासण्या करून घेतल्या नाहीत, कोरोनाग्रस्ताच्या संपर्क मोहिमेला लाेकांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता काेराेनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळताहेत. -शीतलकुमार जाधव ,जिल्हा आराेग्य अधिकारी, साेलापूर
योग्य उपचार घ्यावेत
काेराेनाची काेणतीही लक्षणे दिसताच चाचणी करून घेतली पाहिजे. गर्दीत जाणे टाळावे, मास्क आणि डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीशिवाय पर्याय नाही. आगामी काळात हे माेठे शस्त्र असणार आहे. तपासणी केल्यानंतर लक्षणे नसले तरी घरी क्वाॅरंटाइन हाेण्याएेवजी काेविड सेंटरमध्येच दाखल व्हावे. त्यामुळे घरातील इतर सदस्य सुरक्षित राहतील. डाॅ.बी.टी. जमादार, जिल्हा आराेग्य अधिकारी, जि.प. जळगाव
काॅमन काेल्ड, सार्स, मर्स ते काेविड १९
प्रारंभी कोरोनाचा विषाणू प्राण्यातून वा पक्षातून आल्याची शक्यता वर्तवली. त्यापूर्वी जुना काेराेना सर्दी-खाेकल्यापर्यंत (काॅमन काेल्ड) मर्यादित हाेता. नंतर सार्स मग मर्स व आता काेविड १९ च्या रूपात ताे थाेडेसे गुणधर्म बदलून समाेर आला. थाेड्या संपर्कानेही अधिक घातक बनताे. लसीमुळे नियंत्रण आणणे शक्य झाले. -डॉ.ज्योती चिडगुपकर,मायक्राे बायाेलाॅजीस्ट, साेलापूर
‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ या सूत्रानुसार काम व कडक निर्बंध हवेत
लोकांनी “माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ या सूत्रावर काम करायला हवे. लाॅकडाऊनमुळे फक्त गती मंदावू शकते. सरकारनेही लाॅकडाऊन न करता निर्बंध कडक करीत कठोर अंमलबजावणी केली पाहिजे. या शिवाय काॅन्टॅक्ट ट्रेसिंग व टेस्टिंग वाढवणे आणि सुपर स्प्रेडर्सचा शोध घेऊन कारवाई गरजेची आहे.- डाॅ. पिनाक दंदे, संचालक, काेरोना केअर सेंटर अॅँड हाॅस्पिटल, नागपूर
- लोकांचा निष्काळजीपणा आणि बेशिस्तपणा - सरकारकडून लावलेल्या निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी नसणे. - सुपर स्प्रेडर्सची संख्या वाढणे व त्याचे ट्रेसिंग नसणे - कोरोनाविषयक नियम, त्रिसूत्रीचा विसर - लसीकरण केंद्रावरील अनियंत्रित गर्दी. अनेक लोक केवळ लसीकरणासाठी घरून निघाले आणि नंतर कोरोना पाॅझिटिव्ह आले.
लाॅकडाऊन टाळण्याचे उपाय
- प्रत्येकाने लस घेणे
- सुरक्षित अंतर पाळणे
- तोंडावर कायम मास्क लावणे
- लक्षणे दिसताच तपासणी करून घेणे
- संस्थागत क्वॉरंटाइनवर भर देणे
- लसीकरणानेच मिळेल नियंत्रण
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.